Health Special: बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ असणाऱ्या फणसाचं महाराष्ट्रीय आहारात विशेष महत्व आहे. फणस म्हटलं की मुंबईत अनेक ठिकाणी थेट गरेचं विकले जातात. कारण फणस कापून गरे काढणं वेळेअभावी खूप मोठं काम होऊन जातं. वनस्पतीजन्य आहाराचे प्रमाण वाढलेले असताना फणसाच्या गऱ्यांचे महत्व विगन आहारातदेखील वाढलेले आहे. मागील लेखात आपण फणसाच्या बियांबद्दल वाचलं. या लेखात गऱ्यांबद्दल जाणून घेऊ.
प्लान्ट मीट
फणसाचे गरे अनेक महाराष्ट्रीय घरांतून आवडीने खाल्ले जातात. फणसाला विविध भाषांमध्ये आणि विविध ठिकाणी विविध नावे आहेत. हिंदीमध्ये कठाळ , थाई भाषेत कनान , इंडोनेशिया, मलेशिया मध्ये नन्गका, पोर्तुगीजमध्ये जका आणि कॅरेबिअन बेटावर प्लान्ट मीट (वनस्पतीजन्य मांस) अशा वेगेवेगळ्या नावांनी फणस ओळखला जातो. फणस हे झाडावर वाढणारे जगातील सर्वात मोठे फळ आहे. एखादे फणसाचे झाड वर्षाला २००-३०० फळं देऊ शकते, तसेच फणसाच्या झाडावर वातावरणातील बदल किंवा कमी पाण्यामुळे वाढीवर परिणाम होत नाही.
हेही वाचा…Health Special: वर्षाऋतूमधील आहार
गऱ्यांवर पाणी पिणे टाळावे
लहानपणी आजोळी पिवळेधम्मक, टापटीप गरे खाताना मौज येई . कापा फणसाचे गरे मोठाले, स्वच्छ आणि कोरडे असत. २-४ गरे खाल्ले तरी पोट भरून जाई. बरका गरा खाताना मात्र त्याची रसदार चव सुरुवातीला बरी पण तोचतोचपणा वाटत असे. शिवाय त्याची गोड गिळगिळीत चव कमी व्हावी म्हणून पाणी प्यायची देखील सोय नाही. त्यामुळे बरका गरा खायला मला थोडा कंटाळा येई. फणस खायला सुरुवात केली आणि आम्ही लहानगे पाणी प्यायला वळलो हे लक्षात आलं की “गऱ्यावर पाणी पिऊ नको पोटात दुखेल” असा आजीचा विनंतीवजा सल्ला असे. त्याकडे दुर्लक्ष करून पाणी प्यावसे वाटे, पण हिम्मत होत नसे. गऱ्यावर चुकून पाणी प्यायलोय आणि पोटदुखी सुरु झाल्याची अनेक उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे तो मोह आवरला जात असे.
पोटात का दुखतं?
गरे खाऊन पाणी प्यायल्यावर पोटात का बरं दुखत असेल, हा प्रश्न मला कायम सतावत असायचा. आहारशास्त्राचा अभ्यास करताना त्याबद्दल वैज्ञानिक कारण लक्षात आलं. फणसात कर्बोदकांचे प्रमाण उत्तम असते, त्यापैकी फणसात असणारे फ्रुक्टन्स आतड्यात गॅसेस तयार करू शकते. ज्यामुळे फणसावर लगेच पाणी प्यायल्या फ्रुक्टन्स आणि आतड्यातील संप्रेरके दुपटीने कार्यरत होऊन पोटदुखीला कारणीभूत ठरू शकतात.
अतिरेकी झोप
काही लोकांमध्ये फणस जास्त खाल्ल्याने अतिरेकी झोप येण्याचे प्रमाणदेखील वाढलेले दिसते.
विगन मीट
आता फणसातील काही पोषणतत्त्वांबद्दल जाणून घेऊ. १०० ग्राम फणसामध्ये दैनंदिन आवश्यकतेच्या २५% इतकं क जीवनसत्त्व असतं. तसेच १५% इतकं पोटॅशिअम असतं. सध्या विगन आहार पद्धती अवलंबिणाऱ्यांसाठी कच्च्या फणसाची भाजी “विगन मीट” म्हणजे मांसाहाराला पर्याय म्हणून खाल्ली जाते.
कच्चा फणस शिजवून खाल्ल्यास पचायला हलका आणि चविष्ट असतो. शिवाय कच्च्या फणसाची भाजी जितक्या कमी जिन्नसांचा वापर करून तयार केली जाईल तितकी जास्त चवदार असते. सहसा तेल, काळे तीळ आणि कांदा इतकेच पदार्थ या भाजीसाठी वापरले जातात. ऊर्जेने भरपूर आणि मॅग्नेशिअम, लोह यांनी युक्त अशी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे.
हेही वाचा…Health Special: पावसाळ्यात थंडी असूनही हिवाळ्याप्रमाणे भूक का लागत नाही?
दृष्टीसाठी उत्तम
महाराष्ट्रातील तसेच पश्चिम किनारपट्टीवरील काही भागात नारळाच्या दुधासोबत किंवा ओल्या नारळासोबत कच्च्या फणसाची आणि फणसाच्या गऱ्यांची भाजी केली जाते. फणसातील ल्युटीन, झियाझानथिन, कॅरोटिनॉइड्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. किंबहुना वयपरत्वे दृष्टी कमी होऊ नये, म्हणून फणसाचे गारे आहारात असणे आवश्यक आहे. फणसात असणारे तंतुमय पदार्थ पाचक मानले जातात. मलावरोध रोखण्यासाठी फणस खाणे उपयुक्त ठरते. अनेकदा आहार नियमन करताना फणसाचे काप, गऱ्यांचे चिप्स खाण्याबद्दल प्रश्न विचारले जातात.
कर्करोगाला प्रतिबंध
फणसातील जॅकलिन आणि सॅपोनीन यामुळे कोणत्याही प्रकारच्या ट्युमरची वाढ होत नाही आणि कर्करोग प्रतिबंधासाठी देखील फणस औषधी मानला जातो. फणस फळ म्हणून खाताना मिळणारे पोषक फायदे तळण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारण शून्य होऊन जातात. फणसात असणार क जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी होतं. व्यायाम करणाऱ्यांसाठी उत्तम ऊर्जा देणार तसेच बऱ्याच अंशी ब जीवनसत्त्वाचं अधिक प्रमाण असणारा फणस खेळाडूंसाठी मात्र अत्यंत उपयुक्त फळ आहे.
हेही वाचा…Health Special: पावसाळ्यात अपचनाचा त्रास अधिक का होतो?
कच्च्या फणसात जीवनसत्त्व
कच्च्या फणसाला स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे त्याची भाजी करताना तेलबिया आणि तिखट यांचा माफक वापर त्याची चव आपल्याला हवी तशी करून तो खाता येतो. शिवाय त्यापासून विविध पदार्थ तयार करताना एकत्र केलेल्या भाज्यांतील पोषणतत्त्वांवर देखील फणसातील पोषणतत्त्वे अडथळा आणत नाहीत. फणसाचे गरे खाताना मात्र सोबत कोणतेही फळ सोबत खाणे आवर्जून टाळावे.
वनस्पतीजन्य आहार करू इच्छिणाऱ्यांसाठी फणस सगळ्याच पोषकतत्त्वांसाठी उत्तम पदार्थ आहे. फणसाच्या गऱ्यांचे त्यातील पाणी काढून तयार केले जाणारे पीठ, बियांपासून तयार केले जाणारे पीठ शाकाहारी आहारात पोषक मानले जाते.