उन्हाळ्यामधील शरीराची अनारोग्यकारक स्थिती बरी होती असे म्हणावे एवढी वाईट देह-स्थिती पावसाळ्यामध्ये, त्यातही आरंभीच्या प्रावृट् ऋतुमध्ये होते. त्यामधील सर्वात वाईट शरीरबदल म्हणजे अग्निमांद्य. अग्नी म्हणजे शरीरामध्ये पेटणारी भूक वा पचनशक्ती, असा मर्यादित अर्थ नसून शरीराची अन्नसेवन करण्याची इच्छा (भूक), अन्न पचवण्याची क्षमता व त्या अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या विविध प्रक्रियांना मिळून अग्नी असे म्हटले आहे.
अधिक नेमकेपणे सांगायचे तर सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाकणाचे पचन, त्यापासुन उर्जेची वा शरीरपेशींची निर्मिती व तयार होणार्या त्याज्य घटकांचे उत्सर्जन या तीनही पातळ्यांवर ज्या अनेक जैवरासायनिक क्रिया घडून येतात,त्या सर्वांना मिळून ’अग्नी’ असे संबोधता येईल. अग्नीची ही तीनही कार्ये पावसाळ्यामध्ये विकृत होतात. रुग्णांनाही तसाच अनुभव येतो. उन्हाळ्यामध्ये अग्नी मंद असतोच, मात्र प्रावृट् ऋतुमध्ये, (आरंभीच्या पावसाळ्यामध्ये) तो अधिकच मंद होतो.
त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही पावसाळ्यातल्या या दिवसांमध्ये भूक मंदावते. जेवणावरची वासना कमी होऊन अक्षरशः जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचे अशी स्थिती असते.अन्नामध्ये रुची राहत नाही.बळेच जेवले तरी अग्निमांद्यामुळे अन्नाचे धड पचनही होत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये पचनाच्या विविध तक्रारींनी लोक बेजार होतात. जसे-अन्नसेवन न करताही पोट भरलेले वाटणे,न जेवताही पोट भरल्याचे ढेकर,अन्नसेवन केले की अपचनाचे ढेकर,ढेकर आले की त्यासह आंबट-कडू पित्तही वर येणे,छातीत-पोटामध्ये जळजळ, थोडे खाल्ले तरी पोट डब्ब होणे, पोटामध्ये वारंवार गुबारा धरणे, तो गुबारा अधोमार्गाने वायू सरला तर बरं वाटेल असं वाटत असतानाच दुर्गंधीयुक्त वायू सुटणे.
हेही वाचा… आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!…हवामानातील बदलामुळे साथरोगांमध्ये वाढ
कधी मलावरोधाचा त्रास तर कधी पातळ मलप्रवृत्तीचा. मलासह फेस आणि आव पडण्याची तक्रार तर अनेकांना या दिवसांमध्ये त्रस्त करते, तर दुसरीकडे अनेक जण मलावरोधामुळे त्रासलेले असतात. मल कडक झाल्यामुळे मलविसर्जन करताना कुंथावे लागल्यामुळे रक्तस्राव होण्याची तक्रारही अनेकांना त्रस्त करते. त्यात पुन्हा पावसाच्या आरंभीच्या दिवसांमध्ये हलका आहार घेणे अपेक्षित असतानाही लोक पावसाळी उत्साहामध्ये तिखट,मसालेदार,तेलकट-तूपकट, पचायला जड असा आहार घेतात, तो काही पचत नाही आणि अग्निमांद्य अधिकच गंभीर होते. अग्नी मंद झाल्याने सेवन केलेल्या अन्नाचे शरीरकोषांना सात्म्य होईल अशा सूक्ष्म रेणूंमध्ये रूपांतर होत नाही आणि शरीरकोषांना त्या अन्नरेणूंपासुन अपेक्षित पोषण मिळत नाही. असे पोषण न मिळालेले शरीरकोष दुर्बल होतात. असे दुर्बल झालेले शरीरकोष व त्या शरीरकोषांपासून तयार झालेले अवयव दुर्बल होतात आणि मग त्या-त्या अंगांचे आजार बळावतात.
हेही वाचा… चालण्याचा व्यायाम वृद्धांच्या स्मरणशक्तीसाठी उपयुक्त
अग्नीमांद्य या आरोग्याला बाधक अशा शरीर-स्थितीनंतर पावसाळ्यात होणारी दुसरी विकृती म्हणजे ‘प्रकोप’. वात प्रकोप म्हणजे वात वाढणे, शरीराला बाधक होईल अशाप्रकारे वाताचा प्रकोप होणे. वातप्रकोपाविषयी माहिती घेण्याआधी सर्वप्रथम वात म्हणजे काय ते समजून घेऊ.
वात म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर वायू म्हणजे गॅस उभा राहतो, तो आयुर्वेदाला अपेक्षित असलेला ‘वात’ नाही. पोट जड होऊन पोटामध्ये गुबारा धरतो, तेव्हा पोटामध्ये गॅस झाला असे आपण म्हणतो, तोसुद्धा शरीरप्रेरक वात नाही. मग अधोमार्गाने सुटणारा वायू म्हणजे वात आहे काय? नाही, तो वाताचे एक स्वरुप असला तरी त्याला शरीर-संचालक वात म्हणता येत नाही. मग वात म्हणजे नेमके काय?
वात म्हणजे काय?
