देशभरात थंडी जसजशी वाढतेय तसतसा वायुप्रदूषणाचा धोकाही वाढतोय. प्रदूषणामुळे अनेक रुग्ण इतके त्रस्त झालेत की, त्यांना आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. प्रदूषणाच्या याच वाढत्या धोक्यासंदर्भात दिल्ली AIIMS चा एक धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे. त्यातील अभ्यासानुसार, शून्य ते सात दिवसांदरम्यान अगदी कमी कालावधीसाठी नायट्रोजन डाय-ऑक्साइडच्या संपर्कात आल्याने रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ५३ टक्क्यांनी वाढली आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे देशभरात प्रदूषणाच्या पातळीत २.५ टक्क्यांनी वाढ होत असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा भार तुलनेत १९.५ टक्क्यांनी वाढला आहे. AIIMS च्या याच अहवालासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने सविस्तर माहिती दिली आहे.
या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, श्वासोच्छवासाच्या आजारांऐवजी इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये रुग्णांचीही संख्या अधिक आहे. श्वसनविकारासह इतर आजार असलेल्या सुमारे ६८.२ टक्के लोकांना सध्याच्या श्वसनरोगांच्या २०.३ टक्के लोकांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासात रुग्णांना इतर आजार असलेल्यांची नोंद नसली तरी आरोग्यतज्ज्ञांच्या मते, केवळ श्वसनाच्या रुग्णांनाच नाही, तर ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग असलेल्या लोकांनाही या वायुप्रदूषणाचा धोका आहे.
वाहनातील पेट्रोल आणि डिझेलसारखे जीवाश्म इंधन जळून उत्सर्जित होणाऱ्या नायट्रोजन डाय-ऑक्साइडमुळे श्वसनमार्गामध्ये आजार होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे फुफ्फुसात जळजळ वाढणे, फुप्फुसाचे कार्य मंदावणे, तसेच खोकला आणि श्वास घेताना त्रास होणे, असे त्रास होत आहेत. दुसरीकडे पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे धुळीचे कण वाढताना दिसतायत. बांधकामाच्या कामातून आणि लाकूड व इतर गोष्टी जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे हे कण वाढत आहेत. हे कण श्वसनमार्गासह रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतात; ज्यामुळे सूज येणे, चिडचीड होणे, घसा व नाकात वेदना होणे आणि इतर लक्षणे आढळून येत आहे, अशी माहिती डॉ. एस. के. काबरा यांनी दिली आहे.
यावरून शहरातील प्रदूषणाच्या पातळीला आळा घालण्याची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे. कारण- या वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यावर एम्समधील श्वसन औषधाचे अतिरिक्त प्राध्यापक व अभ्यासाचे लेखक डॉ. करण मदन यांनी सांगितले की, प्रदूषणाच्या पातळीत जसजशी वाढ होतेय. तसतसा श्वास घेण्यास त्रास होणे, घरघर होणे व खोकला यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होतेय. अभ्यासानुसार बहुतेक रुग्णांना श्वास घेण्यात अडचण (९५ टक्के) आणि खोकला (७४ टक्के), अशा लक्षणे आढळून आली. ही लक्षणे जवळपास तीन दिवसांपर्यंत दिसून येतात.
अशा स्थितीत इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण- प्रदूषणाचा केवळ श्वसनसंस्थेवर परिणाम होत नाही, तर सर्व अवयव प्रणालींवर त्याचा परिणाम होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अधिक वेळा श्वास घेणे आवश्यक असते. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन शरीरात वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा हृदयाला चालू ठेवण्यासाठी अधिक पंप करावे लागते. त्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे, अशी माहिती डॉ. काबरा यांनी दिली.
डॉ. काबरा पुढे सांगतात की, दिल्लीच्या गजबजलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेषत: ITO आणि ISBT सारख्या ठिकाणी जास्त रहदारी असलेल्या ठिकाणच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला घरे असलेल्या लोकांनी दारे, खिडक्या बंद ठेवाव्यात.
डॉ. मदन यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढत असताना एम्सच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. या अभ्यासात एक महत्त्वाचा निष्कर्षही समोर आला आहे; ज्यानुसार जेव्हा कार्बन मोनॉक्साइड (CO) चा स्तर वाढतोय तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या २६.१ टक्क्यांनी कमी झाली. कार्बन मोनॉक्साइड जास्त प्रमाणात विषारी असू शकते. परंतु, अभ्यासात असे म्हटले आहे की, कार्बन मोनॉक्साइडची पातळी कमी असल्याने इतर प्रदूषकांमुळे होणारी जळजळ कमी होऊ शकते.
हा अभ्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान एम्सच्या आपत्कालीन स्थितीत पोहोचलेल्या एकूण ६९,४०० रुग्णांवर आधारित होता. त्यापैकी १३.३ टक्के म्हणजेच ९,२४३ जणांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एम्सने अखेरीस अशा २,६६९ रुग्णांना आपल्या अभ्यासात समाविष्ट केले; जे दिल्लीत राहत होते आणि त्यांना किमान दोन आठवडे श्वास घेण्यास त्रास होत होता.
प्रदूषणाच्या गंभीर स्थितीत डॉ. मदन यांनी सल्ला दिला की, जेव्हा प्रदूषणाची पातळी जास्त असते तेव्हा लोकांनी शक्य तितके घरात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: ज्या वेळी प्रदूषणाची पातळी उच्च असते त्यावेळी कठोर व्यायामप्रकार, शारीरिक श्रम करणे टाळा.
वायुप्रदूषणामुळे श्वसनासह फुप्फुसांशी संबंधित अस्थमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)सारख्या आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना श्वास घेण्यात अडचण येते. त्यामुळे जेव्हा प्रदूषणाची पातळी वाढू लागते तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. मदन सुचवतात.
विशेषत: हिवाळ्यात लक्षणे आणखी वाढू नयेत म्हणून त्यांनी इनहेलरचे डोस वाढवातेत. या स्थितीत घराबाहेर पडताना मास्कपेक्षा एअर प्युरिफायर अधिक प्रभावी ठरू शकते. नियमित सर्जिकल मास्क प्रदूषणाच्या लहान कणांना आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखत नाहीत. तर N95 मास्क दीर्घ कालावधीसाठी तोंडावर लावून ठेवणे खूप कठीण असते; शिवाय ते अधिक महाग आहेत, असेही डॉ. मदन सांगतात.
एअर प्युरिफायर दम्यासारख्या आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी आणि ऋतूनुसार विविध आजारांचा सामना करणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकतात. पण, खिडक्या किंवा दरवाजे सतत उघडे असतात, त्या ठिकाणी हे वापरणे फायदेशीर नाही. त्यासाठी खोलीचे दरवाजे बंद असणे गरजेचे असते, असेही डॉ. मदन सांगतात