पावसाळ्यानंतरचा शरद ऋतू हा पित्तप्रकोपाचा काळ. हा काळ मराठी महिन्यांनुसार अश्विन-कार्तिकमध्ये येणे अपेक्षित असते, म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास.मात्र सध्या पृथ्वीच्या कालचक्रामध्ये प्रदूषण आदी अनेक कारणांनी झालेल्या बदलांच्या परिणामी हा शरद ऋतूचा काळ ऑगस्टच्या शेवटी-शेवटी सुरु होतो, असे दिसते. प्रत्यक्षात शरीरामध्ये उष्णता वाढून होणार्या पित्तप्रकोपाच्या विविध तक्रारींनी त्रस्त झालेल्या रुग्णांची सुरुवात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासुनच सुरु होते. पावसाळ्याच्या शेवटी वातावरणातला उष्मा जसजसा वाढत जातो,तसतसा शरीरामध्ये उष्णता वाढून पित्तप्रकोपाचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे उष्णता वाढणारा काळ तो पित्तप्रकोपाचा काळ असे म्हणायला हवे.
वास्तवात वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये अम्ल (आंबट) रसाचा नैसर्गिकतः प्रभाव असतो, ज्याच्या परिणामी शरीरामध्येही आंबट रस वाढतो. सहा रसांमध्ये आंबट सर्वाधिक पित्तप्रकोपक असल्याने आंबट रसाच्या प्रभावामुळे पावसाळ्यातच शरीरामध्ये पित्ताचा संचय होऊ लागतो म्हणजे शरीरामध्ये पित्त वाढू लागते. मात्र पावसाळ्यात वातावरणामध्ये असणारा ओलावा व गारवा शरीरामधील त्या पित्ताला प्रकुपित होऊ देत नाही. पावसाळ्यात शरीरामध्ये जमलेल्या पित्ताचा प्रकोप होतो, शरद ऋतुमध्ये,ज्याचे महत्त्वाचे कारण असते या दिवसांमध्ये वातावरणात वाढणारी उष्णता आणि निसर्गतः प्रबळ होणारा खारट रस.
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बदललेल्या जीवनशैलीचा आजार ‘थायरॉइड’
ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या दिवसांमध्ये समाजाला सर्वाधिक त्रस्त काही करत असेल तर तो म्हणजे उष्णताजन्य पित्तप्रकोप.पित्ताचा प्रकोप म्हणजे शरीरामधील उष्ण तत्वामध्ये झालेली वाढ. या पित्तप्रकोपामुळे लोक वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी या दिवसांमध्ये घेऊन येतात.
ज्यामधील काही महत्त्वाच्या तक्रारी पुढीलप्रमाणे:
रोजचेच जेवण तिखट लागणे (म्हणजे नेहमीप्रमाणेच वरण-आमटी-भाजी वगैरे बनवलेली असतानाही व त्यामध्ये रोजच्याच प्रमाणात तिखटमिरची घातलेली असतानाही ते तिखट लागणे, जिभेला झोंबणे असा याचा अर्थ होतो) अन्नामध्ये नेहमीसारखेच मीठ घातलेले असतानाही ते जेवण खारट लागणे ही तक्रारसुद्धा पित्तप्रकोपाचा धोका सूचित करते.त सेच आंघोळ करताना फ़ारसे गरम नसलेले असे कोमट पाणीसुद्धा त्वचेला गरम वाटणे, सूर्यकिरणे सहन न होणे, उन्हात गेल्यावर डोकं चढणे, या तक्रारीसुद्धा भावी पित्तप्रकोपजन्य आजारांच्या पूर्वसुचना असू शकतात.
वास्तवात या तक्रारी म्हणजे काही आजार नाहीत. यांचा आजच्या वैद्यकशास्त्रामध्ये रोग म्हणून उल्लेखही केलेला नाही.मात्र मनुष्याच्या प्रत्येक लहानसहान तक्रारींना महत्त्व देऊन त्याचा स्वास्थ्य-अस्वास्थ्याशी संबंध जोडणारे आयुर्वेद चिकित्सक या लक्षणांना महत्त्व देतात.कारण या अवस्थेमध्ये शरीरामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात रोग झालेले नसले तरी शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण वाढत आहे,हे ओळखायला हवे. या अवस्थेमध्येच आजार व्यक्त झालेला नसतानाही केवळ लक्षणांवरुन भावी आजाराचे निदान करणे , हे आयुर्वेदतज्ज्ञांनाच शक्य असते.दुसरीकडे सर्वसाधारण व्यक्तींनीसुद्धा आपल्या शरीरामधील या बदलांचे महत्त्व ओळखून आपल्या आहारविहारामध्ये बदल केला तर पुढे जाऊन होऊ शकणा र्या पित्तप्रकोपजन्य(उष्णताजन्य) आजारांना टाळता येईल.