हेमंतातल्या थंडीमध्ये आहाराकडून अपेक्षा असते ती उष्ण गुणाची. उष्ण आहार म्हणजे गरमगरम जेवण जेवावे हा अर्थ झालाच, अर्थात जेवण शिजवल्यावर गरम असतानाच लगेच खावे, जे सहज पचते आणि शरीराला उर्जा देते. पण इथे ‘उष्ण’ या शब्दामधून अजून एक अपेक्षा आहे ती म्हणजे शरीरात उष्णता वाढवणार्‍या आहाराची. हिवाळ्यात प्रामुख्याने आहार शरीराला उष्णता पुरवणारा असा उष्ण गुणांचा असावा, त्याला शीत गुणांच्या आहाराची जोड देण्यासही हरकत नाही. मात्र शीत असो वा उष्ण, आहार शरीराला बल देणारा असावा.

आयुर्वेद शास्त्राने सांगितलेला हिवाळ्यात सेवन करण्यास सांगितलेला गोड आहार हा शीत गुणांचा आहे , तर आंबट व खारट आहार उष्ण गुणांचा आहे, ज्यांच्या सेवनाने शरीराला शीत व उष्ण असा उभय गुणांचा आहार मिळतो. हिवाळ्यात होणारा गोडाचा अतिरेक हा शरीरात थंडावा वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊनच गोडधोड खाण्याला सुश्रुतसंहितेने उष्ण गुणांच्या तिखटाची जोड देण्याचा सल्ला दिलेला आहे. (सुश्रुतसंहिता ६.६४.२७)

उष्ण गुणांचे आहारीय पदार्थ-

शूकधान्ये: बाजरी, जवस (अळशी)

शिंबीधान्ये (कडधान्ये व डाळी): तीळ,कुळीथ,उडीद,पावटे

भाज्या: शेवगा, भेंडी, कडू पडवळ, छोटीवांगी, मुळ्याची पाने, मुळा, घोळु, चुका, मोहरी, करडई, मेथी, आले, लसूण, कांदा, गाजर, चिंच, आमसूल

फळे: करवंद, बेलफळ,संत्रे

तेलबिया: शेंगदाणे,काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, कारळे, अळशी/जवस (अति उष्ण)

मसाल्याचे पदार्थ: मिरची, सुंठ, पिंपळी, पिंपळीमूळ, ओवा, हिंग, हळद, जायपत्री, जायफळ, मिरे (अति उष्ण)

दूधदुभत्याचे पदार्थ: दही, जुने तूप

खाद्यतेल : तीळ, करडई, मोहरी, सूर्यफूल, शेंगदाणा एरंड, अळशी(जवस)

इतर पदार्थ: डिंक, मध

प्रक्रिया: तळलेले, मिरची-तिखट व मसालेयुक्त पदार्थ

मांसाहार: मासे – नदीतले व समुद्रातील मासे उष्ण. त्यातही बांगडा, हलवा (सरंगा), मुशी, तार्ली, वाघळी (स्टिंग रे)
मांस- कोंबडी (त्यातही गावठी कोंबडी)
गावठी कोंबडीचे अंडे, त्यातही अंड्याचा पिवळा बलग
इतर जलचर – खेकडा (अतिशय उष्ण), कोलंबी, कालवं (अति उष्ण), शिंपल्या

Story img Loader