नलिन बऱ्याच दिवसात क्लिनिकला आला. काही महिन्यांपूर्वी ज्या अवस्थेत तो आलेला तशाच अवस्थेत त्याला बघून मला वाईट वाटलं. तो रडतच बोलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॉरी डॉक्टर, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही, गोळ्या बंद केल्या आणि समुपदेशनाला जाणंही थांबवलं. पण आता मला पुन्हा खूप भीती वाटायला लागली आहे. मनात उदासी वाटते, काही करायची इच्छा होत नाही माझी परत ट्रिटमेंट चालू करा.

नलिनला उदासीनता म्हणजे डिप्रेशन होते. इलाजानंतर पूर्णपणे बरा होऊन तो उत्तमपणे आपला व्यवसाय सांभाळत होता. पण अचानक क्लिनिकला यायचं त्याने थांबवलं. कारण विचारल्यावर म्हणाला, डॉक्टर माझे मित्र म्हणतात, इतक्या गोळ्या खाणं बरं नाही, त्याची सवय लागेल. किडनी खराब होईल.

हे सगळं ऐकताना मला जाणवलं की मानसिक आजाराबद्दल आजही समाजात स्टिग्मा आहे, पूर्वग्रह आहे आणि हा आपल्या प्राचीन सभ्यतेइतकाच जुना आहे. अगदी मनुने आपल्या मनुस्मृती ग्रंथात मनोरुग्णाचा संदर्भ देताना उन्मत असा शब्दाचा प्रयोग केलेला आपल्याला आढळतो. दुर्देवाने मानसिक आजाराबद्दल असलेला हा नकारात्मक दृष्टिकोन आपणा सगळ्यांना विवेकहीन करत चालला आहे. याचं परिणामस्वरुप म्हणजे मनोरुग्णांबरोबर होणारा भेदभाव. अगदी घरातल्या जबाबदारीपासून ते कामाच्या ठिकाणी किंवा लग्नासंदर्भात आणि बऱ्याच अशा जागी मनोरुग्ण म्हणून योग्य त्या संधी त्यांना दिल्या जात नाहीत.

आणखी वाचा: Delaying Gratification: सुदृढ मनासाठी अत्यावश्यक तत्त्व, तुम्ही वापरता का?

वेगवेगळ्या आजाराबद्दलच्या लोकांच्या भावना वेगवेगळ्या आहेत. जेव्हा एखाद्याला हार्ट अटॅक येतो तेव्हा त्याला हृदयरोगतज्ज्ञाकडे आपण घेऊन जातो. पण तिथेच जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा मात्र काहीतरी बाहेरचं झालं असेल, भूतबाधा-करणी असेल म्हणून तांत्रिकाकडे किंवा मंदिर, दर्गा इथे नेलं जातं. पण मानसोपचारतज्ज्ञ हा शब्द दूर दूर आपल्या शब्दकोशात नसतो. बरं शब्दकोशात आलाच तर आपण हजारवेळा तिथे जाण्याआधी विचार करतो.

आणि विचाराअंती तिथे गेलोच तर सुरू होतं विचारचक्र. त्यातला पहिला विचार म्हणजे मला काय वेड लागलंय का? याला म्हणतात सेल्फ स्टिग्मा. लोक मला वेडा म्हणतील हाही यातलाच प्रकार म्हणजे perceived stigma. यामुळे बरेचजण उशिराने उपचार सुरू करतात. मानसिक आजाराचे प्रकार असून त्यांचे योग्य निदान झाले की उपचारही वेगळे असतात. अगदी एका व्यक्तीची उदासिनतेची लक्षणं दुसऱ्यापेक्षा वेगळी असतात. काहींना समुपदेशन लागतं काहींना त्याबरोबर गोळ्या घ्याव्या लागतात. पण या माहितीच्या अभावामुळे मानसिक रोग म्हणजे काहीतरी विचित्र, भीतीदायक, रहस्यमयी असतात असा गैरसमज लोकांमध्ये आहे.

आणखी वाचा: Mental Health Special: स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाची काळजी घेताना..

त्यातच आधीच्या पिढ्यांमध्ये काही मानसिक आजार असेल तर घरचे लोक स्वत:ला दोष देतात आणि त्याची त्यांना लाज वाटते. पण आजार अनुवांशिक नसून आजाराची शक्यता अनुवांशिक असते. हे समजून घेतलं की चुकीची भावना कमी होऊ शकते. अशातच उद्भवणारे प्रश्न म्हणजे डॉक्टर मनोरुग्णाशी कोण लग्न करणार? नोकरी करणार की नाही? गोळ्या आयुष्यभर चालतील का? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार होतो.

मनोरुग्णांना भीतीपोटी समाजात एकटे पाडले जाते. कामाच्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जातो. याला काम दिलं तर आपल्यालाही आजार होईल अशा भावनेने काम दिले जात नाही. यामुळे रुग्णाची मानसिक अवस्था खालावणे, स्वाभिमानाला ठेच पोहोचणे, बेरोजगारी अशा कितीतरी समस्या निर्माण होऊन नैराश्य येतं आणि आत्महत्येची प्रवृत्ती बळावते.

मानसिक आजार संसर्गजन्य नसून त्यावर पूर्ण इलाज आहे. रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आपले काम करु शकतो. तुमच्या आमच्यासारखे आयुष्य सुखरुपपणे घालवू शकतो.

आजाराबद्दलचा पूर्वग्रह रुग्णाच्या संपूर्ण इलाजात बाधा आणून त्याचे आयुष्य अंधारमय करु शकतो. पण हे टाळणे शक्य आहे. मानसिक आजाराबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम कायद्यान्वये मनोरुग्णांच्या हक्कासाठी आणि सहकारी संस्थांमध्ये नोकरीसाठी तरतूद केलेली आहे.

मानसिक आजाराबद्दलच्या अफवांना आळा घालणे, मानसोपचारतज्ज्ञांकडून योग्य माहिती घेऊन त्या माहितीचा प्रसार करणे महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांची भूमिका यात महत्त्वाची आहे. चला तर मग शपथ घेऊया.

स्वतंत्र भारताचे स्वतंत्र विचार
मानसिक आजारांबद्दलच्या दुर्विचारांना करु हद्दपार

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why people feel they have become mad hldc psp
Show comments