थंडी सुरु होत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. काहीवेळा तर प्रत्यक्षात सभोवतालचे तापमान फारसे उतरलेले नसतानासुद्धा ओठ, चेहरा, तळपाय कोरडे पडू लागले की थंडी सुरु झाल्याचे वा येणार असल्याचे समजते. त्या कोरडेपणाविषयी समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीरामध्ये रुक्षत्व (कोरडेपणा) वाढत आहे, हे कसे ओळखावे?

-प्रथमदर्शनीच त्या व्यक्तीची त्वचा कोरडी असल्याचे लक्षात येते.
-त्वचेच्या कोरडेपणामुळे त्वचेला सौंदर्य तर नसतेच उलट त्वचा निस्तेज दिसते.
-त्वचेला सहज भेगा पडतात.
-अशा व्यक्तींचे तळपाय वारंवार फ़ुटतात. तळपायाला चिर्‍या पडणार्‍यांना शरीरामध्ये रुक्षत्व वाढलेले असण्याची दाट शक्यता असते (मात्र रुक्षत्व हेच त्यामागचे एकमेव कारण असते, असे नाही)
-शरीरात वाढलेल्या कोरडेपणाचे सहज लक्षात येणारे लक्षण म्हणजे केसांचा कोरडेपणा. या लोकांचे केस खूप कोरडे असतात,ज्यामुळे केस गळतातही फार किंवा केसांच्या टोकांना दोन फाटे फुटतात, टक्कल सहज व लवकर पडते.
-मल कोरडा होतो व त्यामुळे मलावरोधाचा त्रास होतो.
-रोजच्या रोज मलविसर्जन होत नाही
-पोटफुगीचा त्रास होत राहतो.
-सातत्याने अधोवायु सुटत राहतो.
-अश्रूंचे प्रमाण कमी होते.
-डोळे वारंवार कोरडे पडतात.
-नाक कोरडे राहते.
-नाक कोरडे राहिल्याने नाक आतून सुजते-दुखते.
-नाकातला स्त्राव कोरडा पडून त्याच्या खपल्या धरतात.
-घशाला-तोंडाला वारंवार कोरड पडते.
-बोलताना घसा पुन्हा-पुन्हा कोरडा पडतो.
-अधिक बोलल्यानंतर घसादुखीचा, कोरड्या खोकल्याचा वा दम्याचा त्रास होतो.
-हालचाल करताना सांधे व हाडांमधून कटकट आवाज येतो.
-रोजचीच अंगवळणी पडलेली कामे करतानाही स्नायु-कंडरांमध्ये वेदना होतात.
-सांधे दुखतात.
-हाडे वळतात.
-टाच दुखते.
-सांधेदुखी, हाडदुखी, टाचदुखी पंख्याखाली झोपल्यावर किंवा एसीच्या थंड-कोरड्या वातावरणात वाढते…

वरील लक्षणांवरुन शरीरामध्ये वाढत असलेल्या रुक्षत्वाचे (कोरडेपणाचे) निदान करता येते. (वरीलपैकी एखादी तक्रार तुम्हाला त्रस्त करत असली तर ती शरीरात कोरडेपणा वाढल्यानेच असेल असे नाही, त्यामागे अन्य कारणेही असू शकतात. कसेही असले तरी स्वयंनिदान करण्याची चूक करु नका)
वातावरणात वाढलेल्या कोरडेपणामुळेच वरील लक्षणे दिसतात असे मात्र नाही. आपल्या रोजच्या आहारविहारातल्या चुका हेसुद्धा शरीरामध्ये कोरडेपणा वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

हेही वाचा – हिवाळ्यात येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे फायदेशीर ठरेल का?

आजच्या आधुनिक जगामध्ये लोकांकडून होणारे पीठापासून तयार केलेल्या अन्नपदार्थांचे अतिसेवन, त्यातही मैद्याचे, बेकरीच्या पदार्थांचे, जंक फूडचे नित्य सेवन, समाजाने लोणी-तेल-तुपाच्या सेवनावर आणलेले नियंत्रण (तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत, मात्र तेल तूप लोण्याचे सेवन थांबवणे योग्य नाही), कृत्रिम गार-कोरड्या हवेमध्ये (एसीमध्ये) सतत राहणे, रात्रीचे जागरण वगैरे कारणांमुळे शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो.

हा कोरडेपणा बाह्य लक्षणांपर्यंतच मर्यादित राहत नाही, तर शरीरामधील आभ्यन्तर अवयवांवरसुद्धा त्याचा परिणाम होतो. वरील लक्षणांवरुन शरीरामधील नेत्र, मस्तिष्क, मूत्रपिंड, आतडे, स्वादुपिंड, यकृत आदी आभ्यन्तर अवयवांमध्येसुद्धा कोरडेपणा वाढत असल्याचे व त्या कोरडेपणामुळे त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होत असल्याची शंका घेता येते.

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. डेनिस बर्किट या संशोधकाने युरोपियन लोकांचा मल कसा कोरडा असतो व त्याचा संबंध कोलेस्ट्रॉलशी व पर्यायाने हृदयरोगाशी कसा आहे हे पटवून दिले. रुक्षत्वाचा (कोरडेपणाचा) दोष या दृष्टीकोनातून का होईना पण आधुनिक वैद्यकाला पटला.

मथितार्थ हाच की रुक्षत्व सर्वच अवयवांना-संपूर्ण शरीराला बाधक होते, हे समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात त्या-त्या अवयवांचा एखादा आजार व्यक्त होण्यापूर्वी तो-तो अवयव कोरडेपणाने ग्रस्त असतो.

हेही वाचा – रेड वाईन प्यायल्याने खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो? आरोग्याला फायदे होतात? डाॅक्टर काय सांगतात पाहा…

कोरडेपणा हेसुद्धा विविध विकारांमागचे एक कारण असू शकते, हे समजून घेतले पाहिजे. अशा विकारांची गणना आयुर्वेदाने ’वातज अर्थात वातप्रकोपामुळे होणारे आजार’ अशी केली आहे. या विकृतींवर केल्या जाणार्‍या सर्वसाधारण उपचारांमध्ये ’कोरडेपणा’ हा घटक पूर्णपणे दुर्लक्षिला जातो.

वास्तवात अशा विकृतींमागचे मूळ कारण असलेला कोरडेपणा कमी करुन स्नेहन करणारी-स्निग्धता वाढवणारी चिकित्सा केल्याशिवाय त्यामध्ये गुण येत नाही. स्नेहन चिकित्सेला आयुर्वेदाने इतकं महत्त्व का दिले आहे हे इथे वाचकांच्या लक्षात येईल.