साकेतच्या रीलला हजारो लाईक्स आले होते आणि त्या आनंदातच साकेत मोबाईल उशाशी ठेवूनच झोपला होता.
इतक्यात त्याला घराच्या भिंतीवर उजेड आणि सावली असं एकत्र काहीसं दिसलं. कुतूहलाने आवाज कुठून येतोय म्हणून तो पाहायला गेला. तर मंडळाच्या मंडपात हालचाल होतेय हे त्याच्या लक्षात आलं. यावेळी कोण असेल बरं पाहावं म्हणून तो हळूच घराबाहेर बाहेर पडला. त्याने बाप्पाच्या मंडपात डोकावून पाहिलं तर बाप्पा चक्क वज्रासनात बसला होता. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं तर खरोखरीच बाप्पा बसला होता!
बाप्पाला पाहून त्याने ‘आ’ वासला. तो मोबाईल आणायला जाणार इतक्यात त्याला बाप्पाने हातानेच आत यायला खुणावलं आणि साकेत गडबडला. त्याने वळून मागे पाहिलं त्यावर बाप्पा म्हणाला, “तुलाच बोलावतोय. शांतपणे आत ये नाहीतर उगाच सगळेच उठतील” त्यावर साकेत मोहित झाल्यासारखा आत गेला. थोडासा अविश्वासाने चक्रावून गणपतीला म्हणाला, “तू चक्क वज्रासन करतोयस?” त्यावर गडगडाटी हसून बाप्पा म्हणाला – “हो तर , तुम्ही मला इतक्या वेगवेगळ्या रूपात घडवताय – मग मी म्हटलं जरा कोणी नाहीये तोपर्यंत आपल्या मनासारखं करू. थोडी हालचाल पाहिजे ना!”
साकेत म्हणाला, “माझा विश्वास बसत नाहिये तू चक्क असा माझ्याशी बोलतोयस!” त्यावर बाप्पा म्हणाला “हो, आता डिस्टर्ब केलंच आहेस तू तर ठिके. तसाही, मला तुम्हा मिलेनियल आणि जेन झी सोबत बोलायचंच होत.”
त्यावर साकेत जोरात हसून म्हणाला, “अनबिलिव्हेबल! तुला हे सगळे माहितेय?” त्यावर बाप्पा म्हणाला “अर्थात! इतकी चंद्रयानं फिरतायत माझ्याभोवती यावर्षी आणि तुमच्या रिल्ससाठीचे इतके मोबाइल पाहून मला गेले काही वर्षात वेगवान बदल झाल्याच दिसतंच होत. दर्शन घेताना तुमचंच दर्शन कमी होतंय मला. काय ते पापाराझींमध्ये असल्यासारखं वाटतंय” यावर साकेत आणि बाप्पा खळखळून हसले.
हेही वाचा… स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ?
“ओह, मग काय साकेत आज तू माझ्या प्रसाराचे किती मोदक खाल्लेस?”
त्यावर साकेत जीभ चावून म्हणाला, मी खाल्ले आहेत साधारण ७-८. नाही. सकाळी २, दुपारचे ३, संध्याकाळी १, पूजेनंतर २, आणि जेवणा सोबत ३ …आणि आता झोपण्यापूर्वी १.
” अरे वाह म्हणजे तू प्रतिगणपतीच!”
“व्हाटस् प्रति?
“अरे म्हणजे तू ११ मोदक खाल्लेस की. जवळपास नैवेद्याचे सगळेच.”
त्यावर साकेत थोडा खजील झाला.
हे बोलणं सुरू असतानाच बाप्पाने अंगाला आळोखे पिळोखे द्यायला सुरुवात केली.
साकेत म्हणाला, “बाप्,पा तुला मी नेहमी गेले १५- २० वर्षे वेगवेगळ्या रुपात पाहिलं. आज काय तू एकदम व्यायाम वगैरे करतोयस.”
“अरे काय झालं, तू आज मित्रांना म्हणालास ना की तू माझ्यासारखाच आहेस. म्हटलं अनायासे डोकावला आहेसच तर मारुयात गप्पा. आणि तसेही तू नेमका माझ्या व्यायामाच्या वेळेत आलायस मला डिस्टर्ब करायला.”
साकेतने घड्याळात पाहिलं पहाटेचे ४ वाजले होते. “म्हणजे तू रोज सकाळी व्यायाम करतोस?”
हो, इथे मंडळात स्थापन व्हायचा पाहिलाच दिवस माझा “रेस्ट डे” असतो. बाकी मी माझी शिस्त नित्य नियमाने पाळतोय. तुझ्यासारखं नाही खाऊन फक्त आराम “
साकेतला संदर्भ लागला.
साकेतला संदर्भ लागला.
“अरे नाही रे ते आपलं गमतीत” इति साकेत
“गमतीत म्हणजे? तू काय मला तुमच्या भाषेत बॉडीशेमिंगचं प्रतीक बनवणारे का?
