पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याला लाभदायक एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी पाळली पाहिजे, ती म्हणजे ‘शीत वर्ज्य करणे’. (अष्टाङ्गहृदय १.३.४८) शीत म्हणजे थंड, अर्थात शीत वर्ज्य म्हणताना थंड गोष्टींचा त्याग अपेक्षित आहे. पावसाळ्यामधील थंडगार वारे, गार पाण्याचा वर्षाव, निसर्गात सर्वत्र वाढलेला थंडावा आणि हवेत वाढलेली आर्द्रता या सर्वाचा विचार करून आयुर्वेदाने दिलेला शीत-वर्ज्य करण्याचा हा सल्ला प्रत्यक्षातही आरोग्यास लाभदायक सिद्ध होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वातावरणात वाढलेल्या शीत वातावरणाप्रमाणे शरीरामधील वातावरणही जर शीत झाले तर ते अनेक रोगांना आमंत्रण देणारे होऊ शकते. विशेषतः शीत वातावरणामध्येच ज्यांचा प्रसार होतो, अशा सर्दी, खोकला, थंडीताप, इन्फ़्लूएंजा, स्वाईन-फ़्लू, वगैरे व्हायरल इन्फ़ेक्शन्सना कारणीभूत होणार्‍या विषाणुंची वाढ व प्रसार रोखण्यास हा ‘शीत-त्याग’ निश्चीत साहाय्यभूत होऊ शकतो.

आणखी वाचा: Mental Health Special: मोबाईलमध्ये मश्गुल मुलांचं काय करायचं?

शीत-त्याग म्हणताना इथे शीत आहार व विहाराचा त्याग अपेक्षित आहे, म्हणजे केवळ खानपानामध्ये नव्हे तर दैनंदिन व्यवहारामध्येही ’शीत-त्याग’ करायला हवा. “शीत त्याग का करावा?” का यामागील आयुर्वेद-शास्त्रोक्त कारण सुद्धा समजून घेऊ.

उन्हाळ्यामधील कोरडी हवा व थंड-कोरडा आहार यामुळे शरीरात जमलेला वात हा पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे प्रकुपित होतो अर्थात उसळतो. पावसाळ्यात पोटफुगी,अंगदुखी,सांध्यांचे,स्नायूंचे, हाडांचे, नसांचे व कंडरांचे असे वेगवेगळे वातविकार सुरु होतात किंवा असल्यास बळावतात,हा पावसाळ्यातील वातप्रकोपाचाच प्रताप असतो. अशावेळी त्या वाताला नियंत्रणात ठेवेल असा आहार घ्यायला हवा, जो स्वाभाविकरित्या उष्ण गुणांचा असायला हवा. अन्यथा शीत आहार व शीत विहार हा वाताचा प्रकोप अधिकच वाढवून वाताचे विविध विकार बळावण्याचा धोका बळावतो.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात सकाळ सकाळी ब्रेकफास्ट करावा का?

दुसरीकडे पावसाळ्यातील अम्लविपाकी (शरीरावर आंबट परिणाम करणार्‍या) पाण्यामुळे, त्या पाण्यावर पोसल्या गेलेल्या वनस्पती व त्या वनस्पतींच्या सेवनामुळे शरीरावर सुद्धा आंबट परिणाम होतो, जो आंबटपणा शरीरात पित्त वाढायला कारणीभूत होतो.त्याचवेळी सभोवतालचे वातावरण थंड असते. त्या शीत वातावरणाला जेव्हा थंड व तीक्ष्ण (तिखट) आहाराची जोड मिळते तेव्हा पित्त वाढण्याचा (जमण्याचा) धोका बळावतो. (अष्टाङ्गहृदय
१.१२.२०) शीत आहारामुळे पावसाळ्यात संभवणारा पित्तसंचय टाळण्यासाठी शीत त्याग केला
पाहिजे.

याशिवाय काल-विरुद्ध आहाराविषयी चरकसंहितेने दिलेला सल्ला सुद्धा इथे लागू होतो.पावसाळ्यात जेव्हा वातावरण हिवाळ्यासारखे थंड असते, तेव्हा शरीरामध्ये शीतत्व वाढवणारा थंड गुणांचा आहार हा हिवाळ्याप्रमाणेच कालविरुद्ध होईल आणि अर्थातच आरोग्यास हानिकारक. (चरकसंहिता१.२६.८९)एकंदर पाहता वर्षा ऋतुमध्ये निसर्गतः होणारा

वात-प्रकोप आणि पित्त-संचय कमीत कमी व्हावा, झालाच तरी तो शरीरामध्ये विकृती निर्माण करण्याइतपत बलवत्तर होऊ नये यासाठी आणि शीत आहार काल-विरुद्ध होऊ नये म्हणून शीत-त्याग आवश्य़क आहे.

नेमके कोणते पदार्थ शीत असतात?
आहारामध्ये कोणते पदार्थ शीत असतात जे शरीरात थंडावा वाढवू शकतात ते, पावसाळ्यातल्या गार वातावरणात वर्ज्य करणे अपेक्षित आहे ते पुढे दिले आहेत :

फ्रीजमधले पदार्थ जसे थंड पाणी, आईस्क्रीम, शीतपेय (कोल्ड्रिन्क्स), जेली, कस्टर्ड, फालुदा, थंड केलेले ज्यूस, बीअर वगैरे. हल्ली पावसाळ्यातल्या थंड वातावरणातसुद्धा गार आईस्क्रीम खाण्याचा चुकीचा पायंडा पडत चालला आहे.

माठातल्या पाण्याचा नैसर्गिक थंडावा सुद्धा काही जणांना पावसाळ्यात बाधतो.

तृणधान्यांमध्ये ज्वारी, तांदूळ व नाचणी थंड आहेत.

कडधान्यांमध्ये मूग, मटकी, मसूर, वाटाणे व चणे थंड आहेत.

भाज्यांमध्ये कोबी, फ़्लॉवर, केळफूल, माठ, तांदूळ, पालक, दुधी भोपळा, लाल

भोपळा, घोसाळे, दोडका, तोंडली, वालपापडी, अळू, कमलकंद, शिंगाडा, काकडी वगैरे भाज्या थंडावा वाढवणार्‍या आहेत.

फळांमध्ये केळी, पेरू, सीताफळ, अंजीर,पेअर, आंबा, फणस, कलिंगड, चिबूड हे थंड परिणाम दाखवतात.

टीप: हे पदार्थ थंड आहेत,याचा अर्थ सरसकट कोणीच त्यांचे सेवन करू नये असे नाही. तर प्रामुख्याने ज्यांना थंडीपाऊस बाधतो अशा शीत (कफ-वात) प्रकृतीच्या माणसांनी, पावसाळ्यात कफविकारांनी आणि वातरोगांनी त्रस्त होणाऱ्यांनी विशेषकरुन त्यापासून दूर राहावे. जेव्हा बाहेरचे वातावरण थंड, कुंद, ओलसर व पाण्याचा सतत वर्षाव करणारे असते आणि सभोवताली सर्वत्र पाणी साचलेले असते अशी परिस्थिती असताना मात्र सर्वांनीच शीत
आहार टाळणे योग्य.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why cold things should be avoided in rainy season hldc psp