मार्च महिन्यातच उकाड्याचे चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी शीत गुणधर्माच्या कोथिंबिरीचा आहारात वापर करावा. कोथिंबिरीच्या बरोबरीने कढीलिंब आणि कोकमाचे गुणकारी उपयोग समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोथिंबीर

कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्यपदार्थांची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वांकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-सायंकाळी पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थांत कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी. तरच त्याचा स्वाद पदार्थांची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त तर उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त यांचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअ‍ॅक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी. त्याचा रस पोटात घ्यावा. चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकयुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा आधार घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. कोथिंबिरीची भाजी ही पथ्यकर भाज्यांत अग्रस्थानी आहे.

कढीलिंब

कढीलिंब थंड गुणाचा, विषनाशक व शरीराचा दाह कमी करणारा आहे. पालक, मेथी या भाज्यांपेक्षा कढीलिंबात रक्तवर्धक व वजन वाढविण्याकरिता अधिक गुण आहेत. कार्बोहायड्रेट व प्रोटीन कढीलिंबात भरपूर आहेत. जखम सडू नये, लवकर भरून यावी म्हणून कढीलिंब मधुमेही माणसाने अवश्य वापरावा. त्याची चटणी खावी किंवा रस प्यावा. कढीलिंबाच्या पानांच्या लेपाने विषारी किड्याची किंवा नागिणीची सूज कमी होते. वर वर्णन केलेले कढीलिंबाचे गुणधर्म आता मंडई किंवा भाजीबाजारात मिळणाऱ्या, तथाकथित कढीलिंबाच्या पानात आहेत का याबद्दल माझ्या मनात दाट शंका आहे. आमच्या दाराशी उत्तम स्ट्राँग वास असणाऱ्या कढीलिंबाच्या फांद्यांना, मंडईतील एक ठेकेदार आठवणीने न्यायचा. ती पाने वर्णाने काळसर व आमटी, भाजीच्या चवीला काही विशेष रंगत आणत असत. आत्ता मिळणारी कढीलिंबाची पाने स्वयंपाकात अजिबात वापरू नयेत असे माझे प्रामाणिक मत आहे. त्या पानांना ना वास, ना औषधी गुण!

कोकम

आंबट पदार्थात कोकम हे आवळ्यासारखेच अपवादात्मक फळ आहे. चिंचेपेक्षा सौम्य पाचक असून तुलनेने अधिक स्निग्ध आहे. चिंचेचा रस जास्त उष्ण आहे. त्याच्या अति वापराने तो आतड्यांचा क्षोभ करतो. शरीरातील नाजूक आतड्यांना चिंचेच्या अधिक वापराने इजा पोहोचू शकते. त्यामुळे अल्सर, व्रण, आम्लपित्त, मूळव्याध या विकारांत रोजच्या जेवणात आंबट पदार्थ खाणे मुश्कील होते. अशा वेळेस आमसूल निर्धोकपणे वापरावे. शीतपित्त किंवा गांधी या विकारात कोकमचे सरबत घेऊन तोच चोथा अंगाला बाहेरून लावण्याचा प्रघात आहे. कृश व्यक्तीने नियमित कोकम साखर सरबत घेतले तर वजन वाढते.
कोकम फळांच्या आतील बियांचा गर आव, आमांश, रक्ती आव, लहान मुलांचे जुलाब, दात येत असताना होणाऱ्या विकारांवर उत्तम व तात्काळ गुण देणारे औषध आहे. जळवात, हातापायांची साले सुटणे, थंडीत गाल, ओठ, पाय कुटणे यावर याच बियांच्या गरापासून तयार केलेले ‘कोकम तेल’ वापरावे. उत्तम नितळ चेहरा ज्यांना हवा त्यांच्याकरिता कोकम तेलासारखे सुरक्षित औषध नाही. एक काळ कोकम तेलाबरोबर अत्यल्प प्रमाणात चंदन तेल मिसळून मी शीतल मलम बनवत असे. चंदन तेल खूप महाग झाल्याने ते औषधीकरण थांबवले. हे मलम तारुण्यपीटिका, जळवातग्रस्त रुग्णांना वरदानच होते.