Neil Nitin Mukesh Eating Habits : सिनेअभिनेत्यांच्या डाएट किंवा फिटनेसविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी आवडतं. अनेकदा मुलाखतीदरम्यान अभिनेते त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात. खाण्याच्या आवडी-निवडीपासून त्यांच्या आयुष्यातील फिटनेसचे महत्त्व सांगतात. बॉलीवूड अभिनेता नील नितीन मुकेशने अलीकडेच कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खाद्यपदार्थांच्या आवडीविषयी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४३ वर्षीय नील नितीन मुकेश म्हणाला, “पचनाच्या समस्येमुळे मी वेळेवर जेवण करतो. अनेक वर्षांपासून मला अॅसिड रिफ्लक्सची समस्या आहे. मला जीईआरडी (Gastroesophageal reflux disease) आहे, त्यामुळे मला दर दोन तासांनी खावे लागते.”

नील त्याच्या आवडीच्या पदार्थाविषयी सांगतो की त्याला गुजराती चुंडो (लोणच्याचा प्रकार) इतके आवडतात की काकू त्याच्यासाठी जवळपास ८-१० किलो चुंडो बनवते. चुंडो तो पिझ्झासह सर्व पदार्थांबरोबर खातो. त्याला ते खूप आवडते.

अॅसिड रिफ्लक्सला हायपर ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार (GERD)सुद्धा म्हणतात. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे ही समस्या उद्भवते. “शरीरात खूप जास्त अॅसिड निर्माण होते ज्यामुळे पोटाच्या आतील सर्वात वरची लेअर खराब होते. “, पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार डॉ सुधीर जाधव सांगतात.

अनेक प्रकरणामध्ये शरीरात अॅसिड निर्माण झाल्यामुळे सतत ढेकर येणे, घसा किंवा छातीत दुखणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात.

“अॅसिड रिफ्ल्क्सची समस्या दूर करण्यासाठी दिवसभर सतत थोडे थोडे खाणे फायदेशीर ठरू शकते यामुळे पोट पूर्णपणे भरलेले राहत नाही आणि रिकामे सुद्धा राहत नाही.”, मुंबईतील ग्लेनेगल हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार, डॉ. मेघराज इंगळे सांगतात.

“जर तुमचे पोट खूप भरलेले किंवा रिकामे असेल तर शरीरात ॲसिड तयार होऊ शकते, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवते”, डॉ इंगळे पुढे सांगतात.

“जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ काहीही खात नाही तेव्हा पोटातील अॅसिड अन्ननलिकेत जमा होऊ शकते. ज्यामुळे छातीत जळजळ आणि तीव्र अस्वस्थपणा जाणवू शकतो. याशिवाय खूप जास्त जेवण केल्याने सुद्धा असेच होऊ शकते. तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ खाल्यामुळे अॅसिडवरच्या दिशेने नेताना पोटावर दाब निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडची पातळी स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून वारंवार थोडे थोडे खाण्याचा सल्ला दिला जातो.” डॉ इंगळे सांगतात. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते आणि अॅसिड रिफ्लक्सचा त्रास कमी होतो.

कशी काळजी घ्यावी?

डॉ. इंगळे सांगतात, “हलके आणि मसालेदार नसलेले पदार्थ खा. यामुळे अॅसिड रिल्फ्क्सची समस्या टाळता येतात.

हलके पदार्थ पचायला सोपी असतात. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. अन्न हळू हळू आणि चावून खा. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही. या खाण्याच्या पद्धती अंगीकारल्या तर मध्यरात्री भूक लागत नाही ज्यामुळे अॅसिड रिफ्ल्क्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते.
जर प्रयत्न करूनही अॅसिड रिफ्ल्क्सची समस्या दूर होत नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुमची आरोग्याची स्थिती तपासून त्यानुसार उपचार सुचवू शकतात.