Why does lung cancer recur? आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत धूम्रपान करणे अगदी सामान्य बाब झालीय; मात्र याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. धूम्रपानामुळे फुप्फुसांचा कर्करोग होतो हे सर्वांनाच माहीत आहे; परंतु आता अशी प्रकरणेही समोर येत आहेत, जिथे लोकांना धूम्रपान न करता फुप्फुसांचा कर्करोग होत आहे. तसेच उपचारानंतर बरा झालेला कर्करोगही पुन्हा होत आहे. यावेळी भारतीय संशोधकांच्या एका पथकाने काही रुग्णांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या फुप्फुसांच्या कर्करोगाची लवकर पुनरावृत्ती होण्याचे आनुवंशिक कारण शोधून काढले आहे. हा शोध रोगाच्या उपचारपद्धतीत बदल करू शकतो. फुप्फुसांचा कर्करोग हे जगभरातील कर्करोगींच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. मुख्यतः तो उशिरा कळतो.भारतीय संशोधकांनी केलेला शोध फुप्फुसांच्या एडेनोकार्सिनोमाशी संबंधित आहे आणि तो फुप्फुसांच्या कर्करोगाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे, जो बहुतेकदा धूम्रपान न करणाऱ्यांनादेखील प्रभावित करतो. या विशिष्ट प्रकारच्या फुप्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये एपिडर्मल ग्रोथ रिसेप्टर फॅक्टर (EGFR) जनुकामध्ये एक विशिष्ट उत्परिवर्तन होत असते आणि त्यांच्यावर ‘EGFR टायरोसिन काइनेज इनहिबिटर’ नावाच्या लक्ष्यित औषधांचा एक वर्गाद्वारे उपचार केला जातो, जो कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवतो. परंतु, या उपचारानंतरही अनेक रुग्णांना अखेरीस पुन्हा कर्करोग होतो.
दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पस, मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर व पुण्यातील वन सेल डायग्नोस्टिक्समधील संशोधकांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाला असे आढळून आले आहे की, जेव्हा काही ट्यूमर सप्रेसर जीन्स (TSGs) EGFR जनुकासोबत उत्परिवर्तन करतात तेव्हा रुग्णांना पुन्हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. या अभ्यासात EGFR उत्परिवर्तन असलेल्या फुप्फुसांच्या कर्करोगाने बाधित झालेल्या ४८३ रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले आणि असे आढळून आले की, ज्या रुग्णांमध्ये काही ट्यूमर सप्रेसर जीन्सचे (TSGs) EGFR जनुकासोबत उत्परिवर्तन झाले होते त्यांचा जगण्याचा दर लक्षणीयरीत्या कमी होता.
युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी ओपनमध्ये प्रकाशित झालेले त्यांचे निष्कर्ष, पुन्हा आजार होण्याचा धोका असलेल्या रुग्णांना ओळखण्यास आणि त्यानुसार त्यांचे उपचार समायोजित करण्यास मदत करू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. “या अतिरिक्त उत्परिवर्तन (TSGs) असलेल्या रुग्णांसाठी सरासरी एकूण जगण्याचा कालावधी ५१.११ महिने होता, तर ज्या रुग्णांमध्ये हे उत्परिवर्तन नव्हते त्यांच्यासाठी ९९.३ महिने होते. त्याचप्रमाणे, दोन्ही प्रकारच्या उत्परिवर्तन झालेल्या रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा वाढण्यास सुरुवात होण्यापूर्वीचा कालावधी- ज्याला प्रगतीमुक्त जगणे म्हणून ओळखले जाते, तोदेखील कमी होता,” असे दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसच्या अनुवंशशास्त्र विभागाच्या एकात्मिक कर्करोग जीनोमिक प्रयोगशाळेचे प्राध्यापक व टाटा इनोव्हेशन फेलो अमित दत्त म्हणाले.
WHO ने काढलेल्या जागतिक कर्करोग सांख्यिकी डेटाबेसनुसार २०२२ मध्ये भारतात फुप्फुसांच्या कर्करोगाचे ८१,७४८ नवीन रुग्ण आणि ७५,०३१ मृत्यू नोंदवले गेले. या अभ्यासाला विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांचे सहकार्य लाभले. हे संशोधन प्राध्यापक दत्त आणि टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. कुमार प्रभाष यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर विद्यार्थिनी सुप्रिया हैत यांनी डॉ. जयंत खंदारे, डॉ. गौहर शफी आणि वन सेल डायग्नोस्टिक्सच्या टीमच्या सहकार्याने केले.
प्रोफेसर दत्त म्हणाले की, संशोधकांनी कर्करोगाच्या पुनरावृत्तीपूर्वी आणि नंतर १६ रुग्णांच्या ट्यूमर नमुन्यांची तपशीलवार आनुवंशिक क्रमवारी केली; जेणेकरून हे आनुवंशिक बदल रोगाच्या पुनरावृत्तीमध्ये कसे कारणीभूत ठरतात ते चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. यावेळी असे आढळून आले की, यामध्ये जनुके महत्त्वाची भूमिका बजावतात.
या अभ्यासाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लिक्विड बायोप्सीचा वापर. एक रक्त चाचणी, जी वन सेल डायग्नोस्टिक्सने विकसित केलेल्या व्यापक जीनोमिक प्रोफायलिंग पॅनेलचा वापर करून रक्तातील कर्करोगाशी संबंधित डीएनए तुकड्यांचा शोध घेते. कालांतराने २५ रुग्णांच्या २०० रक्त नमुन्यांचे विश्लेषण करून, उपचारादरम्यान ट्यूमरची आनुवंशिक रचना कशी विकसित झाली याचा अभ्यास करण्यात आला. यावेळी त्यांना आढळले की, ज्या रुग्णांना ट्यूमर पुन्हा लवकर (उपचार सुरू केल्यानंतर १० महिन्यांच्या आत) झाला, त्यांच्यामध्ये] या १७ टीएसजीमध्ये उत्परिवर्तन आधीच अस्तित्वात होते आणि कालांतराने ते अधिक प्रबळ झाले. त्यामुळे जर डॉक्टरांना हे अतिरिक्त ट्यूमर सप्रेसर म्युटेशन असलेल्या रुग्णांना सुरुवातीच्या काळातच ओळखता आले, तर ते अधिक प्रभावीपणे उपचार करू शकतील”, असे प्रोफेसर दत्त म्हणाले.