नेहमीसारखा सकाळी फिरायला बाहेर पडले. मैदानाच्या जवळच्या रस्त्यावर गर्दी दिसली, शिट्टी ऐकू आली आणि अनेक जण दिलेल्या मार्गावरून चालायला लागले. वाटले आज आता कशासाठी walkathon? बऱ्याच जणांनी हिरव्या रंगाचे टी शर्ट घातले होते. अनेकांच्या हातात छोटे त्रिकोणी झेंडे होते. त्याच्यावर काहीतरी लिहिले होते, काही जणांनी मोठ्ठा फलक (banner) हातात धरला होता. त्याच्यावर लिहिले होते, “मानसिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!’ खाली एक घोषवाक्य होते, ‘मानसिक आरोग्य हा माझा हक्क आहे’! एका फलकावर लिहिले होते,’Mental Health Matters’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mental Health Matters हे घोषवाक्य मनाला फार भावले. वाटले, ‘Matters of mental health’ की “mental health matters?’ कसा छान दुहेरी अर्थ आहे यात! ‘Matters of mental health’ म्हणजे काय काय बरे येईल यात? गेले काही दिवस मला कामाचा फार ताण आहे हे नक्की बसेल त्यात. माझ्या मित्राला गेले अनेक महिने नीट झोप लागत नाही, ते पण यात बसते का? माझी पत्नी गृहिणी आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काही ना काही तरी करत असते. घरातली, घराबाहेरची विविध प्रकारची कामे करते. अचानक बिघडलेले washing machine, कामाला न आलेली बाई, घरातली संपलेली भाजी, मुलीचा सकाळचा क्लास, पोहण्याच्या स्पर्धेचे वेळापत्रक, तिच्याबरोबर स्पर्धेला जाणे, नातेवाईकांचे येणे जाणे, घरगुती कार्यक्रम अशे तिच्या कामांची न संपणारी यादी! ती पूर्ण करताना तिची होणारी तारांबळ हे सुद्धा आहे का ‘Matters of mental health’ मध्ये? मग आठवला आमचा एक शेजारी, डिप्रेशनने आजारी. हे तर मानसिक आरोग्याच्या कक्षेत येतेच! अशी कितीतरी ‘Matters of mental health’! अशा सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, आपल्या शरीराकडे आणि मनाकडे आपण लक्ष द्यायचे असते हे जाणवले की आपण आपोआप म्हणतो, ‘Mental Health Matters!’

दुसरा फलक होता तो पाहून मला फार आश्चर्य वाटले. ‘ मानसिक आरोग्य हा माझा हक्क आहे!’ म्हणजे नक्की काय आहे? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे हा माझा हक्क आहे. मला देशात कुठेही मुक्तपणे फिरता येणे हा माझा हक्क आहे, शिक्षण मिळणे हा माझा हक्क आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे लहानपणापासून मनावर कोरले आहे. पण म्हणून मानसिक आरोग्य हा माझा हक्क आहे?’ विचार करतच घरी परत आले.

हेही वाचा… Mental Health Special: मुलांना सांगा या १० महत्वाच्या टिप्स!

माझा शेजारी, ज्याला डिप्रेशनचा इलाज सुरू होता, त्याचीच गोष्ट आठवली. घरात इतक्या अडचणींचा डोंगर त्याच्यासमोर उभा होता, की तो समस्यांना तोंड देताना थकून गेला होता. ऑफिसमध्ये त्याने रजा मागितली. बॉस म्हणाला, ‘टेन्शन कोणाला नसते? केवळ टेन्शन आहे म्हणून रजा मिळणार नाही.’ तसेच दिवस रेटत राहिला. अखेरीस इलाज सुरू केले. वाटले, घरातल्या समस्यांना तोंड देताना निर्माण झालेली मनाची समस्या कमी महत्त्वाची बॉसने ठरवली. त्याच्या मानसिक स्थितीची काळजी घेतली जाणे, या वेळेस राजा मिळणे हा त्याच हक्कच नव्हता का?

