वैद्य अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरोगी कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना आयुर्वेद शास्त्र सांगते की, “ज्याला थंडी सहन होते तो निरोगी,अर्थात ज्याला थंडी सहन होत नाही, तो अस्वस्थ”. एखादी व्यक्ती कितीही निरोगी दिसत असली, मात्र तिला प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारामध्ये थंडी-ऊन सोसत नसेल तर तिला निरोगी कसे म्हणता येईल? इथे थंडी याचा अर्थ बर्फ पडणारी-कडाक्याची थंडी असा अर्थ नसून सर्वसाधारण थंडी असा घ्यायला हवा.

अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात,ज्यांना थंडी सुरू झाली की वातावरणातल्या थंडाव्यामुळे शरीरामध्ये थंडावा (शीतत्व) वाढून अनेक लहानसहान तक्रारी सुरू होतात. सर्दी-ताप-खोकला-दम्यापासून ते सांधे-कंबर धरण्यापर्यंत आणि पोटात वायू धरण्यापासून ते शरीराला थरथर-अशक्तपणा येण्यापर्यंत वेगवेगळ्या त्रासांनी हे लोक थंडीमध्ये त्रस्त असतात.

आणखी वाचा-Health Special : एच. पायलोरी – का होते हे अ‍ॅसिडिटी व जठरातील इन्फेक्शन ?

ज्यांना थंडी सहन होत नाही, त्यांच्या शरीरामध्ये सहसा आहारजन्य उर्जेचा (त्यातही चरबीजन्य उर्जेचा) अभाव असतो. यांच्या अन्नामध्ये शरीराला पर्याप्त उर्जा पुरवेल अशा आहाराची कमी असते. याचमुळे त्यांच्या अंगावर मांस-मेद (चरबी) नसते किंवा अगदी कमी प्रमाणात असते. अशा कृश व्यक्ती या वातप्रकृती म्हणून ओळखल्या जातात आणि अशा वातप्रकृती व्यक्तींना सहसा थंडी सहन होत नाही,जे आचार्य चरकांनी सुद्धा सांगितले आहे.

ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना सुद्धा थंडी सोसत नाही. रक्त उष्ण असते, साहजिकच शरीराला उष्मा पुरवण्यास रक्त साहाय्यक होते. त्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी तर शरीरातला उष्मा कमी आणि त्यामुळे थंडीचा सामना करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती दुर्बल असणार्‍यांनाही थंडी सहन होत नाही असे दिसते. कमी वजनाचे, पुरेसा पोषक आहार न घेणारे, टीबी,कॅन्सर, एड्‍स, किडनीचे विकार, मधुमेह वगैरे आजारांनी ग्रस्त असणारे आणि मुळातच अशक्त असणारे अशा मंडळींची रोगप्रतिकारयंत्रणा कमकुवत असते आणि अशा लोकांना सुद्धा हिवाळा बाधण्याची शक्यता असते.

थंडीतल्या गारठ्यामुळे जे रोगजंतू (विशेषतः विषाणू) हवेत प्रसारतात, त्या रोगांची अशा दुर्बल लोकांना लागण होणाची दाट शक्यता असते. त्यामुळेच या सर्व मंडळींचे स्वास्थ्य थंडीमध्ये हवामानाचा पारा खाली उतरायला लागला की थरथरू लागते. घरातल्या नाजूक प्रकृतीच्या मुली, अशक्त-वृद्ध माणसे, आजारी माणसे यांना तर हा त्रास होताना दिसतोच. अशावेळी ते स्वस्थ नसतात, अशीच आपली धारणा असते. पण मग स्वस्थ दिसणार्‍या व्यक्तींनाही थंडी सहन होत नसेल तर त्यांना निरोगी कसे म्हणायचे?

आणखी वाचा-Health Special: नखुर्डे झाले आहे? काय कराल? 

