पासवर्ड म्हणजे परवलीचा शब्द. ‘तिळा, तिळा दार उघड’ असे अलीबाबाने म्हटले आणि खजिन्याच्या गुहेचे दार उघडले. लहानपणी या गोष्टीमुळे आपली पासवर्डशी ओळख झाली. आत्ताच्या पिढीची फोनचा, इमेलचा पासवर्ड अशी या संकल्पनेशी ओळख होते. पासवर्डने एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो. अलिबाबाला खजिना सापडला. तो खजिना घरी घेऊन जाणे, तो सुरक्षित ठेवणे, दरोडेखोरांना धडा शिकवणे असे सारे योजनाबद्धपणे आणि कृतीशील होऊन केल्यावर त्याला यश लाभले आणि खजिना त्याचा झाला! आनंदाच्या पासवर्डचेही असेच आहे. आनंदाचा ठेवा मिळवायचा तर आपल्या आयुष्याची दिशाच बदलावी लागते. विचारपूर्वक, योजना करून आणि कृतीशील बनून आनंदाचा शोध घ्यायचा, मनातल्या अनेक (नकारात्मकता, असमाधान, चुकीची जीवनशैली इ.) दरोडेखोरांपासून, तो वाचवायचा आणि मग कायमस्वरूपी आनंदाची वाट चोखाळायची.
सुशीलला अतिरेकी कामाचा खरंच कंटाळा आला होता. सतत कुठलीतरी शर्यत आपण धावतो आहोत असे वाटायला लागले होते. काम आणि घर यामधल्या रेषा धूसर झाल्या होत्या. घरी गेल्यावरही कामाचे फोन सतत सुरू असायचे, डोक्यात सतत कामाचे विचार असायचे, झोपेतही तेच व्हायचे. सकाळी उठल्यावर हात आधी फोनकडे जायचा. त्या दिवशी सुट्टी होती. टीव्हीवर धावण्याच्या स्पर्धा चालल्या होत्या, त्या तो पाहत बसला होता. शेजारी त्याचा १४ वर्षांचा मुलगा समोर चाललेल्या १०० मीटर, ४०० मीटर इत्यादी रेसेस मस्त एन्जॉय करत होता. ‘कोणीही जिंकले तरी याला आनंद होतोय!’ सुशीलला वाटले. काय नशीबवान आहे! मला सतत मीच ती रेस पळतोय असा वाटतंय,’ सुशीलचा स्वतःशी संवाद सुरू होता. त्याने मुलाला विचारले,’ केवढा खूश होतोयस तू? जणू तुझा मित्रच जिंकलाय रेस!’ मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, तुम्हाला माहित्येय किती टफ असतं ट्रेनिंग? किती कष्ट केलेत या सगळ्यांनी? जिंकणे सोपे नाही आहे. म्हणून जिंकण्यातला आनंद जबरदस्त आहे! दर वेळेला नाही काही हाच जिंकणार, पण म्हणून काही तो थांबत नाही, त्याला धावणं आवडतं, तो प्रेमाने धावतो, जणू त्याच्या आयुष्याचे तेच ध्येय आहे! किती छान ना, त्याला माहित आहे आपल्याला काय करायचंय, का करायचंय!’
हेही वाचा : आरोग्य वार्ता : प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे गंभीर आजारांचा धोका कमी
आनंदाने शर्यत पाहणारा आपला मुलगा आणि प्रचंड दबावाखाली आणि तरीही आनंदाने पाळणारे स्पर्धक यांनी सुशीलला बराच विचार करायला प्रवृत्त केले. पुढचे काही दिवस तो विचारांमध्ये बुडून गेला. समुद्रमंथनामधून अमृत निघावे तसे त्याच्या विचारमंथनातून ‘आनंदाचा पासवर्ड’ त्याला सापडला. सगळ्यात प्रथम त्याने विचार केला, ‘आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कुठल्या? आपल्या कामात आपल्याला काय केल्याने आनंद मिळतो?’ आवडीचा प्रोजेक्ट, कामाचे नियोजन करणे, ते कृतीत आणणे, अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर आल्या. कोणत्या प्रकारचे काम करायला आपल्याला आवडेल ह्याचा विचार करून आपण ही नोकरी स्वीकारली. मग काम करताना आनंद का मिळेनासा झाला? आपण आपले अग्रक्रम(priorities), उद्दिष्ट(purpose) विसरलो की काय? विचारांमधून सुशीलला कृतीची स्पष्टता येऊ लागली. मनात एक हळूवार झुळूक पसरली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
हेही वाचा : Mental Health Special : दिवाळीत बिंज वॉच करणार आहात? मग हे वाचाच!
थोडक्यात काय आनंदाच्या वाटेवर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर चालायला सुरुवात करता येते. सुशीलने प्रयत्नपूर्वक आपल्या दैनंदिन जीवनात बदल केले. मुलाच्या बॅडमिंटन प्रॅक्टिसला महिन्यातून एखादवेळेला तरी जायला लागला. स्वतः पोहणे सुरू केले. ज्या गोष्टी पूर्वीपासून त्याला आनंद देत असत त्या त्याने पुन्हा सुरू केल्या. मनातल्या विचारांना लगाम घालण्यासाठी एक डायरी ठेवली. त्यात नोंद करायची, अग्रक्रम ठरवायचा आणि त्याप्रमाणे वागायचे असे करू लागला. एका देणगीच्या निमित्ताने जवळच असलेल्या एका वस्तीप्रकल्पाशी त्याची ओळख झाली. त्यांच्या एका कार्यक्रमाला नियोजनात मदत करण्यासाठी म्हणून गेला आणि तिथलाच होऊन गेला. आपण एनएसएस मध्ये का जायचो याचे उत्तर आत्ता त्याला सापडले. इतरांसाठी काम करताना आपल्याला समाधान मिळते याचा सुखद अनुभव आला. गेली काही वर्षे आपल्या पत्नीने आपल्याला कसे काय सहन केले असा त्याला प्रश्न पडला, आपल्या नात्यांच्या दृढतेचा अनुभव त्याला धीर देऊन गेला आणि त्याच्या सगळ्या प्रयत्नांना बळ मिळाले. आता टीव्हीवर शर्यत बघताना मुलाबरोबर निखळ आनंद घेणे सुशीलला सहज जमू लागले.
हेही वाचा : Health Special: आवळा खा, आजारांना दूर ठेवा
आपल्या जीवनाचे उद्दिष्ट, ध्येय(purpose) सापडणे हा आनंदाच्या वाटेवरचा पहिला मैलाचा दगड म्हणता येईल. आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या पलीकडे जाऊन समाज, समष्टीसाठी आपले थोडे का होईना योगदान हा आणखी एक मैलाचा दगड. या गोष्टी जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आणि आयुष्यात समाधान देतात. अंतर्मुख होऊन आपल्या आयुष्याकडे पाहणे, म्हणजेच अध्यात्मिक दृष्टी बाळगणे हेसुद्धा मानसिक समाधानाचे एक साधन आहे. स्वतःचे वैयक्तिक आयुष्य जगताना केलेले जीवनशैलीतील बदल म्हणजे आनंदाच्या वाटेवरचे पुढचे मैलाचे दगड. प्रत्येकासाठी हे मैलाचे दगड वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण! एकदा आनंदाचा पासवर्ड मिळाला की आनंदाची वात चोखाळता येते हे नक्की!