सेक्सचा प्रतिसाद निर्माण होताना वासना केंद्र डोपामाइनने उत्तेजित होते. त्यामुळे ‘ऑक्सिटोसीन’ रसायन मेंदूत व रक्ताभिसरणातून शरीरात इतरत्र पसरते. त्यामुळे मेंदूतील आनंद-केंद्रांवर, विशेषत: ‘न्यूक्लिअस एॅक्युम्बन्स’ या भागावर त्याचा परिणाम होऊन तिथे अत्युच्च आनंदक्षणी रासायनिक बिंदूंचा स्फोट होऊन एण्डॉफन, एन्केफेलीन ही रसायने पसरतात. तत्क्षणी आनंद (प्लेझर), सुखद ग्लानी (ट्रान्स), वेदनारहित स्थिती (एॅनॅल्जेसिया) व मन:शांती (पीस) अशा जाणिवांनी ‘क्षणिक समाधी’ अवस्था प्राप्त होत असते. ‘संभोग’ हे अशी ‘क्षणिक समाधी’ देऊन मानसिक ताण नष्ट करणारे (स्ट्रेस बस्टर) नैसर्गिक साधन आहे हे शास्त्रीय सत्य लक्षात घेतले पाहिजे. दैनंदिन आयुष्यात जाणवणारे मानसिक ताण घालवण्यासाठी दाम्पत्याने सेक्स हा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चा उत्तम उपाय आहे हे ध्यानात ठेवून आपल्या कामजीवनाकडे दुर्लक्ष करता कामा नये.

रक्ताभिसरणातून शरीरभर पसरणारे ‘ऑक्सिटोसीन’ जेव्हा हृदयाकडे येते तेव्हा जे विविध परिणाम होतात, त्यात एक महत्त्वाचा म्हणजे हृदयाच्या वरील कप्प्यातून ‘एॅट्रीयल नॅट्रीयुरेटरिक पेप्टाइड’ हे रसायन उत्पन्न होते. त्यामुळे व ‘ऑक्सिटोसीन’ने ‘नायट्रिक ऑक्साइड’ रसायन निर्माण केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन त्या रुंदावतात (करोनरी डायलेटेशन), म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. थोडक्यात, ‘नैसर्गिक अँजिओप्लास्टी’ होत असते. म्हणजेच प्रत्येक कामोच्च आनंद (ऑरगॅझम) हा हृदय बळकट करणारा ठरत असतो. याचाच अर्थ ऑक्सिटोसीन ही हृदय-संजीवनी असून ‘सेक्स’ ही निसर्गाने दिलेली दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच आहे. दाम्पत्याने म्हणूनच ‘चाळिशीनंतर’, ‘साठीनंतरही’ कामजीवनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अशा दाम्पत्यांनी स्वत:ला ‘रिटायर’ किंवा वृद्ध न समजता या वयातही कामजीवनाकडे लक्ष देऊन ते उपभोगण्याची क्षमता (सेक्शुअल फिटनेस) ठेवली पाहिजे. शिवाय सेक्सचे ‘कपिलग’ व्यवस्थित असले तर त्यांच्यातील नातेही घनिष्ठ व्हायला मदत होत असते. कारण मानवात सेक्स ही केवळ क्रिया नसून नातेसंबंध असतो.

हाडांची, अस्थिपेशींची (ऑश्चिओफाइट) व त्वचेच्या कोलॅजेनसारख्या आधार-घटकांची काळाप्रमाणे होणारी झीज काही प्रमाणात तरी ऑक्सिटोसीनने रोखली जात असते. त्यामुळे ऑक्सिटोसीनचा परिणाम हा ‘अँटी-एजिंग’, वयोवृद्धी-घट करणारा असतो. म्हणजेच शरीरात कालपरत्वे निर्माण होऊन शरीराचे वृद्धत्व वाढवणारे रासायनिक घटक, ऑक्सिडंट आटोक्यात आणण्यासाठी होत असतो. हृदयात गुलाबाच्या बागा फुलवणाऱ्या व समाधानी कामजीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती म्हणूनच ‘ऑक्सिटोसीन’मुळे त्या वयोगटातील इतरांपेक्षा जास्त तरुण का दिसतात, याचे गमक आता लक्षात येईल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्स हा सर्वोत्तम शारीरिक व्यायाम आहे. एका सेक्सच्या क्रियेमध्ये पुरुषाच्या साधारणपणे १०० ते १५० कॅलरीज नष्ट होऊ शकतात. (जिममध्ये ट्रेडमीलवर १५-२० मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यावर ७० ते ८० एवढय़ाच कॅलरीज जात असतात.) व्यक्ती किती जोमाने, अ‍ॅक्टिव्हपणे तो संबंध करीत असते त्यावर हे प्रमाण अवलंबून राहते. संबंधाच्या वेळी स्त्रीसुद्धा जर किती जोमाने, अ‍ॅक्टिव्हपणे सहभाग घेत असेल तर तिलाही तो उत्तम शारीरिक व्यायाम घडतो. हा व्यायाम कंबरेच्या स्नायूंना, सेक्सच्या पीसी स्नायूंना एवढेच नाही तर पुरुषाच्या प्रोस्टेट ग्रंथीलाही होत असतो. प्रोस्टेट ही सेक्सची ग्रंथी आहे हे लक्षात ठेवा. प्रोस्टेटची सुदृढता ही नियमित कामजीवनावर असते हे दाम्पत्याने लक्षात ठेवले पाहिजे.

स्त्रीमध्ये सेक्सच्या वेळी तिच्या ओव्हरीजवरही परिणाम होत असतो. म्हणून नियमित कामजीवनामुळे ‘सिस्टिक ओव्हरीज’ ही समस्याही आटोक्यात आणता येते. स्त्रीचे पाळीचे त्रासही कमी होत असतात. सेक्स हा पती-पत्नीतील नातेसंबंध असल्याने व्यायाम जेवढा नियमित नातेसंबंध तेवढाच सुदृढ!
सेक्स हा दाम्पत्य-संबंधाचा पाया असून त्यातील आनंद त्या संबंधाचा कळस का असतो हे सुज्ञांना सांगायची आता काय गरज?

Story img Loader