अनेक महिला आणि मुलींना पीसीओएसचा त्रास असतो. या समस्येत शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढतं. पीसीओएसमध्ये चेहऱ्यावरचे, अंगावरचे केस वाढणं, पाळी अनियमित येणं, चेहऱ्यावर मुरमं-पुटकुळ्या येणं, ओटीपोट वाढणं, तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणं या समस्या जाणवतात. यासोबतच या महिलांच्या हृदयावरही परिणाम होतो.
विशेषतः जेव्हा त्यांना उच्च रक्तदाब आणि टाईप २ मधुमेह होतो. म्हणून त्यांना त्यांच्या आहारावर आणि व्यायामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पीसीओएस ही गंभीर समस्या असली तरी योग्य व संतुलित आहार आणि व्यायाम याद्वारे ती नियंत्रित करता येते. व्यायाम करताना पीसीओएस डोळ्यासमोर ठेवून काही विशिष्ट व्यायामप्रकार केल्यास पीसीओएसची समस्या नियंत्रणात ठेवण्यास त्याचा फायदा होतो. कोरोनरी या रोगामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत नसले तरी अभ्यासातून असे दिसून येते की, PCOS असलेल्या स्त्रियांना याचा धोका जास्त असतो. स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. आभा भालेराव यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
PCOS चा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याशी कसा संबंध आहे?
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या पसरण्याऐवजी अरुंद होतात; ज्यामुळे छातीत दुखते. त्यामुळे रक्तवाहिनीच्या आत अगदी लहान प्लेक्स फुटण्याचा धोका वाढतो. हे तुमच्या हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह रोखू शकते; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. डायस्टोलिक डिसफंक्शन तेव्हा उदभवते जेव्हा तुमच्या खालच्या हृदयाच्या कक्षांना पाहिजे तसा आराम मिळत नाही. तसेच ओटीपोटाचा लठ्ठपणा, व्हिटॅमिन बी-६ व बी-१२ ची कमतरता असते; ज्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे पोटाची चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
PCOS असलेल्या महिलांमध्ये कोणती जीवनशैली जोखीम वाढवू शकते?
चुकीच्या जीवनशैलीचं पहिलं उदाहरण म्हणजे बसून राहण्याच्या सवयी; ज्यामुळे वजन जलद वाढू शकते. त्याशिवाय कार्बोहायड्रेट-जड आहार, अल्कोहोल, काम किंवा वैयक्तिक ताण, झोपेची अनियमित पद्धत यांमुळे महिलांनी व्यायाम करणे, हालचाल करणे महत्त्वाचे आहे. केवळ प्रौढ महिलाच नव्हे, तर हल्ली किशोरवयीन मुलींमध्येही पीसीओएसच्या (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. लठ्ठपणा, बैठी जीवनशैली व आनुवांशिकता हे पीसीओएस होण्यामागचे मूळ कारण असू शकते.
PCOS असणा-या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची सूक्ष्म लक्षणे कोणती?
छातीत अस्वस्थता, विशेषत: स्त्रियांमध्ये बहुतेकदा तीव्र किंवा अगदी स्पष्ट लक्षण नसतं. याव्यतिरिक्त छातीत दुखणं हे नेहमीच हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण नसतं. छातीत दुखण्याव्यतिरिक्त हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये ही लक्षणं असू शकतात.
- पाठीच्या वरच्या भागात, खांदा दुखणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, मान, जबडा दुखणे
- श्वसनाचा त्रास, एक किंवा दोन्ही हात दुखणे
- उलट्या होणे किंवा मळमळ होणे
- घाम येणे, अशक्त किंवा अस्थिर वाटणे
- असामान्य थकवा, अपचन आणि छातीत जळजळ
PCOS रूग्णांसाठी व्यायाम महत्त्वाची भूमिका कशी बजावतो?
PCOS रुग्णांनी दर आठवड्याला किमान १५० मिनिटं शारीरिक हालचाल केली पाहिजे. PCOS असलेल्या महिलांनी मध्यम ॲरोबिक व्यायाम केला पाहिजे, PCOS मधील व्यायाम उपचारांमुळे १२ आठवड्यांच्या कालावधीत बराच फरक दिसतो. PCOS असलेल्या बारीक स्त्रियाही व्यायामाचा फायदा घेऊ शकतात.
हेही वाचा >> ॲव्होकॅडो या फळाचे फायदे वाचून थक्क व्हाल! वाचा रोज किती प्रमाणात खावं हे फळ
नियमित तपासणी का महत्त्वाची ?
PCOS असलेल्या व्यक्तींची नियमित तपासणी आणि हृदयाच्या आरोग्याचं मूल्यांकन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. नियमित कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या चाचण्या करून, मधुमेह किंवा प्री-डायबेटिस यांसारख्या समस्या वेळीच लक्षात येऊ शकतात.