Til Gul : मकर संक्रांत आली की, आपल्याला तिळगुळाची आठवण होते आणि ते आपण आवडीने खातो. मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीळ आणि गूळ हे एकत्र खाण्यामागे काय कारण आहे ? आणि विशेषत: हिवाळ्यात जेव्हा अनेक लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास असतो; अशा वेळी तिळगूळ खाणे फायदेशीर ठरते का? हिवाळ्यात शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उष्ण पदार्थांची आवश्यकता असते. तज्ज्ञ सांगतात, “तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. तिळगुळामध्ये तूप टाकून खाल्ले, तर आपल्या शरीराला ओमेगा ३, ६ व ९ मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेफ चिनू वाजे हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट शेअर करताना लिहितात, “तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असते. एक पाव कप तीळ एक कप दुधापेक्षा जास्त कॅल्शियम शरीराला पुरवतात. तिळामध्ये असलेले तेल आपल्या शरीराला हिवाळ्यात ऊब देण्यास मदत करतात.”
त्यापुढे ते लिहितात, “याचप्रमाणे गुळामध्येसुद्धा लोह आणि जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते; ज्यामुळे तुम्हाला श्वसनासंबंधीच्या समस्यांपासून सहज आराम मिळतो. त्याशिवाय पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी तुम्ही धावता का? चुकूनही असे करू नका; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

मुंबई येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तीळ आणि गुळाचे फायदे सांगितले.

तिळाचे फायदे

तिळामध्ये कर्बोदके कमी प्रमाणात असतात. त्याशिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात; ज्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

तिळात मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

पांढऱ्या तिळामध्ये फायटोस्टेरॉल्स असतात; जे कोलेस्ट्रॉल तयार होणे थांबवतात. काळ्या तिळामध्ये अधिक प्रमाणात फायटोस्टेरॉल्स असतात; जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास अधिक फायदेशीर आहेत.

तिळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे; ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते.

गुळाचे फायदे

गुळ खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. थकवा दूर करण्याससुद्धा गूळ फायदेशीर आहे.

गूळ खाल्यामुळे मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो. त्याशिवाय मासिक पाळी नियमित येत नसेल, तर त्यासाठी गूळ साह्यभूत ठरू शकतो.

गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेटचे प्रमाण आढळते. गूळ खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

हिवाळ्यात तिळगूळ का खावा?

“तिळामध्ये फायबरसह भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ई, बी६, लोह व तांबे असते. हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यात असलेल्या प्रोटीनमुळे चयापचय क्रिया सुधारते आणि भूक कमी लागते. हिवाळ्यात तिळगुळाचे जे लाडू आपण आवर्जून खातो; त्यात भरपूर प्रमाणात असलेले ई जीवनसत्त्व रक्तवाहिन्यांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ देत नाही. तिळगुळामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम व झिंक असते; जे घटक आपले स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. गूळ रक्त शुद्ध करण्याससुद्धा मदत करतो; तसेच गुळामुळे रक्तातील साखरेची पातळीदेखील वाढवत नाही,” असे डॉ. पटेल सांगतात.

असे म्हणतात की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी चांगला नसतो. अतिप्रमाणात गूळ खाल्ल्याने वजन वाढते. त्याचप्रमाणे तीळ अतिप्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should consume til gul in winter season know benefits of sesame seeds and jaggery ndj
Show comments