हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात आपल्याला आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. खास करून मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः हिवाळ्यात मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. मधुमेही रुग्णांना हिवाळ्यात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस देशभरात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सर्व रुग्णांनी थंडीच्या दिवसात विशेष काळजी घ्यायची गरज आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी थंड हवामान थोडे कठीण होते, कारण थंड हवामानात हृदयावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. रक्तातील असंतुलित साखरेची पातळी शरीराच्या अनेक अवयवांवर प्रतिकूल परिणाम करते. मधुमेहाचा शरीरावरील प्रत्येक भागावर परिणाम होतो. डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी इंडियन एक्स्प्रेसला हिवाळ्यात मधुमेह रुग्णांनी काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली आहे.
डॉक्टर सांगतात, मधुमेह हा झपाट्याने पसरणारा कोणताही कायमस्वरूपी इलाज नसलेला आजार आहे. हिवाळ्याचा ऋतू सुरू असल्याने या हंगामात मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थंड हवामानात शारीरिक हालचाल खूप कमी होत असल्याने अनेक मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी वाढते. हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि व्यायामाची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते सांगतात.
(हे ही वाचा : करोनाची लागण झालेल्यांना हार्ट अटॅकचा अधिक धोका? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या विधानावर डॉक्टर काय म्हणतात… )
अति स्थूलता, बैठी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळेही मधुमेह होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याने नेहमी आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आहारामध्ये काही प्रमाणात बदल केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. आहार नियोजन मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, असे ते सांगतात. डायबिटीज असलेल्यांनी हिवाळ्यात त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात साखरेची पातळी कमी करण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा, असे डॉक्टर सांगतात. कोणत्या आहेत त्या पद्धती जाणून घेऊया…
- डॉक्टर सांगतात, हिवाळ्यात घराभोवती फिरणे यासारखे इनडोअर व्यायाम पर्याय शोधा. व्यायाम, योगा करा.
- संतुलित आहार घ्या. आपल्या आहारात फळे, पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करा.
- पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून भरपूर पाणी प्या..
- हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवा. या वातावरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गार वारं लागणार नाही याकडे लक्ष द्या.
डॉक्टर म्हणतात, योग्य व्यवस्थापन आणि काही जीवनशैलीत बदल करून तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारापासून त्यांच्या दैनंदिन दिनचर्येपर्यंत त्यांच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.