Benefits of Mustard seeds: पावसाळ्यात सर्दी ताप खोकला यांसारखे आजार बळावतात .अशावेळी तोंडाची चव निघून गेल्यासारखे वाटते. ही गेलेली चव परत यावी तसेच घश्याला व शरीराला उबदार गरम शेक मिळावा म्हणून चिकन सूप किंवा रस्सा पिण्याचा सल्ला दिला जातो. आता यासाठी चिकन किंवा नॉनव्हेजचाच पर्याय उत्तम आहे का? तर असं नाही. डॉ नीती शर्मा, वरिष्ठ सल्लागार, मारेंगो एशिया हॉस्पिटल्स, गुरुग्राम यांनी सांगितले की, चिकन सूप किंवा रस्स्यामध्ये भरपूर खनिजे असतात. पण हीच खनिजे व पोषकसत्व आपल्याला रसम, ग्रीन टी, दालचिनी, हळद व आल्याचा हर्बल टी/ काढा किंवा गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यावर सुद्धा मिळू शकतात. कोणतेही उबदार द्रव्य आपल्याला नाक बंद होणे व घसादुखी सारख्या त्रासावर उपाय मिळवून देऊ शकतात. सध्या अनेक घरांमध्ये श्रावण महिना पाळला जात असल्याने हे शुद्ध शाकाहारी पर्याय सुद्धा तुमची मदत करू शकतात.
सर्दी खोकला दूर करणाऱ्या द्रव्यांविषयी माहिती देताना डॉ नीती यांनी आपण डाळी, रस्सम, आमटीला फोडणीत वापरत असलेल्या मोहरीच्या दाण्यांचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केले. डॉक्टर सांगतात की, “मोहरीच्या दाण्यांमध्ये आयसोरहॅमनेटीन, केम्पफेरॉल आणि कॅरोटीनोइड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे आपल्या शरीराचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान, जुनाट आजार आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत होते. मोहरी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि कॅन्सर-विरोधी म्हणून ओळखले जाते.
फोडणीसाठी मोहरी वापरण्याचे फायदे
1) जेव्हा श्वसन संबंधित आजारांचा प्रश्न येतो तेव्हा मोहरी रक्तसंचय-संबंधित समस्या दूर करण्यासाठी ओळखली जाते. मोहरीच्या बियांमध्ये ऍलिल आयसोथियोसायनेट सारखी संयुगे असतात जे बॅक्टेरियाची वाढ प्रतिबंधित करतात.
2) मोहरीची पाने आणि बिया अ, क आणि के जीवनसत्त्वे समृध्द मानल्या जातात, यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.
3) मोहरीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर, सेलेनियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असतात, यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
4) मोहरीच्या पानांच्या अर्कामुळे मधुमेह असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. तर मोहरीच्या दाण्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास जळजळ कमी होते. मोहरी त्वचेच्या जखमा आणि त्वचारोगात सुद्धा फायदेशीर ठरतात.
5) मोहरीतील ग्लुकोसिनोलेट्स आणि मायरोसिनेज सारखी संयुगे फायटोकेमिकल्स वापरण्यासाठी ओळखली जातात जी कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. यासंदर्भात आणखीन अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हे ही वाचा<< १०० ग्रॅम भेंडीची भाजी शरीराला देते ‘हे’ फायदे; डायबिटीज व प्रेग्नन्सीमध्ये भेंडीच्या सेवन करावे का? वाचा
6) मोहरीच्या बियांमध्ये अशी संयुगे असतात जी शरीरात थर्मोजेनेसिस वाढवू शकतात. याचा अर्थ शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी अधिक कॅलरी बर्न करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
7) मोहरीच्या बियांमध्ये सेलेनियम असते जे थायरॉईड सारख्या त्रासांवर समाधान देऊ शकतो.