शरदातला (ऑक्टोबर हिटचा) उष्मा कमी होऊन हळूहळू थंडीचा सुगावा लागू लागला की समजावं हेमंत ऋतू सुरु होत आहे. प्रत्यक्ष थंडी सुरु होण्याआधी काही लक्षणांवरुन थंडीचे आगमन ओळखता येते. त्यातले महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. तुमच्या शरीराची त्वचा कोरडी पडू लागली की समजावे लवकरच थंडी येणार आहे. त्यातही या दिवसांत पायांची त्वचा अधिक कोरडी पडते. हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यांचा संधीकाळ आहे, म्हणजे ऑक्टोबर हिटचा उष्मा संपतानाचा आणि डिसेंबरची थंडी सुरु होतानाचा संगमकाळ. या दोन ऋतूंच्या संधीकाळाला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे, ज्याला आपल्या परंपरेने ‘यमदंष्ट्रा’ म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

//यमदंष्ट्रा स्वसा च प्रोक्ता//

वरील सूत्राचा अर्थ होतो यमदंष्ट्रा काळ हा वैद्यांसाठी बहिणीसारखा आहे. यमदंष्ट्रा म्हणजे नेमका कोणता काळ? तर, कार्तिक महिन्याचे शेवटचे आठ दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले आठ दिवस हे दिवस. या संधिकाळाला (या पंधरवड्याला) ‘यमदंष्ट्रा’ म्हणतात आणि या पंधरवड्याच्या काळाला वैद्यमंडळींसाठी बहिणीसारखा आहे, असे आपली परंपरा म्हणते. का, तर या काळामध्ये आजार खूप वाढतात आणि रुग्णसंख्या वाढून वैद्यांचा व्यवसाय जोरात चालू लागतो, म्हणून बहीण जशी भावाची काळजी घेते, तसा वैद्यांना रुग्ण पुरवून त्यांची बहिणीसारखी काळजी घेणारा असा हा काळ आहे.

हेही वाचा… Health Special: कोणत्या चटण्या, केव्हा वापराल?

शरद आणि हेमंत हे उभय ऋतू हे विसर्गकाळातले म्हणजे शरीराचे बल वाढवणार्‍या काळातले असले तरी शरद हा उष्ण ऋतू आहे, तर हेमंत हा शीत शरदात असतो ऑक्टोबरचा उष्मा, तर हेमंतात असतो हिवाळ्यातला थंडावा. साहजिकच या दोन ऋतूंचा संधीकाळ म्हणजे उष्मा आणि थंडाव्याचा संधीकाळ होतो, जो रोगकारक होण्याची शक्यता दाट असते. वातावरणात, सभोवतालच्या तापमानात झालेला बदल शरीराला उपकारक होत नाही, त्यात जर हा बदल हळूहळू झाला तरी शरीराला तो काही प्रमाणात तरी सात्म्य (अनुकूल) होऊ शकतो, मात्र तसे न होता एक-दोन दिवसांत अचानक बदल झाला आणि उन्हाळा थांबून थंडावा सुरु झाला म्हणून तुम्ही शरदातल्या उष्म्याला अनुरूप आहारविहार करत होतात त्यात अचानक बदल केलात तर ते बदल शरीराला बाधक आणि रोगनिर्मितीला पोषक होतात. या दिवसांत आजार वाढतात ते या कारणांमुळे.

