Benefits of Daily Hugs : मिठी मारणे ही फक्त एक भावना व्यक्त करण्याची पद्धत नसून, याचे महत्त्व शारीरिक स्पर्शाच्या पलीकडे आहे. वेलएममधील समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सांची शर्मा सांगतात, “मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन उत्सर्जित होतो. या हार्मोनला इंग्रजीमध्ये ‘लव्ह हार्मोन’, असेसुद्धा म्हटले जाते. हा हार्मोन भावनिकदृष्ट्या आपल्याला निरोगी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो. मिठी मारणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
मिठी मारणे आरोग्यासाठी का महत्त्वाचे?
असे म्हणतात, “आपल्याला जगण्यासाठी चार मिठ्यांची, आयुष्य जपण्यासाठी आठ व आयुष्य वाढण्यासाठी १२ मिठ्यांची गरज असते.” मिठी ही भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी शारीरिक स्पर्शाचं महत्त्व सांगते. विशिष्ट आकड्यांचा पुरावा नसला तरी मिठी मारण्याचे अनेक चांगले फायदे आहेत. शर्मा सांगतात की, नियमित प्रेमळ स्पर्श हा भावनिक आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे, आनंद वाढवणे यांसाठी फायदेशीर ठरतो. त्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोन हा महत्त्वाचा घटक आहे.
मिठीचा कालावधीसुद्धा महत्त्वाचा
मिठीचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शर्मा यांच्या मते, २० सेकंदांपेक्षा जास्त काळ मिठी मारत असाल, तर ऑक्सिटोसिन हार्मोन उत्सर्जित होतो आणि त्यामुळे भावनिक आरोग्य सुधारते. जास्त वेळ टिकणारी मिठी अधिक विश्रांती देणारी असते आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीबरोबरचे खास कनेक्शन दिसून येते
कोणाला सर्वांत जास्त मिठीची आवश्यकता असते?
लहान मुले आणि वृद्ध यांना शारीरिक स्पर्शाचा जास्त फायदा होतो. मिठीमुळे लहान मुलांचा भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या विकास होतो. जेव्हा तुम्ही लहान मुलांना मिठी मारता तेव्हा त्यांना प्रेम आणि सुरक्षितता जाणवते. त्याशिवाय वृद्धांमधील एकटेपणा आणि नैराश्याची भावना कमी होते.
मिठी व भावनिक संबंध
हॅण्डशेक किंवा पाठीवर थाप दिल्याने सामाजिक संबंध निर्माण होऊ शकतात. पण, सांची शर्मा सांगतात की, मिठी ही अत्यंत प्रभावशाली आहे. मिठी मारल्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडतो आणि तुमचे भावनिक संबंध आणखी दृढ होतात. त्याशिवाय जवळीक साधण्यासाठी आणि प्रेम व समर्थन व्यक्त करण्यासाठी मिठी अधिक प्रभावी ठरते.
मिठी मारण्याच्या फायद्यांबद्दल तुम्ही खुले संभाषण किंवा चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मिठी मारणे हे केवळ भावना व्यक्त करण्याचे माध्यम नसून, ते मानसिक आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे व नातेसंबंध दृढ करणे यांसाठी एक प्रभावशाली पर्याय आहे.