आहाराबाबत इतर कोणत्याही ऋतूला लागू न होणारा असा सल्ला हिवाळ्यातल्या ऋतूंबाबत आयुर्वेदाने दिलेला आहे, तो म्हणजे सकाळी लवकरात लवकर न्याहरी करा. शरद व वसंत ऋतूमध्ये मध्यान्ही, ग्रीष्म व वर्षा ऋतूमध्ये अपराण्ह समयी जेवण्याचा सल्ला दिलेल्या आयुर्वेदाने हेमंत-शिशिर ऋतूंमध्ये मात्र सकाळी लवकरात लवकर जेवण्याचा सल्ला दिलेला आहे. सुश्रुतमतानुसार हिवाळ्यातल्या रात्रींचे प्रहर हे खूप मोठे असल्याने अर्थात रात्र दीर्घ असल्याने, हिवाळ्यामध्ये मुळातच अग्नी प्रदीप्त असल्याने सकाळी उठल्या-उठल्या भूक लागते.अशावेळी सकाळीच अन्नसेवन न केल्यास प्रखर झालेला अग्नी देहधातूंचाच (शरीर घटकांचाच) उपयोग उर्जानिर्मितीसाठी करतो आणि शरीर अशक्त होते.
इथे कोणाच्या मनात ही शंका येईल की सकाळी उठल्यावर जी शौच-अभ्यंग,स्नान आदी आवश्यक कार्ये दिनचर्येमध्ये सांगितली आहेत, त्यांचे काय? हिवाळ्यात भूक लागते तेव्हा ती आवश्यक कार्ये करावी की न करावी?तर याचे उत्तर अष्टाङ्गहृदयाचे भाष्यकार अरुणदत्त देतात की भुकेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने इतर कार्ये सोडून सर्वप्रथम अन्नग्रहण करावे, अन्यथा प्रदिप्त झालेला अग्नी शरीरधातूंचे भक्षण तर करेलच आणि अग्नीसुद्धा मंद होत जाईल अर्थात भूक,पचन व चयापचय मंद होईल.
हेही वाचा… Health Special : वजन उचलण्याचे फायदेही असतात?
इथे एक महत्त्वाची सूचना- स्तनपान करणार्या मातांना द्यायची आहे. थंडीमध्ये दूधपित्या बाळाचीसुद्धा भूक वाढते आणि बाळाला सकाळी-सकाळीच भूक लागते. याच्यासाठी हिवाळ्यात आईने आपल्या बाळाला सकाळी लवकर दूध पाजायला हवे. मात्र असे झाले नाही तर बाळ रडू लागते आणि थोडा वेळ रडून, थकून झोपी जाते. बाळाचे पोट मात्र उपाशी राहते. असे जर वारंवार होऊ लागले तर असे बाळ अशक्त आणि कृश होते. मग बाळाचे वजन का वाढत नाही याचा विचार सुरु होतो, वेगवेगळी टॉनिक्स दिली जातात, ज्यांचा फारसा फायदा होत नाही. कारण बाळाला टॉनिक्सची नाही तर पोषणाची गरज असते. सकाळी लवकर दूध देऊन हा प्रश्न सहज सुटू शकतो.
सकाळीच अन्नसेवन न केल्यास प्रखर झालेला अग्नी शरीरधातूंचाच (शरीरघटकांचाच) उपयोग उर्जानिर्मितीसाठी करतो आणि शरीर अशक्त-कमजोर होते. हाच विचार आयुर्वेदाने ’सकाळी भूक लागलेली असताना अन्न न घेतल्यास अग्नी शरीरधातूंचेच भक्षण करतो’, या शब्दांमध्ये मांडलेला आहे. ‘Breakfast like a king’ हा आधुनिक आहार तज्ज्ञांकडून दिला जाणारा सल्ला हा लागू होत असेल तर केवळ हेमंत-शिशिरातल्या हिवाळ्याला आणि अन्य ऋतूमध्ये पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना. पित्तप्रकृती व्यक्तींचा अग्नी हा मुळातच तीक्ष्ण असतो ज्यामुळे त्यांना सकाळी उठल्या-उठल्या भूक लागते आणि त्यात जर हिवाळा असेल मग तर विचारू नका. असे लोक सकाळी जेव्हा केव्हा उठतील तेव्हा त्यांना भूक लागलेली असते. या मंडळींनी सकाळी उठल्या उठल्या खाण्याची सोय करावी, अर्थातच आरोग्याला पोषक व थंडीला अनुरूप अशा आहाराची.
हिवाळ्यात मात्र सर्वच प्रकृतीच्या निरोगी लोकांना सकाळी-सकाळीच भूक लागते, तीसुद्धा कडकडून आणि त्याचसाठी थंडीच्या दिवसांत सकाळी लवकरात लवकर अन्नसेवन करावे, शरीराला मुबलक उर्जा मिळेल अशा पौष्टिक आहाराचे.