Health Special: पावसाळ्यात वातप्रकोप का होतो, याबद्दल सुश्रुतसंहितेमध्ये महर्षी सुश्रुत सांगतात, ‘क्लिन्नत्व’. क्लिन्न या शब्दाचा अर्थ होतो ओले आणि क्लिन्नत्व म्हणजे ओलसरपणा (ओले झालेले). या सांगण्याचा अर्थ हा की, पावसाळ्यात जेव्हा शरीरामध्ये ओलसरपणा वाढतो तेव्हा वातप्रकोप होण्याचा धोका बळावतो. ओलावा हा शरीराला थंडावा देतो. थंडावा हा वाताचा गुण आहे, मात्र त्याचा अतिरेक झाल्यावर तो दोष होतो आणि शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रावृट ऋतूमध्ये…

ओलसरपणामुळे होणारा वातप्रकोप प्रावृट्‌ ऋतुमध्ये (पावसाळ्याच्या आरंभी) होतो, असे का? तर जसजसा पावसाळा वाढत जातो तसतशी शरीराला पावसाळी- ओलसर वातावरणाची सवय होते आणि त्या ओलाव्याचा तितकासा त्रास होत नाही. हे वसंत ऋतुमधला (मार्च- एप्रिलमधला उन्हाळा) हा ग्रीष्मातल्या (मे- जून महिन्यामधील) उन्हाळ्यापेक्षाही त्रासदायक होतो तसेच आहे. शिशिरातल्या कडक थंडीनंतर जेव्हा वसंतात ऊन पडू लागते, तेव्हा गारव्यानंतरचा तो उन्हाळा शरीराला सहन होत नाही आणि जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी त्याची शरीराला सवय होऊ लागते. अगदी तसेच पावसाच्या ओलाव्याबाबत प्रावृटानंतरच्या वर्षा ऋतुमध्ये होते.

हेही वाचा : Health Special: कोणत्या रानभाज्या, किती उपयुक्त? काय काळजी घ्याल?

गारवा बाधतो

प्रावृट्‍ म्हणजे उन्हाळ्यानंतरच्या सुरुवातीच्या पावसाळ्यातला ओलसर- गारवा शरीराला अधिक बाधतो आणि जसजसे दिवस सरतात तसतसा शरीराला त्या पावसाळी ओलसर-थंड वातावरणाची शरीराला सवय होते. असे असले तरी काही व्यक्तींना मात्र जोवर पाऊस सुरु आहे, तोवर वाताचा (वातप्रकोपाचा) त्रास होत राहतो. जसे की- ज्यांच्या शरीरामध्ये मुळातच वात वाढलेला असतो, ज्यांना आधीच वातविकार झालेला असतो, जे किडकिडीत- बारीक- हाडकुळ्या शरीरयष्टीचे आणि अस्थिर- वाचाळ- धांदरट व्यक्तिमत्त्वाचे असतात असे वातप्रकृतीचे लोक, जे वातप्रकोप होईल (शरीरामध्ये वात वाढेल) असा आहार घेतात जसा की, तेल- तूप-लोणी विरहीत अन्न व कोरड्या, थंड गुणांचा आहार, अल्पआहार, सातत्याने उपवास (अनशन) करणारे वगैरे आणि जे वातप्रकोप होईल अशा कृती करतात. जसे की, आपल्या क्षमतेपेक्षा अधिक कृती/ काम/ व्यायाम/परिश्रम करणे, सातत्याने एकाच अंगावर- अवयवावर ताण पडेल अशा कृती- कामे करणे, एकाच स्थितीमध्ये एकाच प्रकारचे काम-व्यवहार करणे आदी.

