Dandruff in winter : सध्या हिवाळा सुरू झाला आणि वातावरणात गारवा जाणवतोय. हिवाळ्यात त्वचा आणि केसांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण- हिवाळा येताच त्वचा आणि केस कोरडे पडू लागतात. विशेषत: केस गळणे आणि केसांमध्ये कोंडा होणे या समस्यांमध्ये वाढ होते. केसांमधील कोंडा कसा दूर करायचा हे एक मोठे आव्हान असते. द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती देऊन, त्यावरील उपाय सांगितले आहेत.
मुंबई येथील नानावती सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे त्वचातज्ज्ञ व वरिष्ठ सल्लागार डॉ. रैना एन. नाहर सांगतात, “थंड हवामानामुळे टाळूवर परिणाम होतो आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. ही एक प्रकारची त्वचेवर आलेली बुरशी असते; ज्याला ‘मालासेझिया’ असे म्हटले जाते. ही बुरशी कमी तापमानात आणखी वाढते. जेव्हा ही बुरशी खूप वाढते तेव्हा टाळूवर खाज सुटते आणि केसांमध्ये कोंडा वाढतो.”
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यानंतर घरातील गरम वातावरणात राहावेसे वाटते. त्यामुळे दमटपणा कमी होतो. अॅस्थेटिक क्लिनिकच्या त्वचातज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर सांगतात, “अशा वेळी वातावरणात कोरडेपणा जाणवतो. हा कोरडेपणा टाळूवरील ओलावा घालवतो आणि टाळूची त्वचा कोरडी होते. त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीत त्वचेतील पाण्याची पातळीसुद्धा कमी होऊ शकते.”
थंडीच्या दिवसांमध्ये आपण गरम पाण्याने अंघोळ करतो. त्यामुळे कोंड्याची समस्या आणखी वाढते. डॉ. कपूर पुढे सांगतात, “गरम पाणी टाळूला आवश्यक असलेले तेलसुद्धा काढून टाकते; ज्यामुळे कोंडा होण्याची शक्यता आणखी वाढते.”
हिवाळ्यात वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे. नवीन अँटीफंगल गुणधर्म असलेल्या अँटी-डँड्रफ शाम्पूने टाळूमध्ये कोंडा निर्माण करणारी बुरशी कमी केली जाऊ शकते. या संदर्भात डॉ. रैना एन. नाहर सांगतात, “शिफारस केलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक दोन दिवसांनंतर या विशेष शाम्पूने केस धुणे गरजेचे आहे. टाळूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित वापरल्या जाणाऱ्या शाम्पूचाही पर्यायाने वापर करावा.”
त्याशिवाय केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी काही विशिष्ट लोशन असतात. हे लोशनसुद्धा तुम्ही टाळूवर लावू शकता. हे लोशन रात्री लावावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाकावेत.
डॉ. नाहर पुढे सांगतात, “सामान्य लोकांची समजूत असते की, केसांमध्ये कोंडा होऊ नये म्हणून केसांना तेल लावायला हवे. पण, तेलामुळे टाळूची त्वचा खराब होऊ शकते; ज्यामुळे कोंडा कमी होण्याऐवजी वाढू शकतो.”
डॉ. कपूर सांगतात, “घरातील वातावरण गरम होण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर करून ह्युमिडिफायर लावल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो; पण भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यानंतर टाळूला आतून पोषण देता येऊ शकते.”
“नियमित केसांची निगा राखणे, विशेष शाम्पू व लोशनचा वापर करून हिवाळ्यात कोंडा कमी केला जाऊ शकतो. एवढे करूनही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही किंवा समस्या वाढल्या, तर त्वरीत त्वचातज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे”, असे रैना एन. नाहर यांनी स्पष्ट केले आहे.