उन्हाळ्यानंतर जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते, तो काळ ‘प्रावृट्‌ ऋतु’ या नावाने ओळखला जातो. ‘प्रावृट्‌ इति प्रथमः प्रवृष्टे काल:’ प्रथम वृष्टी होणारा काळ, या अर्थाने ज्या दिवसांमध्ये पहिला पाऊस पडतो, त्या ऋतु-काळाला प्रावृष किंवा प्रावृट्‌ म्हणतात. हा काळ मराठी महिन्यांनुसार आषाढ-श्रावण महिन्यांचा आणि आधुनिक कॅलेंडरनुसार साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही सुरू होतो, अर्थातच ते पहिल्या पावसाचे दिवस असतात. प्रावृट्‌ ऋतूचा वेगळा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या काळाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण वर्षाच्या तुलनेत आपले आरोग्य या ऋतूमध्ये सर्वाधिक बिघडते. त्यामुळे हा एक काळ असा आहे, जेव्हा स्वास्थ्यसंबंधित या नाही तर त्या अशा तक्रारींनी सगळे लोक त्रस्त असतात. “आला पावसाळा …आरोग्य सांभाळा” असे जे म्हटले जाते, ते पाऊस सुरु झाला की, प्रत्यक्षातही अनुभवास येते. घराघरातून लोक या नाही तर त्या, शारीरिक तक्रारीने त्रस्त असतात; कोणी सर्दीतापाने, तर कोणी खोकल्याने, कोणी पोटदुखीने तर कोणी जुलाब-आमांशाने! कुणाला अम्लपित्ताचा त्रास तर कोणाला अपचनाचा.

एक म्हणतो मलावरोध होतोय, तर दुसरा हगवणीने त्रासलेला. वाताच्या तक्रारींबद्दल तर विचारू नका. सांधे दुखतायत, कंबर दुखतेय, खांदा आखडलाय, सकाळी मूठ मिटता येत नाही, गुडघे आखडतात… असे त्या सांधे-स्नायु-नसांच्या तक्रारींनी सगळेच त्रस्त असतात. म्हणूनच तर ज्यांना वाताचे त्रास नेहमीच होत असतात, त्या ज्येष्ठ नागरिकांना पावसाळा म्हणजे तर कर्दनकाळ वाटतो.

हेही वाचा… Health Special: पावसाळी वातावरणाचा आणि शरीरातील हार्मोन्सचा काय संबंध?

हीच गोष्ट श्वसनविकाराच्या रुग्णांनाही लागू आहे. पावसाळा येणार म्हटले की श्वसनविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या छातीत धडकी भरते. सर्दीतापाने आजारी पडणार्‍या मंडळींना तर पहिल्या पावसाच्या दर्शनानेच हुडहुडी भरु लागते. या दिवसांमध्ये संपूर्ण समाज आजाराने ग्रस्त असला तरी समाजामधील एक घटक मात्र खूश असतो, तो म्हणजे डॉक्टर! या दिवसांमध्ये डॉक्टरांचे दवाखाने रुग्णांच्या गर्दीने तुडूंब भरलेले असतात आणि डॉक्टरसुद्धा आपल्या जेवण्याखाण्याची, आरोग्याची तमा न करता त्या रुग्णांच्या सेवेमध्ये मग्न असतात. पण हे झाले रोगांच्या उपचाराबद्दल. मुळात पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोग का होतात? त्याची कारणे काय? पावसाळ्यात स्वास्थ्य बिघडण्याची कारणे एक नाही अनेक आहेत.

त्रिदोषांच्या विकृतीचा काळ

संपूर्ण वर्षाच्या ऋतूचक्राचा विचार करता थंडीनंतरच्या वसंत ऋतूमध्ये कफदोषाचा प्रकोप, पावसाळ्यानंतरच्या शरद ऋतूच्या उन्हाळ्यात पित्त दोषाचा प्रकोप आणि पावसाळा म्हणजे वर्षाऋतूमध्ये वात दोषाचा प्रकोप होतो. मात्र संपूर्ण वर्षामध्ये पावसाळ्याच्या आरंभीचे काही आठवडे (प्रावृट्काल) हा एकच काळ असा आहे, जेव्हा वात-पित्त- कफ या तीनही दोषांचा प्रकोप होतो. अन्य ऋतूंच्या तुलनेमध्ये या काळाचे हे एक वैशिष्ट्य म्हणायला हवे. अर्थात हे वैशिष्ट्य मानवी शरीरासाठी रोगकारक आहे.

जमिनीतून निघणारी वाफ आरोग्याला बाधक!

