“हे  बघा ना, डॉक्टर ,काय हालत करून ठेवलीय्‌ चेहऱ्याची, शाल्मलीने!”. ऋजुता माझी जुनी पेशंट, तिच्या कॉलेजच्या दिवसातली. आता लेकीला घेऊन आली होती. शाल्मली १८-१९ वर्षांची गोरीपान मुलगी. पण चेहरा जणू युद्धभूमीच. पिंपल्स थोडे, पण ते फोडून केलेले डाग आणि व्रण जागोजागी. तिच्याशी बोलून व उपचार लिहून देऊन तिची पाठवणी केली.
 
आज आम्हा त्वचारोगतज्ञांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये चेहऱ्यावरच्या मुरुमांचे प्रमाण किमान 40 टक्के तरी असते. कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते तिशी पर्यंत कधी ना कधी पिंपल्स येऊन गेलेले असतात. कधी थोडे पटकन जाणारे, तर कधी हट्टी, ठाण मांडून बसणारे. शाल्मलीसारखे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता सर्वसामान्यांमध्ये स्वत:च्या दिसण्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. स्वप्रतिमेची जपणूक करण्याची जबर आकांक्षा आहे. चेहरा नितळ असल्यास त्या व्यक्तीचा आत्मविश्वास देखील वाढतो. त्यामुळे उपचार घ्यायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

णखी वाचा: कॉस्मेटॉलॉजी म्हणजे काय? What is Cosmetology?

 तर काय आहेत नक्की ही मुरुमे?
Acne  हा इंग्रजीत पिंपल्स साठी वापरला जाणारा शब्द याचे मूळ ग्रीक “ॲक्मे” या शब्दात आहे. त्याचा अर्थ आहे पॉईंट आणि Acne हे सुरुवातीला छोटे छोटे काळे ठिपके (कोमेडोन्स) च दिसतात. मुरुमेही शैशवातून तारुण्यात प्रवेश करतानाचा टॅक्सच आहे म्हणाना. या काळात स्त्री व पुरुष संप्रेरकांचा उगम होऊन त्यांची शरीरातली पातळी वाढू लागते.  त्यामुळे मुलांना दाही दाढी मिशा तर मुलींमध्ये स्तनांची वाढ दिसू लागते. पण मुरुमे मात्र दोघांमध्येही दिसतात. फक्त मुलांमध्ये मुरुमांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. ह्या संप्रेरकामुळे आपल्या त्वचेवरील तैल ग्रंथी तेल अथवा सीबम अधिक प्रमाणात तयार करू लागतात. या तैलग्रंथी चेहरा, छाती, पाठ, खांदे, डोके व पार्श्वभागावर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे यापैकी कोणत्याही भागावर मुरुमे येऊ शकतात. 

 मुरुमे का व कशी तयार होतात?
आपण आधी पाहिल्याप्रमाणे आपल्या त्वचेच्या काही भागांमध्ये तैलग्रंथी भरपूर प्रमाणात असतात.  विशेषतः पुरुष संप्रेरकांच्या प्रभावाखाली तारुण्यात प्रवेश करताना, यातील ग्रंथींमधून सीबम नावाचा तेलकट द्रव स्रवू लागतो.  त्यामुळे चेहऱ्याची त्वचा तेलकट व चकचकीत दिसू लागते.  ही अवस्था जवळजवळ सर्वांमध्येच पौगंडावस्थेत दिसून येते. जोपर्यंत हे तेल या ग्रंथींच्या नलिकेतून आणि केश नलिकेतून त्वचेवर वाहत राहते तोपर्यंत मुरूमांचा धोका नसतो.

पण जेव्हा या नलिकेचे तोंड बंद होते तेव्हा तेल आत साठत राहते.  हे तोंड कसे बंद होते?  आपल्या त्वचेवर काही जिवाणू कायमचे मुक्कामाला असतात. जसजसे त्यांना सीबम हे खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, तसतशी त्यांची संख्या वाढत जाते. हे जीवाणू त्यापासून फ्री फॅटी ॲसिड तयार करतात. या आम्लामुळे त्वचा दाह उत्पन्न होऊन त्वचेवरील नलिकेचे तोंड बुच लावल्याप्रमाणे बंद होते. यालाच व्हाईट हेड म्हणतात. ही झाली पहिली पायरी. व्हाईट हेड हे साठलेले तेल व त्वचेवरील पेशी यांनी बनते. हे छोटे छोटे टोकेरी त्वचेच्या रंगाचे पुरळ चेहऱ्यावर दिसते.  कालांतराने वरची त्वचा फुटून या बुचाचा हवेशी संयोग होऊन ते काळे दिसू लागते.  याला म्हणतात ब्लॅक हेड. 

नलिकेचे तोंड बंद झाल्यामुळे तैल ग्रंथीत तेल साठत जाऊन ती फुग्यासारखी फुगू लागते व आपणास चेहऱ्यावर तोंड नसलेले, न दुखणारे असे फोड दिसू लागतात.

कधी कधी दोन-तीन तैलग्रंथींची मिळून एकच मोठी पिशवी तयार होते.  ह्या पिशव्या मग गाठीच्या किंवा Cyst च्या स्वरूपात दिसू लागतात.

या साठलेल्या तेलावर जिवाणू वाढू लागतात व तिथे पू तयार होऊ लागतो. कधी कधी ह्या पुवाचा फोड त्वचेच्या आतच फुटून मोठमोठ्या गाठी किंवा उबाळू तयार होतात व या गाठी चेहऱ्यावर व्रणांच्या रूपाने खुणा सोडून जातात.

