“शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असताना झोपेच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो, असा प्रश्न मला अनेक रुग्ण विचारतात, असे डॉ. राजीव भागवत यांनी सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. भागवत म्हणाले, “सत्य असे आहे की, झोपताना किंवा बेडवर पडून असताना शरीराला विश्रांती मिळत नाही; विशेषत: जर तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब किंवा स्लीप अॅप्निया यांसारखे एकापेक्षा जास्त गंभीर आजार (co-morbidities ) असतील तर. त्याशिवाय झोपेच्या वेळी रक्ताची रासायनिक रचना बदलते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी अनुकूल नसते हे फार कमी लोकांना माहीत असते.”
मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट विभागातील डॉ. राजीव भागवत यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हृदयविकाराचा झटका का येतो याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
रक्ताच्या रचनेमध्ये काय बदल होतो?
हृदयविकाराचा झटका सहसा मध्यरात्री आणि पहाटे ४ नंतर येतो. ही अशी वेळ असते जेव्हा रक्तातील PA1 नावाच्या विशिष्ट प्रथिनाची पातळी सर्वांत जास्त असते. हे प्रथिन रक्त घट्ट करते. रक्तातील प्लेटलेट्स नंतर चिकट झाल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आता जर शरीरात आधीपासून धोका वाढविणारे इतर घटक असतील, तर रक्त गोठणे हे अंतिम ‘ट्रिगर’ असू शकते.
स्लीप अॅप्निया कारणीभूत ठरू शकतो का?
कधी कधी अनेकांना या वस्तुस्थितीबद्दल माहिती नसते की, आपल्याला स्लीप अॅप्निया नावाचा त्रास आहे. या स्थितीत जेव्हा अशी व्यक्ती झोपते तेव्हा सर्व स्नायू शिथिल असतात; ज्यात मानेच्या भागातील स्नायूंचा समावेश होतो. त्यामुळे वायुमार्गात बिघाड होतो, वायुमार्ग आकुंचन पावतो आणि श्वास घेण्यासाठी घेतली जाणारी हवा मुक्तपणे फिरण्याऐवजी फुप्फुसापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे घोरणे किंवा झोपताना श्वास घेणे तात्पुरते थांबते; ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. काही वेळा झोपेच्या वेळी १० सेकंद किंवा त्याहून अधिक काळ श्वासोच्छ्वास थांबतो. त्यामुळे हृदयावर ताण येतो. सहसा रात्री कमी होणारा रक्तदाब प्रत्यक्षात वाढू शकतो आणि कॉर्टिसोल व एड्रेनालाईनसारख्या तणावाच्या हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकतो. त्यामुळे हृदयावर ताण वाढतो. कारण- रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागते.
संशोधकांना असे आढळून आले आहे, “स्लीप अॅप्नियामुळे जळजळ वाढते, रक्तवाहिन्यांच्या भिंतींचे (the walls of blood vessels) स्वरूप बदलते आणि हृदयाची लय असामान्य होते. या सर्वांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूदेखील होऊ शकतो.”
अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका
काही रुग्णांना सिक सायनस सिंड्रोम नावाचा दुर्मीळ हृदय लय विकार (Heart rhythm disorders) असू शकतो. त्यामुळे हृदयाच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करणाऱ्या नैसर्गिक पेसमेकर किंवा सायनस नोडवर परिणाम होतो. सिक सायनस सिंड्रोममुळे हृदयाचे ठोके मंद होतात, हृदयाच्या ठोक्यांदरम्यानचा कालावधी वाढतो किंवा हृदयाचे ठोके (ॲरिथमिया) अनियमित होतात. हे सहसा आनुवंशिक विकृतीशी संबंधित असते; ज्यामुळे हृदयातील विद्युत क्रियाकलाप (electrical activity ) निर्माण करण्यात गुंतलेल्या प्रथिनांमध्ये बदल होतो.
संशोधकांना असे आढळून आले, “मज्जासंस्थेतील एक रसायन निरोगी व्यक्तींमध्ये हृदयाची गती कमी करते. परंतु, सायनस सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये ते संपूर्ण हृदयावर पसरणारी विद्युत प्रक्रिया पूर्णपणे रोखू शकते; ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.
तुम्हाला निद्रानाश आहे का?
आणखी एक कारण म्हणजे निद्रानाश; जो उच्च रक्तदाबाशी निगडित आहे. रक्तदाबाची सतत वाढलेली पातळी हृदयावर दबाव टाकते. क्लिनिकल कार्डिओलॉजी जर्नलमधील अभ्यासात असे दिसून आले आहे, “निद्रानाश असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १.६९ पट जास्त असते.”
रात्री हृदयविकाराचा झटका कसा टाळू शकतो?
असे करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे धोका वाढविणाऱ्या घटकांची नियमित तपासणी करणे. जर ते अस्तित्वात असतील, तर त्यांच्यावर औषधोपचार घ्या; तसेच जीवनशैलीत बदल (याचा अर्थ निरोगी आहार, वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, दारूचे प्रमाण मर्यादित करणे व धूम्रपान सोडणे) करा. नेहमी चांगली झोप घ्या आणि झोपण्यापूर्वी स्वतःला हायड्रेटेड ठेवा