प्रावृट्‌ काळामध्ये तीनही दोषांचा प्रकोप का होतो? याचे स्पष्टीकरण देताना आयुर्वेद-आचार्य म्हणतात,उन्हाळ्यातील कडक उन्हाने तापलेल्या व कोरड्या-रखरखीत झालेल्या जमिनीवर जेव्हा पावसाचे थेंब पडू लागतात, तेव्हा जमिनीतून वाफा निघू लागतात. या वाफा आरोग्याला बाधक असतात. याचा अर्थ पहिल्या पावसानंतर जो मातीचा एक वेगळाच हवाहवासा वाटणारा सुगंध सर्वत्र पसरतो, त्यासोबत वाहून येणारे बाष्प काही आरोग्याला पोषक नसते. किंबहुना पाऊस पडू लागल्यावर जमिनीतून येणार्‍या त्या वाफा आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत होतात, असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.

आयुर्वेदानुसार त्या वाफांमुळे, कालप्रभावामुळे आणि पाणी अम्लविपाकी (पचनानंतर शरीरावर आंबट परिणाम दाखवणारे) झाल्यामुळे पित्त दूषित होते, ज्यामुळे शरीरामधील अग्नी व संपूर्ण चयापचय बिघडते. त्याच्या परिणामी शरीरामधील तीनही दोष दूषित होतात आणि तीनही दोषांची विकृती हे अस्वास्थ्याचे कारण बनते.

हेही वाचा… Health Special: कोड असलेल्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी? (उत्तरार्ध)

पावसाळ्यात तीनही दोष कसे कोपतात? वर सांगितल्याप्रमाणे पाऊस पडल्यावर जमिनीतून निघणारी वाफ हे तीनही दोष कोपण्याचे महत्त्वाचे कारण. ढगांमधून होणारा पाण्याचा वर्षाव हा वात व कफ यांना वाढवतो. पाण्याचा अम्ल (आंबट) विपाक पित्ताला व कफालासुद्धा वाढवतो. याशिवाय जमिनीतून येणारी वाफ, पाण्याचा आंबटपणा व गढूळपणा यामुळे दुर्बल (मंद) झालेला अग्नीसुद्धा दोषांना प्रकुपित करतो. त्यातही अग्नी मंद असल्याने अन्नाचे योग्य पचन न झाल्याने कफ वाढतो, अन्नाचा विदाह झाल्याने पित्त वाढते तर अपचनामुळे पोषक आहाररस व्यवस्थित तयार न झाल्याने शरीरधातुंचे पोषण न झाल्याने शरीरघटकांची (देहधातुंची) झीज होते, जी वातप्रकोपाला कारणीभूत ठरते.

उन्हाळ्यानंतर आकाश पाण्याने भरलेल्या ढगांनी आच्छादित झाल्याने (आणि त्यामुळे सूर्यकिरणे सृष्टीवर पडत नसल्याने), पाण्याच्या तुषारांनी युक्त असे गार वारे अचानक वाहू लागल्याने, पाऊस पडू लागल्यानंतर जमिनीमधून निघणार्‍या वाफांमुळे, पाणी अम्लविपाकी व मलिन झाल्याने आणि मानवी शरीरांमधील अग्नी मंद झाल्यामुळे शरीरामध्ये वात-पित्त-कफ हे तीनही दोष विकृत होतात, तर वात-पित्त-कफ दूषित झाल्यावर अग्नीला मंद करतात. ही परस्परांना दूषित करण्याची प्रक्रिया एखाद्या दुष्ट चक्राप्रमाणे होत राहते,जे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य बिघडवते.

हेही वाचा… Mental Health Special: अभ्यास नको; युट्यूबच आवडतं? असं का?

वात-पित्त-कफ ही आयुर्वेदाने तीन शरीरसंचालक तत्त्वे मानली आहेत, जी विकृत होणे, म्हणजे अनारोग्य. जेव्हा एखादा दोष विकृत होतो, तेव्हा त्या दोषामुळे शरीराचे आरोग्य बिघडण्याची, त्या दोषासंबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. प्रावृट् ऋतुमध्ये (पावसाळ्याच्या आरंभी) तीनही दोष विकृत असल्याने आरोग्य सर्वाधिक ढासळते. पाऊस सुरू झाल्यानंतर जवळपास संपूर्ण समाज या नाही तर त्या तक्रारीने ग्रस्त असतो,त्याचे हे एक वेगळे स्पष्टीकरण आपल्या पूर्वजांनी दिले आहे. या काळामधील गढूळ पाणी, दूषित हवा, अनारोग्यकर वातावरण व त्यापायी रोगजंतूंचा फ़ैलाव, चुकीचा आहार ही अस्वास्थ्याची कारणे तर आपल्याला ज्ञात आहेतच. मात्र हजारो वर्षे निसर्गाचे निरिक्षण करुन मग निष्कर्ष काढणार्‍या आपल्या पूर्वजांच्या या मताकडे अशास्त्रीय मत म्हणून दुर्लक्ष न करता त्यावर विचार व्हायला हवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the incidence of health deterioration the highest in the year at the beginning of the rainy season hldc dvr
Show comments