Kiara Advani : कियारा अडवाणी ही सिनेसृष्टीतील एक नामवंत अभिनेत्री आहे. ती फक्त तिच्या अभिनयासाठी नाही, तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तिच्या फिटनेसमागील रहस्य काय आहे? सोशल मीडियावर ती वर्कआउट करतानाचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करीत असते; पण तिच्या फिटनेसमध्ये भर घालणारी एक गोष्ट म्हणजे तिचा वर्कआउट करण्यापूर्वीचा नाश्ता. हा नाश्ता अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.
वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही जो नाश्ता करता, तो तुमच्या शरीराला फक्त ऊर्जा देत नाही, तर तो चवीला स्वादिष्टसुद्धा असतो. कियाराचा नाश्ता पाहून तुम्हाला कळेल की, नाश्ता करताना चव आणि पौष्टिकतेशी तडजोड करण्याची काहीही आवश्यकता नसते. कियाराचा नाश्ता नेमका काय असू शकतो, याचा तुम्ही विचार केला का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
वर्कआउट करण्यापूर्वी पीनट बटर आणि सफरचंद खात असल्याचे कियाराने एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे. जर तुम्हीसुद्धा तुमच्या नाश्त्यात पीनट बटर आणि सफरचंद खाण्याचा विचार करीत असाल तर त्यापूर्वी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितलेले पीनट बटर आणि सफरचंद खाण्याचे फायदे जाणून घ्या.
१. भरपूर ऊर्जा मिळते : सफरचंदामध्ये पचायला सोपी अशी कर्बोदके असतात; जी शारीरिक हालचाल करताना स्नायूंना ऊर्जा देण्यासाठी उपयोगी पडतात. ही कर्बोदके स्टॅमिना वाढण्याससुद्धा मदत करतात. त्यामुळे वर्कआउट करण्यापूर्वी सफरचंद खाणे फायदेशीर असते.
२. भरपूर फायबर असतात : सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे फार भूक लागत नाही. रक्तात साखर जमा होते: जी ऊर्जेची पातळी अचानक वाढवते. त्यामुळे वर्कआउट करताना ही ऊर्जा कामी पडते.
३. चांगले फॅट्स असतात : पीनट बटरमध्ये चांगले मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात; जे ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वर्कआउट करताना फायदा होतो.
४. स्नायूंना मजबूत करतात : पीनट बटरमधील प्रोटिन व्यायामानंतर स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात. वर्कआउट केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही.
५. रोगप्रतिकार शक्ती वाढते : पीनट बटर आणि सफरचंदामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व क व जीवनसत्त्व ई हे घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
हेही वाचा : पुरुषांनो, सतत मोबाइल वापरता? कायमस्वरूपी वंध्यत्व निर्माण होऊ शकते; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..
या नाश्त्याचे इतके फायदे असूनसुद्धा डॉ. रोहतगी यांनी काही लोकांना हा नाश्ता करू नये, असे सांगितले आहेत. त्या सांगतात, “ज्या लोकांना शेंगदाण्याची अॅलर्जी आहे, त्यांनी पीनट बटर खाणे टाळावे. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांनी सफरचंदातील कर्बोदकांचे प्रमाण आणि रक्तातील साखरेचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घ्यावी.” पुढे डॉ. रोहतगी सांगतात, “ज्या लोकांना कमी फॅटयुक्त आहार घ्यायचा आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या आहे, त्यांनीसुद्धा सफरचंद आणि पीनट बटर खाण्यापूर्वी विचार करावा.”
हा पौष्टिक नाश्ता अनेक लोकांना भरपूर ऊर्जा देतो. जर तुम्ही वर्कआउट करण्यापूर्वी हा नाश्ता करण्याचा विचार करीत असाल, तर त्यापूर्वी तुमच्या आहाराच्या गरजा लक्षात घेऊन तुमच्या आरोग्यासाठी ते कितपत फायदेशीर आहे, याचा विचार करावा.