सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सुका मेवा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यात आणि वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. मेव्यात फॉलिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, फायबर, खनिजे, जीवनसत्व हे पौष्टिक तत्व असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे आहेत. मग मेव्यांचे सेवन करण्यापूर्वी एक प्रश्न मनाला शिवतो तो म्हणजे ते भिजवून खायचे की आहे तसेच खायचे? या प्रश्नावर पोषणतज्ज्ञ नमामी अगरवाल यांनी अलिकडेच इन्स्टाग्राम रीलद्वारे चर्चा केली आहे.
सुका मेवा न भिजवता खाणे ही मेवा खाण्याची योग्य पद्धत नसल्याचे नमामी यांनी म्हटले आहे. भिजवल्याशिवाय का खाऊ नये, यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले. फळे आणि काही भाज्या या कच्च्या खाल्या जाऊ शकतात. बाकीचे सर्व पदार्थ भिजवून किंवा शिजवावे लागतात. कच्च्या मेव्यात मोठ्या प्रमाणात फायटिक अॅसिड असते. फायटिक अॅसिड हे मेव्याचा बाह्य थर आहे जे बाह्य घटकांपासून मेव्याचे संरक्षण करते. जेव्हा आपण त्याचे सेवन करतो तेव्हा पोटात जळजळ होते आणि ते शरीरात पोषक तत्वांचे शोषण मंदावते, असे नमामी म्हणाल्या.
(झोप लागत नाही? ‘या’ सवयी असू शकतात जबाबदार)
जर तुम्ही मेवा आणि बिया भिजवल्या तर तुमचे शरीर पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात. पौष्टिक मेव्यांमध्ये पोषक तत्व आवरोधक असतात जे पोषक तत्वांचे संरक्षण आणि त्यांचे अस्तित्व जपतात. सुका मेवा भिजवून तुम्ही हानीकारक आणि पौष्टिक अवरोधक कमी करू शकता, जे पाण्यात शोषले जातात.
अवरोधक आणि हानीकारक रसायनांच्या अनुपस्थितीत सुक्या मेव्यातील पोषक तत्व सहजपणे शोषले जातात. याव्यतिरिक्त ते तुमच्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करतात. भिजवलेला सुका मेवा सहजपणे शरीरात शोषला जातो. म्हणून सुका मेवा भिजवून खा, असा सल्ला नमामी यांनी दिला आहे.