यावर मात्र साकेत चमकला
“बाप्पा, आर यू रीअल ? तुला का असं म्हणू आम्ही? स्वप्नातही समजू नकोस असं प्लीज. तू लाडका आहेस आमचा”
“हो का ? तुझं रील पहिलं मी. बी लाइक, बाप्पा ! हॅशटॅग मोदक मॅडनेस. मोदक खाऊन झोपणे आणि बसून राहणे कस महत्त्वाचे आहे ? सिरिअसली?”
“मला मोदक आवडतात “इति साकेत.
“हो, मलापण. पण म्हणून मी व्यायामाला बगल देत नाहिये, तुझ्यासारखी”
“पण यात बॉडी-शेमिंग वगैरे कुठे आलं ?” साकेतला बाप्पाने स्वतःहून असं म्हणलेले अजिबात पटत नव्हतं.
“अरे प्रत्येक लट्ठ व्यक्तीला गणपती झालाय नुसता, असं इतक्या सहज म्हणता. आणि अलीकडे तर त्याबद्दल कोणाला काही वाटेनासे झालं आहे ” बाप्पा देखाव्यात उभ्या असलेल्या सायकलवर बसून पेडल मारू लागला.
“म्हणजे?” साकेतही त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
“म्हणजे तुम्ही सोयीस्कर वापर करताय स्वतःच्या कुपोषित म्हणजे अनहेल्दी असण्याचा! आणि त्यात भरीस भर म्हणून काहीही खाता, बाप्पाचा प्रसाद म्हणून…”
त्यावर साकेत काहीतरी बोलणार इतक्यात बाप्पाच म्हणाला, “ मला सांग, मी कधी म्हटलं मला चांदीचा वर्ख असणारे मोदक हवेत? किंवा, मी कधी म्हटलं की मोदक तयार करताना वारेमाप साखर पाहिजे? किंवा कोणता ग्रंथ सांगतो की मला तळलेले वेफर्स आणि समोसे प्रसाद म्हणून द्या? गजवदन आहे म्हणून माझी अंगयष्टी परस्पर ठरवली तुम्ही माणसांनी. माझ्या नावावर काहीही खपवता तुम्ही. मी आपला दात तुटला म्हणून चावायला सोपा आणि भूक शमविण्यासाठी म्हणून गूळ वितळवून पौष्टिक गोडव्यासाठी खोबऱ्याचा मऊसूत मोदक खाल्ला. तुम्ही त्याला काय काय रूपं दिलीयेत – म्हणजे माझ्यासाठी कमी आणि स्वतःची हौसच जास्त”
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोटदुखी (उदरशूल)
साकेत यावर विचारात पडला. “बाप्पा तू म्हणतोयस ते पटतंय मला. मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ असं म्हणतात ना”
“हो पण तो योग्य प्रमाणात तुमच्या भाषेत सांगायचं एका पदार्थात पोषणघटक देणारा पदार्थ असायला हवा असं आहे ते. अरे तुम्ही स्वतः ला उत्सवमूर्ती म्हणत नाहक प्रसाद म्हणून काहीही खाता. माझ्या निमित्ताने मी कधी ऐकलेही नाहीत असे पदार्थ स्वतःच ठरवून पदार्थ खाता आणि मग वाढलेल्या वजनासाठी आणि त्या डायबिटिससाठी वरती मलाच कारण ठरवता. मला हेच खटकतं.”
“परवा माझ्या आगमन सोहळ्यात एक माणूस पडला. पाहायला गेलो तर दारू पिऊन ठार बेशुद्ध पडला होता “
मग लक्षात आलं मी येतोय म्हणून आनंदाने दारू पिऊन नाचताना पडला कारण शुद्ध हरपली होती. काही अर्थ आहे का याला ?”
“सॉरी बाप्पा”
बोलता बोलता बाप्पाने व्यायामाचा वेग शेजारच्या कार्डियो मशीन कडे वळवला. साकेत त्यावर म्हणाला,
“मला कळतंय बाप्पा तू काय म्हणतोयस. चुकतंय आमचं बरंच काही. पण तुला आम्ही बॉडीशेम नाही करत आम्ही. तू हा गैरसमज आधी मनातून काढून टाक ” साकेत कळवळून म्हणाला.
मला सांग गणपती बाप्पाच्या आवाजात मिश्कीलपणा होता …
“अगदी मे महिन्यापर्यंत मेहनतीने तू नियमित व्यायाम केलास, वजन कमी केलस … गेले ३ महीने ढिम्म आहेस. आता कुठे वजन आटोक्यात येतय तर खुश झालास स्वतः वर. व्यायाम नाही, चालणं नाही. स्विमिंग पण बंद. आज तर कमालच. मोदक मॅडनेस म्हणून अवाजवी वागणं सुरु आहे, तो रुमाल दे आता घाम आलाय”
विचारमग्न साकेतने तत्परतेने शेजारचा रुमाल बाप्पाकडे सोपवला.