याउलट गुटगुटीत-जाडजूड-स्थूल शरीराची माणसे, ज्यांना आयुर्वेद कफ प्रकृतीचे म्हणतो ते थंडीला सहज तोंड देतात, असा अनुभव येतो. स्थूल व्यक्तींच्या शरीरावर असणारा चरबीचा स्तर हा हिवाळ्यामध्ये एखाद्या इन्सुलेटरप्रमाणे काम करतो आणि शरीरातली उर्जा बाहेर पडू देत नाही. शिवाय स्थूल माणसे आहार सुद्धा अधिक प्रमाणात सेवन करतात आणि क्वचित अन्नसेवन कमी झाले तरी शरीरामधील चरबीपासून आवश्यक असणारी उर्जा शरीर तयार करते. (अर्थात या एका पैलूचा विचार करुन चरबीयुक्त शरीर निरोगी असते असा सोयीस्कर अर्थ स्थूल लोकांनी काढू नये)

कृश व्यक्तींना कडक हिवाळा सहन होत नाही!

समाजामध्ये लोकांच्या शरीरांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे तीन वर्गांत करता येते. कृश,स्थूल व मध्यम. कृश म्हणजे त्या व्यक्ती ज्यांच्या शरीराच्या हाडांच्या सांगाड्यावर मांस व मेदाचे (चरबीचे) लेपन कमी प्रमाणात असते वा जवळजवळ नसतेच. साहजिकच अशा व्यक्ती आकाराने लहान व कृश दिसतात. याउलट स्थूल व्यक्तींची शरीरे आकाराने मोठी दिसतात, कारण त्यांच्या शरीरावर मांस व मेद भरपूर असते. व्यायाम-परिश्रम करुन भरपूर भोजन (त्यातही प्रथिनयुक्त आहार अधिक) करणार्‍यांच्या शरीरावर मांस अधिक असते, तर व्यायाम-परिश्रम न करता अधिक मात्रेत भोजन (कर्बोदकांचे अधिक सेवन,त्यातही साखर,मैदा अशा कर्बोदकांचे) अधिक प्रमाणात करणार्‍यांच्या शरीरावर मेद (चरबी) अधिक वाढते.

आणखी वाचा-Health Special: थंडीत वजन का वाढतं? 

तिसरा वर्ग ज्यांच्या शरीरामध्ये आवश्यक तितकेच (चरबी) मेद असते, मांसाचे लेपन योग्य प्रमाणात असते, नियमित व्यायाम वा परिश्रम यामुळे (किंवा अनुवंशिकतः) शरीर स्नायूबद्ध, सुसंघटित व प्रमाणशीर असते, ज्याला सुदृढ-स्वस्थ म्हणता येईल. दुर्दैवाने असे सुदृढ लोक समाजात कमी प्रमाणात दिसतात आणि कृश व स्थूल माणसंच आधिक्याने असतात. आयुर्वेदानुसार कृश व स्थूल या उभय वर्गातील लोकांना ‘स्वस्थ’ म्हणता येत नाही. यामधील कृश लोकांबाबत हिवाळ्याच्या संदर्भात आचार्य चरक यांनी सांगितलेला विचार कृश व्यक्तींना बोध देईल.

आचार्य चरक म्हणतात की कृश व्यक्तींना हिवाळा व उन्हाळा सहन होत नाही, त्यातही कडक हिवाळा व प्रखर उन्हाळा. हिवाळ्याच्या कडक थंडीचा, त्या गारठ्याचा, कोरड्या हवेचा सर्वांनाच त्रास संभवतो, मात्र तो कृश व्यक्तींना तुलनेने अधिक होतो.ज्यामुळे थंडी सहन न झाल्याने जे त्रास शरीराला होऊ शकतात, ते बारीक शरीराच्या मंडळींना आधिक्याने व अधिक तीव्रतेने होतात. साहजिकच यांनी थंडीच्या प्रतिबंधासाठी अधिक काळजी घेणे अपेक्षित असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why skinny people cant tolerate harsh winters hldc mrj
Show comments