हे झाले एक उदाहरण, जिथे मानसिक विकाराचे निदान होऊन इलाज होणे हा त्या रुग्णाचा हक्कच आहे!

दुसरी उदाहरण आठवले ते होते अगदी वनवासी भागातले. वनवासी क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या माझ्या मित्राने सांगितलेली गोष्ट. अगदी तरुण स्त्री, स्किझोफ्रेनिया सारखा गंभीर मानसिक विकार झालेली. पण तिचे वागणे म्हणजे भूतबाधा असे वाटून खूप अंगारे धुपारे, तांत्रिक मांत्रिक झाले, पण या वर काही उपाय असतो हे माहीतच नव्हते. जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते कुटुंब आले, तेव्हा मोठ्या गावी घेऊन गेले आणि उपाय सुरू झाले. घरातले सगळे खूष झाले, कारण तिचे वागणे इतके सुधारले! ती घरातले काम ही करू लागली. पावसाळा आला. झाले, इलाज बंद झाले. कसे जाणार मोठ्या गावात? आणि खर्च कोण करणार प्रत्येक वेळेला? म्हणजे, तिला जवळच्या ठिकाणी, परवडण्यासारखे उपचार उपलब्ध असणे हा तिचा हक्कच नाही का!

हेही वाचा… Health Special: स्मूदी प्या, ऑक्टोबर हिटला दूर ठेवा

थोड्या वेळाने आणखी एक विचार मनात आला. घरातली प्रतिकूल परिस्थिती, व्यसनाधीनता, ताणलेले नातेसंबंध, जीवनात घडणाऱ्या दुर्घटना आणि अर्थात अनुवांशिकता, मेंदूतील बदल यासरखे अनेक घटक मनोविकारांना जबाबदार असतात. मनोविकारांची शक्यता वाढवणाऱ्या अशा घटकांचा प्रतिबंध करणे शक्य आहे का? असे म्हणता येऊ शकते का की या जोखमीच्या घटकांपासून(risk factors) समाजातल्या अनेकांना संरक्षण कसे मिळेल हे पाहणे म्हणजे त्यांचा मानसिक आरोग्याचा हक्क मान्य केल्यासारखे होईल? पण म्हणजे काय प्रत्येकाच्या आजूबाजूचे वातावरण नियंत्रित करायचे? अनुवांशिकता कशी काय बदलणार? असे लक्षात आले, की हा हक्क इतका सहजी नाही मिळू शकत. सामाजिक परिस्थितीचे भान आणि त्यावर काम, सुरक्षेचे वातावरण आवश्यक आहे. आपल्या समाजातल्या अनेक मूलभूत मूल्यांचे रक्षण करणेही आवश्यक आहे. अनुवंशिकतेसारख्या घटकांवर संशोधन, जागृती आणि समुपदेशन इत्यादी गोष्टींचा उपयोग होईल. नाही का?

मनातली विचारांची मालिका मोठीच होत चालली. वर्तमानपत्र वाचताना रोज मनात निर्माण होणारी अस्वस्थता कशामुळे असते, तर मुलांचे आत्महत्त्येचे प्रयत्न, समाजातला वाढता हिंसाचार, जीवघेणी स्पर्धा, बदलती संस्कृती असे अनेक विषय! या सगळ्याचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध? धीर धरणे, मनाची लवचिकता, संकटाला सामोरे जाण्याची क्षमता, शरीर आणि मन यांचा संबंध आणि दोन्हीची घ्यायची काळजी अशा कितीतरी गोष्टी मानसिक आरोग्यही निगडीत आणि करता येण्या जोग्या! जणू काही ह्या सगळ्याबद्दल जागरूक बनवणे, प्रशिक्षण मिळणे, मदतीला कोणीतरी उपलब्ध असणे ह्यातून तर मानसिक आरोग्याच्या हक्काची पूर्तता होईल!

घराची बेल वाजली. आज माझ्या भावाचे कुटुंब जेवायला आले होते. दारातच त्या सगळ्यांना मी म्हटले, ‘मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does mental health really matter hldc dvr
Show comments