उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसा रसवंतीगृह किंवा फळांचे रस मिळणाऱ्या दुकानाबाहेर सर्रास गर्दी पाहायला मिळते तसेच हिवाळ्याची नुसती चाहूल जरी लागली तरी मुंबईतल्या अनेक नामवंत पदार्थ ( विशेषतः लाडू विक्रेत्यांकडे ) दुकानाबाहेर अळिवाचे ताजे लाडू खाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. साधारण सणासुदीचे पदार्थ घेणाऱ्यांची रांग आणि अळिवाचे लाडू खाणाऱ्यांची रांग यांची संख्या समान असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अळिवाचे नारळाच्या पाण्यात शिजवून तयार केलेले खमंग लाडू पौष्टिक, औषधी आणि चविष्ट असतात. तेलबियांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अळिवाला वेगवेगळ्या भाषांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते. मराठीत अहाळीव किंवा हलीम, हिंदी, बंगालीमध्ये हलीम, गुजरातीमध्ये अशेळीयो अशी अळिवाची विविध नावे आहेत. संस्कृतमध्ये चंद्रशूर आणि इंग्रजीत गार्डन क्रेस सीड्स नावाने ओळखले जाणारे अळिव आहार शास्त्रातदेखील त्याच्या गुणकारी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

अळिवामध्ये उत्तम प्रमाणामध्ये लोह असतं. विशेषतः यातील लोहाचे प्रमाण शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आणि पूर्ववत राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. लोहाव्यतिरिक्त कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, बीटा कॅरोटीन यासारखी पोषणमूल्ये अळिवाचे आहारातील महत्त्व वाढवितात. खरं तर इथिओपियामध्ये सापडणारी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. मात्र भारतातदेखील अळीव मोठ्या प्रमाणात उगवते. ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे.

भारतामध्ये मुख्यत्वे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अळिवाचे लाडू तयार केले जातात, यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अळिव शक्तीवर्धक आणि रेचक आहे. अनेकदा सलाडमध्ये अंकुरलेले अळिव घातलेले दिसतात. जीवनसत्व अ आणि क युक्त अंकुरित अळिव डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मलावरोध असणाऱ्यांसाठीदेखील अळिवाची पाने किंवा अळिवाचे पाणी गुणकारी आहे.

तुम्ही अळिव कसे खाताय, अळिवाबरोबर कोणते पदार्थ करताय याने अळिवातील लोहाचं प्रमाण आणि जीवनसत्त्व क चं प्रमाण अवलंबून असतं. अळिवाचे लाडू तयार करताना नेहमी ओलं खोबरं किंवा नारळ यांच्याबरोबरीने तयार केले जातात. एक महत्त्वाची गोष्ट इथे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ज्या वेळेला आपण अळिवाबद्दल बोलतो त्या वेळेला अळिवाबरोबर कधीही हळद आलं लसूण यांचा वापर करू नये. अळिवाबरोबर ज्या वेळेला तुम्ही हे पदार्थ वापरतात त्याला अळिवातील लोह शरीरात एकत्र करण्यासाठी अडथळा येऊ शकतो.

अळिवाचे लाडू हाडांचे दुखणे किंवा सांधेदुखी आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी अळिव हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. अळिवांमध्ये असणारी प्रथिने हाडांच्या मजबुतीसाठी आणि वजन संतुलित राखण्यासाठी फार उपयुक्त असतात. दुधासोबत उकळून खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते तसंच जर अळिवाबरोबर इतर सुकामेवा एकत्र केला तर शरीराला उत्तम प्रमाणात ऊर्जादेखील मिळू शकते.

तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलंमुलींसाठी वयात यायच्या काळातच्या आधी जर आपण अळिवाचे लाडू आहारात समाविष्ट केले तर त्यांना होणारे त्रास अत्यंत कमी होतात. ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी अळिव औषध म्हणून काम करतं. मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी अळिव संप्रेरकांचे संतुलन दुरुस्त करण्याचे काम करतात. अलीकडे ग्लूटेन आणि त्याच्या अ‍ॅलर्जीबद्दल आपण बरंच वाचतो. अळिवामध्ये ग्लूटेनचे प्रमाण शून्य असल्यामुळे अळिव सर्वसमावेशक आहाराचा भाग होऊ शकतात.

ज्यांना ग्लूटेन अ‍ॅलर्जी आहे त्यांनीदेखील अळिवाचे सेवन करणे पोषक मानले जाते. उत्तम तंतुमय पदार्थ मुबलक कॅल्शिअम आणि भुकेचा समतोल राखणारे घटक अळिवाचे आहारातील स्थान मजबूत करू शकते. जर तुम्ही सायकल चालवत असाल किंवा व्यायाम करत असाल तर अळिव व्यायामाआधी नंतरच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – Mental Health Special : स्क्रीनशॉटमुळे तुमची फसवणूक होऊ शकते का?

सौंदर्यशास्त्राशी निगडित आहारामध्ये अळिवाचे विशेष महत्त्व आहे. ज्यांना केसगळतीची समस्या आहे त्यांनी नियमित अळिवाचे पाणी प्राशन केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात. अळिव खाल्ल्यामुळे डोळ्यावर नवे केसदेखील उगवण्याचे प्रमाण उत्तम आहे. अल्झायमरसारख्या विकारांपासून दूर राहण्यासाठी १ चमचा अळिव नियमितपणे आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्वादुपिंड आणि आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असणारे अळिव मेंदू, मनगट आणि मन तिन्हींसाठी गुणकारी आणि पोषक आहे.

घरच्या घरी अळिव रुजवून त्याची पाने तुम्ही सलाडमध्ये एकत्र करू शकता. नारळ पाणी आणि अळिव रात्रभर भिजवून पिणेदेखील परिणामकारक आहे. जर कोशिंबीर बनवत असाल तर त्याच्यामध्येदेखील स्प्राऊटेड अळिव सीड्स अ‍ॅड करू शकता. शक्यतो दह्यासोबत खाताना अळिव भिजत घालून त्याला मोड काढून खाल्लेले उत्तम. तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर अळिवाची खीर हा सगळ्यात उत्तम पर्याय होऊ शकतो. अळिव कोरडे भाजून बंद डब्यात ठेवल्यास ते महिनोमहिने टिकू शकते. ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी मात्र अळीव खाणे कटाक्षाने टाळावे.

काय मग या हिवाळ्यात तुमच्या घरी अळिवाचे लाडू बनवताय की अळिवाचं सलाड?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do you eat aliv ladoo in winter hldc ssb
Show comments