उन्हाळ्याचा उबदारपणा अनेकांसाठी आनंददायक असू शकतो, परंतु तीव्र उष्णता त्रासदायकदेखील असू शकते. अनेकदा तीव्र उष्णतेमुळे डोकेदुखी होऊ शकते. अति उष्णतेमुळे डोकेदुखी का होते हे या लेखात जाणून घेऊ या..

याबाबत सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्लीचे इंटरनल मेडिसिन विभागाचे डायरेक्टर असलेले डॉ. राजीव गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “अति उष्णतेच्या संपर्कात आल्याने निर्जलीकरण (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे) आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, हे दोन्ही डोकेदुखीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

“आपल्या शरीरात घामाद्वारे द्रवपदार्थ कमी होत असल्याने, हे मेंदूच्या कार्यासह विविध कार्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इलेक्ट्रोलाइट्सचे नाजूक संतुलन विस्कळीत करते. हा व्यत्यय एक तीव्र डोकेदुखी म्हणून दिसू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उष्णता आणि आपल्या रक्तवाहिन्या (Heat and your blood vessels)

उष्णतेचा शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होतो, त्याचबरोबर तुमच्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होऊ शकतो. डॉ. गुप्ता स्पष्ट करतात की, “उष्णतेमुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांचा विस्तार (dilation of blood vessels ) होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखीची लक्षणे वाढतात.

“वाढता घाम आणि वाढत्या तापमानासह तुमच्या शरीरावर उष्णतेमुळे तणाव येतो आणि त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. हा ताण तणावग्रस्त डोकेदुखी किंवा अगदी अतिसंवेदनशील लोकांमध्ये मायग्रेन म्हणून दिसू शकतो, त्यामुळे उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी तुमच्या शरीराची जास्त झीज होते आणि डोकेदुखी हा त्रास दर्शविण्याचा मार्ग असू शकतो,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

दररोज डोकेदुखी असू शकते चिंतेचे कारण (Daily headaches: A red flag)

डॉ. गुप्ता यांच्या मते, “उन्हाळ्यात दररोज डोकेदुखीचा अनुभव येणे ही चिंतेची बाब आहे. हे सूचित करते की, “तुमचे शरीर उष्णतेमुळे सतत तणावाखाली असते, ज्यामुळे संभाव्यत: दीर्घकाळ निर्जलीकरण, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि मेंदूमध्ये रक्तवहिन्यांसंबंधी बदलदेखील होतात.

दैनंदिन डोकेदुखीचा तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो आणि ते अंतर्निहित आरोग्य समस्या (underlying health issues) दर्शवू शकतात, ज्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा –Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

उष्णतेवर मात करा, डोकेदुखी दूर करा

डॉ. गुप्ता उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी मौल्यवान सल्ला देतात:

हायड्रेशन महत्त्वाचे आहे : हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर थंड द्रव पेय प्या. पाणी तुमचा सर्वात चांगला मित्र आहे, परंतु इलेक्ट्रोलाइटयुक्त पेयेदेखील उपयुक्त ठरू शकतात.

सावली शोधा आणि थंड व्हा : थेट सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळा. सावली शोधा, वातानुकूलित जागेत विश्रांती घ्या किंवा तुमचे शरीर थंड करण्यासाठी पंखे वापरा.

झोप आणि विश्रांती : झोपेच्या जागी योग्य स्वच्छता राखा आणि पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा. उष्णतेचा ताण हाताळण्यासाठी चांगले विश्रांती घेतलेल्यास शरीराला अधिक आराम मिळतो.

डिहायड्रेटिंग ड्रिंक्स पिणे बंद करा : जास्त प्रमाणात अल्कोहोल आणि कॅफिन टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखी वाढू शकते.

तुमच्या डोळ्यांचे रक्षण करा : उन्हाची झळ कमी करण्यासाठी आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सनग्लासेस घाला, ज्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

हेही वाचा – जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

प्रतिबंध हे सर्वोत्तम औषध आहे. या टिप्स तुमच्या उन्हाळ्याच्या दिनचर्येत समाविष्ट करून तुम्ही उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी लक्षणीयरीत्या कमी करू शकता.