आहाराचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. त्यासाठीच आहारात जाणीवपूर्वक आरोग्यदायी गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमूळ म्हणजे गाजर (Carrot). बीटा कॅरोटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. हे कंदमूळ आपण सॅलड, भाजी, पुडिंग किंवा ज्यूसच्या स्वरूपात खाऊ शकतो. गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर अनेक रोगांसाठी एक चांगलं औषध आहे, असं म्हटलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरूपात. बहुगुणी गाजर शरीरातील विविध अवयवांसाठी पोषक आहे. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीराचं योग्यरीत्या पोषण होतं. प्राचीन काळापासून गाजराचा आहारात वापर केला जातो. अनेक पोषक घटकांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं, असा सल्ला नेहमी दिला जातो. पण, गाजर खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर व लठ्ठपणा नियंत्रित करता येतो का, याच विषयावर अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषण तज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी माहिती दिली असल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. चला तर जाणून घेऊया डॉक्टर काय सांगतात.

(हे ही वाचा : मधुमेहींना डार्क चाॅकलेटची चव चाखता येईल का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या… )

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल?

डॉ. प्रियंका रोहतगी म्हणतात, “गाजर पोषक घटकांनी समृद्ध आहे. म्हणूनच गाजराला सुपरफूड म्हटलं जातं. गाजरामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो. मधुमेही रुग्णांना गाजरांसह पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरातील फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गाजरातील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनदेखील मधुमेह होण्याची शक्यता कमी करते. गाजरात असलेलं पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. त्याच्यामध्ये बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन व ल्युटीन यांसारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ यांचा सामना करण्यासही मदत करतात. गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं.”

कोलेस्टॉलची पातळी कमी करण्यास मदत होईल?

डॉ. सांगतात, “गाजर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. त्याच्यातील अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर असतात. गाजरात आढळणारं फायबर हृदयविकारापासून संरक्षण करतं. लाल गाजरामध्ये लायकोपिनदेखील असतं; जे हृदयविकारापासून बचाव करतं. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीराला अॅंटिऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. म्हणूनच हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी गाजर आहारात असायलाच हवं.”

(हे ही वाचा : नारळ पाणी रोज प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं का? वाचा तज्ज्ञांचं उत्तर… )

वजन नियंत्रणात राहिल?

डॉ. नमूद करतात की, “थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊब राहते. गाजरामुळे वजन वाढत नसल्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह अधिक असतं. त्यामुळे त्याचं सेवन केल्यास अॅनिमियासारखा आजार दूर होतो. गाजरांच्या पानांची भाजीदेखील तयार केली जाते. गाजर खाल्ल्यानं किंवा त्याचा रस प्यायल्यानं तुमचं वजन कमी होऊ शकतं. गाजरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतं आणि वजन कमी करण्यासाठी ते काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं. त्याच वेळी त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं; ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे गाजर खाणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.”

गाजर व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम व लोह यांसारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे. शरीरासाठी गाजराचे अनेक फायदे आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत; जे मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षण करू शकतात. गाजरामुळे मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. विविध प्रकारच्या हृदयविकारांवरही त्याचा उपयोग होऊ शकतो. चांगल्या पचनासाठी गाजराचा रस किंवा सॅलडच्या स्वरूपात त्याचं सेवन केलं जाऊ शकतं, असेही डॉ. रोहतगी नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you need a daily dose of carrots for controlling cholesterol blood sugar and obesity at one go learn from health experts pdb
Show comments