वात हा शब्द ‘वा’ या धातुवाचक शब्दापुढे क्त (त) हा प्रत्यय लागून तयार झाला आहे. ‘वा’ हा शब्द गतिवाचक आहे, अर्थात जिथे-जिथे गति आहे, तिथे-तिथे वात आहे. याशिवाय ‘वा’ हा शब्द गंधवाचकही आहे. गंध वाहून आणणारा या अर्थाने. विविध प्रकारचे वास आपल्यापर्यंत वाहून कोण आणतो तर वारा-वायू. आता वात किंवा वायू हे शरीरामधले नेमके कोणते तत्व ते समजून घेऊ.
उठणे-बसणे, चालणे-धावणे या अतिस्थूल क्रिया, मल-मूत्र-वीर्य-आर्तव स्त्राव यांचे विसर्जन इत्यादी डोळ्यांना दिसणार्या अशा स्थूल क्रिया, शिंक- खोकला- उचकी- ढेकर या शरीरास आवश्यक अशा क्रिया, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप, अंगावर उठणारे रोमांच वगैरे सूक्ष्म क्रिया, शरीरामध्ये घडत असुनही आपल्याला न दिसणार्या मात्र अनुभवास येणार्या अशा हृदयाची धडधड, श्वसनमार्गाचे आकुंचन- प्रसरण,आतड्याची पुरःसरण गती, कानामध्ये ध्वनीचे वहन, स्त्रीबीजांडापासून बीजवाहिन्यांपर्यंत स्त्रीबीजाचा प्रवास, अपत्यमार्गामध्ये वीर्यस्त्राव झाल्यानंतर तिथपासून बीजवाहिन्यांपर्यंत शुक्रजंतूंचा प्रवास आदी अगणित सूक्ष्म क्रिया आणि इतस्ततः धावणार्या, मात्र न दिसणार्या मनाच्या क्रिया या सर्वच कार्यांमागे एक अदृश्य अशी शक्ती (फोर्स) आहे. ते बल, ती गति निर्माण करणारा तो वात किंवा वायू. तेव्हा वात म्हटले म्हणजे पोटात जमणारा, अधोमार्गाने सरणारा वायू असा चुकीचा अर्थ घेऊ नये, तर विविध शरीरकार्यांमागील संचालकशक्ती म्हणजे वात असा घ्यावा.
हेही वाचा… Mental Health Special: मुलांशी हिंसेबद्दल बोलणार का?
मुळात निसर्गाच्या निरिक्षणानंतर आयुर्वेदाची निर्मिती झालेली असल्याने जे व जसे निसर्गात घडते ते व तसेच शरीरामध्येही घडते असा अनुमान- प्रमाणावार आधारित निष्कर्ष तत्कालीन पूर्वजांनी काढला. निसर्गामध्येही जमिनीच्या आत रुजणार्या बीला प्राणवायू कोण पुरवतो? पानांची हालचाल कोण करतो? फ़ुलांवरील परागकणांना दुसर्या फ़ुलांपर्यंत कोण घेऊन जातो? नदीमधील पाण्याला सर्वत्र पसरवणारा कोण? समुद्रातील लाटांना या किनार्यावरुन त्या किनार्यावर नेणारा कोण? या सर्व क्रियांमागे असणारी संचालक-शक्ती म्हणजे वात. निसर्गामध्ये वायूची संचालक शक्ती नसेल तर सृष्टीचे चक्र चालेल कसे?
हिवाळ्यात उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातील थंडी संपूर्ण भारतभर पसरवणाराही वायू आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट सर्वत्र नेणाराही वायूच. हे वारे नसतील तर पाऊस पाडणार्या ढगांना वाहून कोण आणेल? वायू नावाच्या या संचालक शक्तीने जर ढग वाहून आणले नाहीत तर पाऊस पडणारच नाही. बरं, ढग वाहून नेले समुद्रावर आणि सगळाच्या सगळा पाऊस समुद्रातच पडला तर आपण काय ते खारे पाणी पिणार आहोत? आणि अर्थातच पाणी नाही तर जीवन नाही! या वार्यांचा जोर एवढा बलवान असतो,की त्याच्या ताकदीने फिरणार्या प्रचंड आकाराच्या पंख्यांपासून विद्युत- ऊर्जा तयार केली जाते. याच वायू नामक शक्तीचा जोर जेव्हा अतिप्रचंड प्रमाणात वाढतो, तेव्हा त्या प्रकोपक शक्तीसमोर कोणाचाच निभाव लागत नाही, हे आपण चक्रीवादळांच्या विनाशक अनुभवाने शिकलो आहोत.
हे वारे आहेत म्हणून तर जगभरामध्ये हवामानात बदल होत असतात. हवामानात बदल होतात, म्हणून तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भिन्नभिन्न वातावरण तयार होते. वेगवेगळ्या वातावरणानुसार ऋतू तयार होतात.वारेच नसतील तर ऋतू नसतील आणि ऋतू नसले तर ऋतुबदलांचे आरोग्यावर इष्ट- अनिष्ट परिणामही होणारही नाहीत आणि मग ऋतुचर्येची आणि ऋतुसंहिता या पुस्तकाचीही गरज भासणार नाही. एकंदर काय तर निसर्गाच्या या चक्रामध्ये जसा वारा हा अतिमहत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीरामधील अनेकानेक स्थूल, सूक्ष्म, अगम्य अशा क्रियाप्रक्रियांच्या मागील प्रेरक शक्ती या शरीररुपी यंत्राची संचालकशक्ती निर्माण करणारा तो वात किंवा वायू.