आपण सेवन केलेल्या अन्नावर पचन-प्रक्रिया व्यवस्थित न झाल्याने अर्धवट पचन झालेला कच्चा आहार-रस(आम) तयार होतो, हा आम आहाररस शरीर-धातुंचे अपुरे- अयोग्य पोषण करत असल्याने सकस शरीर-धातू तयार होत नाहीत, असे निर्बल शरीर- धातू हे रोगांना सहज बळी पडतात, थोडक्यात आम हे अनेक रोगांचे कारण होऊ शकते. मग या आमाचा उपचार कसा करायचा? शरीराच्या सूक्ष्माहूनही सूक्ष्म अशा शरीरकोशांमध्ये लपलेला आम नष्ट करण्याचा सोपा उपाय म्हणजे लंघन अर्थात उपवास.
मानवाला जर्जर करणार्या विविध आजारांना प्रतिबंध करण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे, ती म्हणजे उपवास अर्थात अन्नसेवनाचा त्याग, ज्याला आयुर्वेदाने लंघन चिकित्सा असे नाव दिले आहे. (आमप्रदोषजानां पुनर्विकाराणां अपतर्पणेनैवोपशमो भवति ׀׀ चरकसंहिता ३.२.१३)
हेही वाचा… रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी किती तासांची झोप घ्यावी? संशोधनातून काय आले समोर वाचा
लंघन कोणी करावे?
आयुर्वेदशास्त्राने लंघन ही एक अतिशय प्रभावी चिकित्सा आहे असे सांगून नेमक्या कोणाला लंघन उपयोगी पडते, तेसुद्धा सांगितले आहे. ते जाणून घेतल्यास आज २१व्या शतकात लंघनाची (उपवासाची) का गरज आहे, ते सुद्धा वाचकांच्या लक्षात येईल.
- जी व्यक्ती तेल,तूप,लोणी,मलई,मावा आदी स्नेहयुक्त पदार्थांचे नित्यनेमाने सेवन करते
- ज्याच्या आहारामध्ये वारंवार गोडधोड असते व जो साखरेचे नित्य सेवन करतो. (‘आम्ही गोड खात नाही’ असे म्हणणार्यांनी सहसा चहा-कॉफी, चॉकलेट्स- बिस्किटे, सरबते-कोला, सॉस-जॅम, बीअर-व्हिस्की वगैरे पदार्थांमधून शरीरात जाणारी साखर लक्षात घेतलेली नसते.)
- जे नवीन अन्न (जे धान्य उगवून सहा महिने उलटलेले नाहीत असे धान्य- कडधान्य वगैरे) सेवन करतात.
- जे योग्य प्रकारे न मुरलेले असे नवीन मद्य पितात.
- जे दूधदुभत्याचे नित्य सेवन करतात. उदाहरणार्थ -दूध, दही, ताक, लोणी, तूप, लस्सी, चीज, श्रीखंड, बासुंदी, मावा, मिठाई, आईस्क्रीम वगैरे.
- जे पाण्यामधील वा पाणथळ प्रदेशामधील प्राण्यांचे मांस सेवन करतात. उदाहरणार्थ- मासे, कवचयुक्त जीव (कोलंबी-खेकडा- कालवं इ.), बदक, डुक्कर, कासव, बेडूक वगैरे.
- जे नित्य मद्यपान करतात.
- जे पिष्टान्नाचे नित्य सेवन करतात. पिष्टान्न म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी आदी धान्यांचे पीठ तयार करून त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, जसे- भाकरी,चपाती, पराठा, रोटी, डोसा, इडली, पाव, बिस्किटे ,केक आदी.
- वरील अन्नपदार्थांचे सेवन करत असुनही ज्यांच्याकडून परिश्रम-व्यायाम होत नाहीत.
- जे कष्ट करून घाम गाळत नाहीत
- ज्यांना हालचाली करणे आवडत नाही (व्यायामाचा कंटाळा)
- जे दिवसा झोपतात
- ज्यांची शय्या वा आसन मऊ-गुबगुबीत व आरामशीर असते
- जे दिवसभर एकाच जागेवर बसुन असतात.
- जे व्यर्थ चिंतेचा भार डोक्यावर वाहातात.
वरील सर्व कारणे ज्यांना लागू होतात, त्यांनी नियमित लंघन केले पाहिजे, असे आयुर्वेदाने ठोसपणे सांगितले आहे. आता मला सांगा की वरीलपैकी कोणती कारणे तुम्हाला लागू होत नाहीत? कारण २१व्या शतकातल्या आपल्याला यामधील एक नाही तर अनेक कारणे लागू होतातच होतात! या जीवनशैलीमधील चुकांमुळेच तर अनेक आजारांमध्ये आपला पहिला क्रमांक आहे. हे आजार टाळण्याचा सहजसाध्य उपाय म्हणजे उपवास (लंघन)!