बाप्पाच्या हातात रुमाल देता देता तो म्हणाला, “हे बघ बप्पा मी उगाचच अतिरेक करत नाही. आणि प्रेशर नाही घेत जाड असल्याचं ३ किलो कमी झालं माझं वजन …”
“हो झालाय की, पण बाकी १५ किलोचं काय ? आणि प्रेशर… त्यावरून आठवलं, चांगल्या सवयीचं प्रेशर येतं का तुम्हाला? म्हणजे अघळपघळ असणं ज्याला तुम्ही ‘कूल किंवा चिल्ल’ म्हणून गोंजारत बसलाय त्याने विनाकारण नुकसान होतय रे तुमचं. मला तो जाड म्हणाला… याबद्दल वाईट वाटलं इथवर योग्य… पण तुम्हाला वाईट का वाटतंय? कारण कुठेतरी आपला लठ्ठपणा, आपलं शारीरिक नुकसान करतंय याची सुप्त जाणीव आहे मनात. आपल्या वेळा गडबडतायत हेदेखील ठाऊक असतं तुम्हाला फक्त त्या जाणिवेची थेट तोंडओळख नको वाटते आहे! केवळ वाईट वाटलं म्हणून खट्टू होऊन वेळ दवडू नका. वेळ काढलात तर वेळ चांगल्या अर्थाने बदल घडवेल . जितक्या प्रेमाने तुमच्या अपेक्षांची, स्वप्नांची ओढ तुम्हाला जाणवते त्यातला अर्धा तास स्वतःसाठी देण गरजेच आहे रे! मला बॉडीशेम करतायत म्हणून स्वतः निराशेच्या गर्तेत जाताना तुम्ही स्वतः साठी काय करताय हे जाणणे महत्वाचं नाहीये का? आज वाईट वाटून घ्यायचे आणि नंतर सोयिस्कर सवय करून घ्यायची आणि काय तर म्हणे हा आमचा गणपतीच आहे. त्याला मोदक खायला लागतात… किती ते भ्रामक समज?(!)”
हेही वाचा… वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या केटो डाएटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…
यावर साकेत म्हणाला “ बाप्पा बरोबर आहे तू म्हणतोयस ते. आम्ही जरा जास्त नाजूक आणि आळशी झालोय. सकाळी उठणे, व्यायाम करणे, सूर्यप्रकाशात दिवसाची सुरुवात करणं आवडतं मलापण”
त्यावर बाप्पा म्हणाला – “तुम्हाला ना त्या शिस्तीचं दडपण येत. उठा, करा… त्यापेक्षा सातत्याने करून तर पहा आणि बघा, काय गम्मत आहे स्वतःलाच नव्याने घडविण्यात. उशिरा उठून फक्त खादाडी करत राहणे यात काय कूल आहे?”
साकेतने दुजोरा देत मान डोलावली .
“आणि उगाचच वजन वजन म्हणत स्वतःच्या आळसाला भांडवल नका रे करू.”
“पण बाप्पा तू असं म्हणतोयस का, की हे प्रेशर चुकीच आहे?”
” मी असं म्हणतोय की त्या प्रेशर कुकर मध्ये उत्तम पदार्थ तयार होऊ दे. ती ऊर्जा तुम्हाला नवीन पोत, रंग, गंध देऊ दे. तसेही तुम्ही सोशल मीडियावर १ पोस्ट, १ मिनिटभरही पाहत नाही… महिनोंमहिने स्वतः इतका भार का सहन करताय?”
बाप्पाच्या या बोलण्यावर साकेतला वेगळीच उभारी आली.
“खरंय बाप्पा तुझं. आम्ही जरा जास्तच सुटलोय. सगळ्याच बाबतीत… आम्हाला ऑप्शन्स आहेत पण आमचा पेशन्स कमी झालाय. उत्सव म्हटलं की उगाचच भरभरून खावसं वाटत… त्यानिमित्ताने आम्ही जाणून बुजून चीट मिल डेज तयार केलेत.”
त्यावर खळखळून हसून बाप्पा म्हणाला “चला तुझ्याच लक्षात आलं हेही नसे थोडके.”
“तुला मी शब्द देतो बाप्पा . मी आजपासून इतकं व्यवस्थित स्वतःवर काम करेन ना की, बघच आणि मोदक मॅडनेस खरी माहिती असलेली रीलपण करेन मी “
” शप्पथ ?” बाप्पाने विचारलं
“ हो गणपती शपथ ! असे म्हणत असतानाच बाप्पाने साकेतचा हात हातात घेतला आणि तथास्तु म्हणत साकेतच्या पाठीवर थाप मारली. साकेत थोडा कळवळला.
“अरे बाप्पा हळू… ” त्यावर पप्पांचा धीरगंभीर आवाज आला.
“बाप्पा नव्हे पप्पा . किती दिवस व्यायामाला सुटी? गणपतीच्या निमित्ताने पुन्हा सुरू करा… मी धावायला जातोय. तू येतोस का?”
साकेतने डोळे लख्ख उघडून हसून त्यांच्याकडे पाहिलं. घड्याळात ५.३० वाजले होते. त्याने मंडपाकडे पाहिलं आणि आवरून बाहेर आला तेव्हा पप्पा शूज घालत म्हणाले, “ गणपती बाप्पा मोरया ! चला व्यायामाला सुरुवात करूया “
मंडळाची गणपतीमूर्ती समाधानाने हसत होती.