Anxiety : तुम्हाला कधी सकाळी उठल्यानंतर डोके किंवा हृदय खूप जड झाल्याचे जाणवते का? किंवा अंथरुणातून बाहेर पडताच निराशा, चिंता किंवा तणाव जाणवतो का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने मेंटल हेल्थ स्टार्टअप लिसून येथील प्रमुख जसरीन बिर्गी यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली आहे.
“जरी तणाव हा दैनंदिन आयुष्याचा भाग असला तरी नियमित नको त्या गोष्टींविषयी चिंता व्यक्त करणे, हे एंग्झायटीचे लक्षण आहे”, असे जसरीन बिर्गी सांगतात.
एंग्झायटी म्हणजे काय?
एंग्झायटी हा एक मानसिक आजार आहे. व्यक्तीच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असतात, ज्यामुळे तणाव, चिंता, अचानक हृदयाची गती वाढणे इत्यादी लक्षणे यामध्ये दिसून येतात.
२०२१ च्या एका लान्सेट अभ्यासात करोना काळात भारतात एंग्झायटीचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले होते. या अभ्यासात असेही समोर आले होते की, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत महिला आणि तरुण लोकांवर एंग्झायटी आणि नैराश्याचा खूप जास्त प्रमाणात वाईट परिणाम दिसून आला आहे.
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने २०२० मध्ये असाच एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये ९.३ टक्के भारतातील १८ ते २४ वयोगटातील तरुण करोनाच्या सुरुवातीच्या काळात एंग्झायटी आणि नैराश्याला सामोरे गेले होते. याबरोबरच रिपोर्टमध्ये असेही सांगितले की, पुरुषांपेक्षा स्त्रियांवर एंग्झायटी आणि नैराश्याचा जास्त परिणाम दिसून आला.
सकाळी उठल्यानंतर काही लोकांना एंग्झायटीचा सामना का करावा लागतो?
बिर्गी सांगतात, “चिंता आणि तणाव एकमेकांशी संबंधित आहे. परीक्षेपूर्वी किंवा नोकरीसाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी तुम्हाला चिंता वाटू शकते, पण तुम्ही नियंत्रणाबाहेर चिंता व्यक्त करत असाल ज्यामुळे तुम्हाला तणाव जाणवतो, तर हे गंभीर लक्षण असू शकते.
सकाळी एंग्झायटी येण्यामागे कोणती कारणे असू शकतात?
१. बायोलॉजिक कारणे
शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते.
२. एंग्झायटीचा आजार
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत असेल, तर ही एंग्झायटी आजाराची लक्षणे आहेत.
३. कमी झोप
झोप नेहमी उत्तम असावी. नीट झोप झाली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी एंग्झायटी जाणवू शकते.
४. कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन
कॅफिनयुक्त पेय किंवा साखरेच्या अतिसेवनामुळे एंग्झायटीचा धोका वाढतो. काही रिसर्चमधून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन करू नये.
५. धूम्रपान किंवा मद्यपान करू नये
अनेक रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, धूम्रपानामुळे किंवा मद्यपानामुळे एंग्झायटीचा धोका वाढू शकतो. सकाळी उठल्यानंतर यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो.
६. आजारी असाल तर…
जर तुम्ही आजारी असाल किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर अशा लोकांना एंग्झायटीची समस्या होऊ शकते.
७. दैनंदिन आयुष्यातील घडामोडी
दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम जाणवतात. घर बदलणे, नोकरी बदलणे, कामाच्या ठिकाणी तणाव, मानसिक आणि शारीरिक अत्याचार, ब्रेकअप किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी, नातेसंबंधात तणाव इत्यादी गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवू शकते.
एंग्झायटीचा सामना कसा करायचा?
- कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.
- चांगला आरोग्यदायी नाश्ता करा.
- आराम करा.
- चांगली झोप घ्या.
- लवकर झोपण्याची सवय लावा.
- दररोजचे वेळापत्रक बनवा.
- नियमित व्यायाम करा.
- तणावाची परिस्थिती नीट हाताळा.
- नकारात्मक विचार दूर ठेवा.