आलिंगन किंवा मिठी ही कृती उबदारपणा आणि दिलासा देणारी भावना निर्माण करते, ज्यामुळे आपल्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. प्रेम आणि बंध निर्माण करण्याची क्षमता असलेली मिठी ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक शक्तीशाली साधन आहे.
ताण कमी करण्यापासून ते भावनिक बंध निर्माण करण्यापर्यंत आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यापर्यंत मिठी मारणे हे आपल्या आयुष्यातील आवश्यक पैलू आहे. मिठी मारणे किंवा आलिंगन देणे आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी महत्त्वाचे का आहे आणि ते आपल्या आयुष्यात फायदेशीर कसे ठरू शकते, याबाबत जाणून घेऊ या.
मिठी मारण्यामागील विज्ञान जाणून घेऊ या…
सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मेहेझाबिन दोर्डी यांनी स्पष्ट केले की, मिठी मारल्यामुळे शरीरामध्ये ऑस्किटोसिन सोडण्यास चालना मिळते, ज्याला ‘लव्ह हॉर्मोन’ आणि ‘बाँडिंग हॉर्मोन’ असे म्हणतात. हे हॉर्मोन्स सामाजिक बंध, भावना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्याने मिठी मारल्यानंतर ऑक्सिटॉनची पातळी वाढल्यामुळे विश्वास आणि सहानुभूतीच्या भावना निर्माण होऊ शकतात.
दोर्डी यांनी सांगितले की, मिठी मारल्यामुळे मेंदूचे बक्षीस केंद्र (brain’s reward centres) सक्रिय होते, विशेषतः वेंट्रल स्ट्रायटम सक्रिय होते. बक्षीस प्रणालीच्या मध्यभागी स्ट्रायटम आहे. मेंदूचा हा भाग आनंद आणि बक्षीस संबंधित भावना निर्माण करतो. हे मिठी मारल्यानंतर सकारात्मक अनुभव निर्माण करते आणि व्यक्तीला सामजिक संवाद आणि शारीरिक जवळीक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करते.
आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मिठी मारणे महत्त्वाचे का आहे ते येथे आहे
मिठी मारण्याचा शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
१) वेदनेपासून आराम मिळतो : शारीरिक स्पर्श, जसे की मसाज किंवा अगदी साधे आलिंगन, शरीरात एंडोर्फिन हॉर्मोन सोडण्यास उत्तेजित करू शकते, जे नैसर्गिकरित्या वेदनाशामक म्हणून काम करते. हे वेदनेची जाणीव कमी करण्यास आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.
२) ताणतणाव कमी करणे : स्पर्शामुळे ऑक्सीटोसिन हॉर्मोनचे उत्सर्जन होते. हा हार्मोन जो कोर्टिसोल हॉर्मोन्सची पातळी कमी करू शकतो आणि तणाव कमी करू शकतो. बऱ्याच काळापासून जाणवणारा तणाव विविध आरोग्य समस्यांशी जोडलेला आहे, म्हणून स्पर्शाद्वारे तणाव कमी केल्यास आरोग्यासाठी दीर्घकाळ लाभ मिळू शकतो.
३) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : संशोधन असे सूचित करते की, आलिंगन यासारख्या सकारात्मक शारीरिक संवादामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. तणाव कमी होणे आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स सोडणे हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात भूमिका बजावू शकते.
४) हृदयाचे आरोग्य: शारीरिक स्पर्श, विशेषतः मिठी मारल्याने रक्तदाब आणि हृदय गती कमी होऊ शकते. कालांतराने हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी चांगले योगदान देऊ शकते.
हेही वाचा – तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….
आलिंगनाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
१) मूड सुधारतो : शारीरिक स्पर्श जसे की मिठी मारणे, यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स सोडले जातात, जे मूड सुधारण्यासाठी मदत करते आणि आनंदाची भावना निर्माण करते आणि एकूण आरोग्य सुधारते. हा मूड सुधारण्याचा नैसर्गिक मार्ग आहे.
२) चिंता आणि नैराश्य कमी करणे : आलिंगन आणि शारीरिक स्पर्श यामुळे आराम आणि भावनिक आधार मिळू शकतो. चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठी हे विशेषतः फायदेशीर असू शकते, कारण ते बंध निर्माण करते आणि सुरक्षिततेची भावना वाढवते.
३) भावनिक बंध निर्माण करते : स्पर्श हा संवादाचे शक्तिशाली साधन आहे. हे प्रेम, सहानुभूती आणि समजून घेण्याची भावना समोरच्यापर्यंत पोहचवते, जे नाते तयार करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आवश्यक असते. भावनिक आरोग्यासाठी चांगले सामजिक बंध निर्माण केले पाहिजे.
४) तणावाचे व्यवस्थापन : नियमित शारीरिक स्पर्श हा तणावाचे व्यवस्थापन करण्याचे साधन म्हणून काम करू शकतो. हे तणावामध्ये शरीराच्या प्रतिक्रिया नियंत्रित करू शकते आणि रोजच्या आयुष्यातील समस्यांचा सामना करण्यासाठी उपयोगी ठरू शकते आणि भावनिक आरोग्यावर दीर्घकालीन तणावाचा प्रभाव कमी करते.
तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मिठी मारताना आलिंगनाची उपचारात्मक शक्ती विसरू नका. तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना दिलेले प्रेम तितकेच अर्थपूर्ण आहे, त्यांनाही प्रेमाने आलिंगन द्या.
लक्षात ठेवा की, स्वत:ला दिले जाणारे आलिंगनही महत्त्वाचे आहे. करुणा आणि प्रेमाने स्वतःला आलिंगन द्या. याचा सुखदायक परिणाम होऊ शकतो, विशेषत: स्वत:वर शंका निर्माण होत असेल किंवा चिंता वाटत असेल त्याक्षणी.
त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला संधी मिळेल, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला प्रेमळ आलिंगन द्या आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम जाणवू शकतो.