ऋतूसंधीकाळाचे महत्व

केवळ ऋतू बदलला तरी सर्दी होते, ताप येतो, पोट खराब होते, अशक्तपणा जाणवतो, बरं वाटत नाही ; एकंदर काय तर एकंदर काय सीझन बदलला की आरोग्य बिघडते असे सांगणारे अनेक लोक असतात. बायोमटिरिऑलोऑजिस्टच्या मते वातावरणामध्ये अचानक होणारा बदल मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो, ज्यामुळे सर्दीतापासारख्या विषाणूजन्य आजारांचे विषाणू शरीरामध्ये अनेकपटींनी वाढतात. प्रतिकार करणार्‍या पांढर्‍या पेशींची विषाणूंशी लढण्याची क्षमता घटलेली असल्याने लढाईमध्ये विषाणू जिंकतात व सर्दी-तापाचा त्रास सुरु होतो. आधुनिक तज्ज्ञांचे हे मत योग्य असले तरी परिपूर्ण नाही. कारण पांढर्‍या पेशींची लढण्याची क्षमता याच दिवसांत का घटते? याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. दुसरं म्हणजे सगळेच आजार काही जीवाणू-विषाणूंमुळे होतात असं नाही. ऋतू बदलताना होणार्‍या इतर आरोग्य-समस्यांमागची कारणे काय? त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा संबंध ,वास्तवात आरोग्य बिघडण्याचा संबंध ज्या आहाराशी, विहाराशी, निद्रेशी, ब्रह्मचर्याशी, व्यायामाशी व मानवी आयुष्याशी निगडीत अनेक मुद्यांशी आहे, त्या मुद्यांकडे आज दुर्लक्ष झालेले दिसते, ज्या मुद्यांना आयुर्वेदाने मात्र नितांत महत्त्व दिले आहे.

ऋतूसंधीकाळ आणि अस्वास्थ्य

’ऋतूमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे काश्यपसंहितेने शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे. ऋतूसंधीकाळामध्ये शरीर एकीकडे पहिल्या ऋतूच्या मार्गिकेवरून पुढच्या ऋतूच्या मार्गिकेवर कसे जायचे, या चिंतेमध्ये बाहेर बदलणार्‍या वातावरणाशी जुळवून घेण्यात व्यस्त. त्यात तुम्ही जेव्हा आहारविहारामध्येही अकस्मात बदल करता तेव्हा तो बदल तर शरीराला अजिबात अनुकूल होत नाही. शरीराची अपेक्षा ही की निदान आहारविहार तरी अनुकूल होईल तर माझे बाहेरच्या वातवरणाशी लढण्याचे काम सुलभ होईल. पण तुम्ही आहारविहारात घाईगडबडीने बदल करुन अजूनच काम बिघडवून ठेवता.

उन्हाळा सुरू झाला की लगेच चालले आईस्क्रीम खायला, लागलीच थंडगार पाणी प्यायला सुरुवात, गार पाण्याची आंघोळ, पाऊस सुरु झाला की लगेच गरम गरम चहा, गरम भजी, गरम पाण्याची आंघोळ. हिवाळा सुरु झाला की लगेच गरम-गरम पाण्याची आंघोळ, गरम चहा-कॉफी, आलं-मिरं टाकून चहा, तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण, मांसाहाराची रेलचेल. ऋतू बदलला की हे आहारविहारामध्ये केलेले अकस्मात बदल तुम्हाला कितीही सुखावह वाटतं असले तरी त्यामुळे शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेमध्ये बिघाड होतो, चयापचय बिघडतो, अग्नी मंदावतो, रोगप्रतिकारक्षमता कमजोर होते, एकंदरच आरोग्य खालावते. थोडक्यात तुम्ही ऋतूसंधीकालामध्ये आहारविहारामध्ये केलेला बदल शरीराला अनुकूल तर होत नाहीच, मात्र त्याचवेळी तो रोगजंतूंना अनुकूल ठरतो व रोगजंतूंचा शरीरामध्ये प्रवेश सुकर होतो. जे घटक एरवी रोगजंतूंना शरीरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात, ते घटक दुर्बल झालेले असल्याने रोगजंतूंचा शरीरामध्ये सहजी प्रवेश होतो आणि त्यांची वाढ व प्रसारही झपाट्याने होतो. बाहेरचे वातावरण प्रतिकूल, आतले वातावरण अनुकूल नाही आणि त्यामध्ये शरीरामध्ये रोगजंतू वाढलेले. काय होणार या स्थितीमध्ये? शरीराचे स्वास्थ्य खालावून आजार बळावणारच ना!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is time between seasonal change harmful to health hldc dvr
Show comments