Diljit Dosanjh : गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या नवनवीन चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे सतत चर्चेत येत असतो. तरुणाईमध्ये तो अतिशय लोकप्रिय आहे. ‘दिल लुमिनाटी टूर इंडिया 2024’ या कॉन्सर्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून तो देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रवास करणार आहे. शनिवारी दिलजीतचा दिल्लीत पहिला कॉन्सर्ट पार पडला. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या ‘दिल-लुमिनाटी टूर – इंडिया’ या कार्यक्रमात संवाद साधताना त्याने स्वत:च्या चांगल्या सवयीविषयी सांगितले. दिलजीत म्हणाला, “मी नियमितपणे सकाळी स्वत:ला १० मिनिटे वेळ देतो”

दिलजीत पुढे सांगतो, “तुम्हाला जे पाहिजे आहे, ते तुमच्या मनाप्रमाणे होईल. मी सर्वांना विनंती करतो की, तुम्ही रोज सकाळी फोन बघण्याऐवजी १० मिनिटे स्वतःशी बोला. तुम्हाला पाहिजे ते करा – ध्यान करा, योगा करा किंवा इतर काहीही करा; पण १० मिनिटे स्वतःला द्या. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी ‘देसी मुलगा’ आहे; पण मी या कॉन्सर्टची सर्व तिकिटे विकली आहेत.”

हेही वाचा : पन्नाशीतही सुंदर दिसणारी करिष्मा कपूर म्हणते, “मी माझ्या फिटनेसला फारसे महत्त्व देत नाही”; काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य?

स्वतःबरोबर १० मिनिटे घालवल्याने काय फायदा होतो?

सकाळी उठल्यानंतर सोशल मीडिया किंवा कामाशी संबंधित मेल तपासू नका, असे तज्ज्ञ सांगतात. कारण- त्यामुळे वेळ वाचतो आणि तणावसुद्धा टाळता येतो. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

हैदराबादच्या ग्लेनेगल्स हॉस्पिटल्स येथील इंटर्नल मेडिसनचे एचओडी, फिजिशियन, वरिष्ठ सल्लागार डॉ. हरिचरण जी सांगतात, “आपली वर्कआउट दिनचर्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण- यामुळे आपल्याला फिटनेसचा दैनिक डोस मिळतो. कुटुंबाबरोबर काही वेळ घालवा. त्यामुळे सकाळी आणखी ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.

डॉ. हरिचरण पुढे सांगतात, “सकाळी काही मिनिटे स्वत:बरोबर घालवा. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शांतपणे जातो. तुम्ही श्वासाशी संबंधित व्यायाम करू शकता, ध्यान करू शकता, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता, लिंबू पाणी पिऊ शकता, सकाळी वृत्तपत्र वाचू शकता किंवा सूर्यप्रकाशात फिरू शकता. यांमुळे आजच्या या डिजिटल जगात जाणवत असलेला तणाव, चिंता व झोपेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा : Sleep Position : तुम्ही कसे झोपता? तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते? घ्या जाणून….

i

डॉ. हरिचरण यांच्या मते, श्वासाशी संबंधित व्यायाम आणि ध्यानाने मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे शरीरात आपल्याला शांत करणारे व आनंदी करणारे हार्मोन्स उत्सर्जित होतात आणि आपला संपूर्ण दिवस चांगला जातो .

“वैयक्तिक आरोग्याची स्थिती, वेळ व आरोग्याशी संबंधित प्राथमिक गोष्टी लक्षात घेता. त्या आधारावर दिनचर्या ठरविणे गरजेचे आहे. आजार किंवा औषधोपचार घेत असलेल्या लोकांनी दिनचर्येत बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,” असे डॉ. हरिचरण सांगतात.