पावसाळ्यात शरीरामध्ये वाढणारा ओलसरपणा

पावसाळ्यात शरीरामध्ये ओलसरपणा वाढण्याचे एक कारण तर प्रत्यक्षसिद्ध आहे ते म्हणजे, हवेतला ओलावा. पावसामध्ये आकाशातून पाण्याचा वर्षाव होत असताना वार्‍यांमुळे पाण्याचे तुषार सगळीकडे वाहतात आणि त्यातले सूक्ष्म थेंब सर्वत्र पसरतात, जे सभोवतालच्या वातावरणामध्ये ओलावा वाढवतात, अगदी घरादारांमध्ये सुद्धा. या हवेमधील पाण्याचे सूक्ष्म थेंब श्वसनावाटे शरीरात शिरतात व शरीरातला ओलावा वाढवतात. परिणामी शरीरातला ओलावा वाढतो. याशिवाय पावसात भिजल्याने शरीर ओले होते हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण. पावसात कामावर जाणारे लोक, बैलगाडी- सायकल-स्कूटर- मोटरसायकल वरुन प्रवास करणारे, रस्त्यावर- उघड्यावर व्यवसाय-धंदा करणारे, शेती- बागकाम करणारे, नगरपालिकेची उघड्यावरील विविध कामे करणारे कर्मचारी, बाजाररहाट करायला बाहेर पडणार्‍या गृहणी- गृहस्थ, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, उघड्यावर खेळणारे खेळाडू, घरातल्या घरात सुद्धा धुणीभांडी आदी घरकाम करणार्‍या स्त्रिया वगैरे अनेकानेक कारणांमुळे जे लोक पावसात भिजतात किंवा ज्यांना भिजावे लागते, त्यांना शरीरात ओल वाढण्याचा व त्यामुळे वात बळावण्याचा धोका असतो. त्यातही जे अचानक बराच वेळ भिजतात आणि त्याच ओल्या कपड्यांवर बराच वेळ राहतात,त्यांना शरीरामध्ये ओल वाढण्याचा आणि त्यामुळे तत्काळ वाताचा त्रास होऊन अंगदुखी सह थंडीताप, कोरडा खोकला, दमा, शरीर आखडणे, पाय आखडणे, सांधा धरणे वगैरे त्रास होण्याचा धोका असतो.

हेही वाचा : काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त

वाताचा त्रास नंतरही होतो…

दुसरीकडे असेही लोक असतात, ज्यांना दीर्घकाळापासुन पावसात भिजण्याची सवय झालेली असते आणि तत्काळ त्याचा त्रास झालेला दिसत नाही. अशा पावसाळ्यात नित्यनेमाने भिजणार्‍या व त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही असे समजणार्‍या काही जणांनासुद्धा पुढे जाऊन वाताचे त्रास होऊन सांध्यांची- हाडांची- स्नायुंची- नसांची विविध दुखणी जडतात असे निरिक्षण आहे. सातत्याने शरीरामध्ये ओलावा वाढणे हे आज नाही तर उद्या शरीरामध्ये वातप्रकोप करुन वातविकारांना कारणीभूत होणारच.

अतिरिक्त जलपान

याशिवाय सततच्या पावसामुळे भितींना आलेली ओल हे सुद्धा शरीरातला ओलावा वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. याचबरोबर आधुनिक जगातल्या फरशा (Flooring tiles) सुद्धा ओल व थंडावा धरुन ठेवतात, जो पायांच्या तळव्यांमधुन शोषला जातो. शरीरात ओलावा वाढण्याचे पुढचे कारण हे आयुर्वेदाने वर्षा ऋतुचर्येमध्ये मुद्दाम अधोरेखित केले आहे, ते म्हणजे अति प्रमाणात जलपान. वातावरणातला ओलावा, शरीरात वाढलेला ओलावा, तो ओलावा मूत्रविसर्जन वाढवून बाहेर फेकण्याचा शरीराचा प्रयत्न, ओलाव्यामुळे आरोग्याला संभवणारा त्रास या सर्वांचाच विचार करुन आयुर्वेदाने या दिवसांत पाणी अल्प प्रमाणात प्या असा सल्ला दिलेला आहे आणि शरीराची पाण्याची पूर्ती करायची ती साध्या पाण्याने न करता उकळवून आटवलेल्या पाण्याने किंवा उष्ण गुणांची सूप्स पिऊन करावी याचेही मार्गदर्शन केले आहे. मात्र हा सल्ला न मानता पाण्याचे व थंड गुणांच्या विविध द्रवपदार्थांचे प्राशन करणे हे शरीरामध्ये अनावश्यक ओलावा वाढवण्यास कारणीभूत होते, जे रोगकारक होते यात शंका नाही.

हेही वाचा : चहामध्ये तूप टाकून प्यावे का? आतड्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….

स्वस्थ व्यक्ती आणि आरोग्य

अपवादात्मक असे काही लोक असतात ज्यांना पावसा- पाण्याचा शरीरामध्ये ओलावा वाढण्याचा काहीच त्रास कधीच होत नाही. शरीरामध्ये वाढलेल्या ओलाव्याला आरोग्याला बाधा होऊ न देता शरीराबाहेर कसे काढावे याची त्या शरीरांना सवय असते. अर्थात त्यांच्या शरीराला ओलावा सात्म्य (अनुकूल) झालेला असतो. अशा लोकांची गणना आयुर्वेदाने खर्‍याखुर्‍या स्वस्थ व्यक्तींमध्ये केली आहे, ज्यांना पावसाळा असो, उन्हाळा वा हिवाळा; त्याचा त्यांच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. तेव्हा तुमची गणना त्या ‘स्वस्थ’ व्यक्तींमध्ये होत असेल तर निश्चिंत राहा, अन्यथा पावसातल्या ओलसर-गारव्यापासून स्वतःला जपा!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does moisture increase in the body during monsoon season its effect on body hldc css
Show comments