मुरुमे समूळ नष्ट होतात का?
होय.  जसजसे वय वाढते तसतसे संप्रेरकांच्या पातळीतील चढ-उतार स्थिर होत जातात व तैलस्राव कमी होऊ लागतो. अशावेळी मुरुमे देखील हळूहळू नाहीशी होतात.

 मुरुमांची वर्गवारी चार वर्गांमध्ये केली जाते.
व्हाईट हेड्स व ब्लॅक हेड्स
व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स व पिकलेले फोड
मोठे फोड, बऱ्या झालेल्या मुरमांचे डाग व व्रण
मोठे फोड, उबाळू, गळवे व व्रण

 वर्ग १ मधली मुरुमे थोडीफार काळजी घेण्याने जाऊ शकतात.  पण वर्ग २,३,व ४ मधल्या मुरुमांना मात्र उपचारांची गरज असते.

सर्वात महत्त्वाचे : आधी लिहिल्याप्रमाणे हे एक रणक्षेत्रच असते म्हणाना.  जर युद्ध झटपट संपले तर त्याच्या खुणा दिसणार नाहीत.  पण जर ते लांबत गेले किंवा जर ते भयंकर असले तर मात्र त्वचेवर खड्डे, व्रण, काळे डाग व कधीकधी खांदे पाठ छाती इत्यादी ठिकाणी गाठी सदृश्य व्रण आपल्या खुणा मागे ठेवून जातात.

कोणत्या कारणांमुळे मुरुमे येतात व वाढू शकतात?
अनुवंशिकता : आई-वडिलांपैकी एकाला मुरुमे असल्यास मुलांमध्ये मुरुमांचे प्रमाण निश्चितच वाढते
आहारातील पदार्थ : चॉकलेट, गोड, दूध व दुग्धजन्य पदार्थ, ज्यांची रक्तातील साखर वाढविण्याची प्रवृत्ती आहे असे. यांनी मुरुमे वाढतात.
सौंदर्यप्रसाधने व तेल : डोक्याला तेल लावल्याने मुरुमांचे प्रमाण वाढू शकते. कारण हे तेल कपाळावर उतरून येते.  त्याचप्रमाणे फाउंडेशन, सन स्क्रीन ही जर oil-based प्रसाधने असतील तर त्यांनी देखील मुरुमे वाढू शकतात..  
खरखरीत पूड (Scrub) : हल्ली बाजारात scrub मिळतात. यामध्ये त्वचा स्वच्छ करण्यासाठी cleanser बरोबरच बारीक खरखरीत पूड मिसळलेली असते.  ही पूड त्वचेचा वरचा थर खरवडून काढते.  कल्पना अशी असते की तैल नलिकांची बंद तोंडे उघडून त्यातून तेल बाहेर पडावे.  परंतु त्यामुळे त्वचेच्या वरच्या पेशींच्या थराला इजा पोहोचून त्वचा दाह होण्याचा धोका संभवतो.
मानसिक तणाव : परीक्षेचा ताण, कामे पुरी करण्याची डेड लाईन, मुरुमांमुळे चेहरा खराब दिसतो याचा ताण, अपुरी झोप यांनी देखील मुरुमे वाढतात. असा ताण असणाऱ्या तरुण तरुणींमध्ये मुरुमे कोचण्याचे प्रमाणही जास्त असते.
संप्रेरकांची अनियमितता : आजच्या प्रचंड वेगवान तणावपूर्ण जीवनामुळे संप्रेरकांची अनियमितता दिसून येते. ती देखील मुरुमांना कारणीभूत ठरू शकते.  हल्ली तुम्ही पीसीओडी हा शब्द खूपदा ऐकला वाचला असेल. हा एक स्त्री संप्रेरकांच्या अनियमिततेचा प्रकार आहे त्याबद्दल पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. थायरॉईड,डायबेटीस किंवा Adrenal Hyperplasia या इतर संप्रेरकामुळे देखील मुरुमे वाढू शकतात.
काही औषधे : काही औषधांनी देखील मुरुमे येण्याचा संभव असतो.  टीबी करता दिले जाणारे INH आणि स्टेरॉईड ही त्यापैकीच काही. परंतु ही औषधे बंद केल्यानंतर ही मुरुमे हळूहळू नष्ट होतात.

स्टेरॉईड या औषधाबद्दल दोन शब्द. हे औषध एक दुधारी शस्त्र आहे. रेल्वे डब्यातल्या आपत्कालीन साखळीसारखे. संकटसमयी लाख मोलाचे. पण चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर नुकसान करणारे.

आपल्याकडे अनेक प्रकारची औषधे औषधांच्या दुकानांमध्ये सहज मिळतात. डॉक्टरांनी लिहिलेल्या कालावधीनंतर देखील काही रुग्ण बरे वाटते म्हणून ही औषधे घेत किंवा लावत राहतात. त्यापैकी स्टिरॉइड हे महत्त्वाचे औषध आहे. हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. मुरुमे हा त्यापैकी एक प्रमुख दुष्परिणाम.

मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करून इथे थांबते. कृपा करून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या कालावधीच्या पुढे कोणतीही औषधे, मलमे वापरत राहू नका. “सब दुखो की एकही दवा” म्हणून एका त्वचा रोगासाठी दिलेले मलम दुसरीकडे लावीत राहू नका. आणि डॉक्टरांना तुम्ही वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधने औषधी मलमे व इतर सर्व औषधांची माहिती द्या. पुढील भागात आपण मुरुमांवरील औषधोपचार पाहू या. 

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pimples appear on face hldc psp