काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली की एका पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. जसा गर्डर हा कुठल्याही इमारतीचा किंवा पूलाचा आधारस्तंभ असतो त्याचप्रमाणे शरीराचे आधारस्तंभ हा हाडांचा सांगाडा असतो. कल्पना करा, आपल्या शरीरात जर हाडे नसती तर आपण एखाद्या गोगलगायीसारखे दिसलो असतो. आपली हाडं ही आपल्या शरीराला विशिष्ट आकार व ताठपणा देतात. बालपणी हाडं लवचिक व सारखी वाढत असतात. परंतु वाढत्या वयाबरोबर हाडं कठीण होत जातात. यासाठी त्यांना भरपूर कॅल्शिअम, ड जीवनसत्व व हार्मोन्सची आवश्यकता असते. वयाच्या पस्तिशीच्या आसपास हाडातील कॅल्शिअम कमी व्हायला सुरुवात होते व हाडांची घनता कमी होते. पुढील काळात ही प्रक्रिया काही व्यक्तींमध्ये जलद घडते. ठिसूळ हाडे ही आतून पोकळ व कमजोर असतात त्यामुळे ती साध्या धक्क्यानेही मोडू शकतात. वृद्धांमध्ये मनगटाचे, मांडीचे किंवा पाठीच्या कण्याचे हाड मोडण्याचे हेच कारण असते.
हाडे ठिसूळ का होतात?
१. आपल्या आहारात जर कॅल्शिअम कमी असेल तर हाडातील कॅल्शिअम बाहेर येऊन रक्तामध्ये मिसळते.
२. जर ड जीवनसत्वाची कमतरता असेल तर आहारातील कॅल्शिअम हाडांपर्यंत पोहचण्याची प्रक्रिया मंदावते. बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली सकाळच्या उन्हामध्ये बसणे शक्य होत नाही त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता होते.
३. गरोदर व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, वाढत्या वयातील मुले व वृद्ध यांना जास्त कॅल्शिअमची गरज असते. ही गरज पूर्ण झाली नाही तर हाडे ठिसूळ बनतात.
४. आयुष्याच्या “सेकंड इनिंग्ज” मध्ये स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स कमी झाल्याने हाडापर्यंत कॅल्शिअम पोहोचण्याचे कार्य मंदावते आणि हाडे ठिसूळ बनतात.
५. सांधेदुखी किंवा अस्थमा या आजारात स्टिरॉइडसारखी औषधे किंवा कर्करोगावरील औषधे बराच काळ घ्यावी लागतात त्यामुळेही हाडे पोकळ व ठिसूळ होतात.
६. शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीमध्ये (थायरॉईड किंवा पॅराथायरॉईड किंवा pituitary /adrenal ) कार्यदोष निर्माण झाल्यास हाडांमध्ये कॅल्शिअम कमी होऊ शकते.
७. Crohn’s disease सारख्या आजारामध्ये आतड्याची शोषण क्षमता कमी झाली असते. तिथेही कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.
८. अतिमद्यपान व धूम्रपानानेही हाडे ठिसूळ होतात. बराच काळ हालचाल न करता अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचीही हाडे कमजोर होतात.
आणखी वाचा: Health special: मुलांना विकार आणि आजारांपासून दूर कसे ठेवाल?
हाडांचा ठिसूळपणा कसा ओळखावा? निदान कसे करावे?
एक्स रे मध्ये हाडांचा ठिसूळपणा दिसतो. तसेच DEXA स्कॅन/ स्पेशल CT स्कॅनमध्ये हाडांची घनता मोजता येते.
हाडांच्या ठिसूळपणाचे दुष्परिणाम
१. हाडांची झीज झाल्याने खांदे, कणा यांना बाक येतो. मणक्यांना बाक आल्याने व्यक्ती पुढे झुकून चालू लागते.
२. क्षुल्लक धक्क्याने पायाचे, मांडीचे किंवा मणक्याचे हाड मोडते.
३. ठिसूळ हाडांनी शरीराचे वजन न पेलल्याने तो भार स्नायूंवर पडतो व अंग दुखणे सुरु होते.
पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असते. लहानपणापासून मुलींना आहारात डावलले जाते. पुढे गरोदरपण, स्तनपान व रजोनिवृत्ती या काळात जर कॅल्शिअम योग्य प्रमाणात घेतले नाही तर हाडातील ठिसूळपणा वाढत जातो. पुरुषांमध्ये वाढत्या वयात हार्मोन्सच्या कमी मुळे व मद्य / धुम्रपानामुळे हे प्रमाण जास्त होते.
आणखी वाचा: Health Special: लोणची चवदार, पण प्रमाणातच, अन्यथा…
ज्येष्ठांमध्ये ठिसूळ हाडांमुळे fracture व्हायची शक्यता असते म्हणून घ्यायची काळजी
१. घरात ते कशाला अडकून पडणार नाही असे पाहावे. (assisted living)
२. त्यांचे डोळे व कान नियमित तपासावेत. व त्यात अधूपणा नसावा.
३. स्नायूंमधील ताकद कमी झाली असेल तर स्नायू मजबूत करणारे व्यायाम शिकवावे.
४.आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, नाचणी, दूध, मासे, अंडी व सीताफळ यांचा समावेश असावा. योग्य आहाराबरोबरीने चालणे आवश्यक आहे.
५. एखादी व्यक्ती वरचेवर खाली पडत असेल तर त्याचे कारण शोधावे व त्याचे निरसन करावे.
हाडांचे ठिसूळ होणे – हे कसे टाळावे?
१. नियमित हालचाल व व्यायाम करणे आवश्यक आहे.
२. कॅल्शिअम व ड जीवनसत्व योग्य प्रमाणात घ्यावे. ड जीवनसत्वाची सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये २० मिनिटे रोज फिरावे. कॅल्शिअम साठी दूध, दुधाचे पदार्थ, चीज , लोणी इत्यादी पदार्थ घ्यावेत.
३. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम ७५० मी.ग्राम रोज घ्यावे. ड जीवनसत्वाची गोळी किंवा पावडर सुरवातीस आठवड्यातून एकदा व नंतर महिन्यातून एकदा घ्यावी.
४. धूम्रपान व मद्यपान अति प्रमाणात करू नये.
५. ठिसूळपणावर अतिरिक्त औषधंही आहेत. यामध्ये बिसफॉस्फोनेट, रालोक्सिफेनं किंवा स्त्रियांसाठी HRT . परंतु ही औषधे केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. काही आजारांमध्ये parathormone सारखे हॉर्मोन्स देखील दिले जातात.