ड जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे पुरेसा सूर्यप्रकाश. पण, तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल किंवा तुमच्या आहार आणि दैनंदिन कामांमधून पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळत नसेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सप्लिमेंट्स मदत करू शकतात. पण सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही जर तुमच्यात ड जीवनसत्त्वाची पातळी कमी असेल, तर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ…

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईच्या परळ ग्लेनेगल्स हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसिन विषयातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात, “तुमच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची प्रक्रिया कशी होते यावर आतड्यांचे आरोग्य, लठ्ठपणा, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा यकृताचे आजार यांसारखे घटक लक्षणीय परिणाम साधू शकतात.”

“ड जीवनसत्त्वाचे शोषण हे आतड्याच्या आहारातील फॅट्स शोषण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. यकृतासंबंधित आजार, सिस्टिक फायब्रोसिस (cystic fibrosis), सेलियाक डिसीज (celiac diseas), अल्सरेटिव्ह कोलायटिस (ulcerative colitis) किंवा क्रोहन डीसीज (Crohn’s disease) यांसारख्या फॅट्स शोषण्याला बाधा आणणाऱ्या आरोग्यस्थिती ड जीवनसत्त्वाच्या शोषणातही अडथळा निर्माण करू शकतात,” असे युटोपियन ड्रिंक्सच्या मुख्य पोषण सल्लागार डॉ. नंदिनी सरवटे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले.

ड जीवनसत्त्वाचे चांगल्या पद्धतीने शोषण व्हावे यासाठी निरोगी फॅट्सची आवश्यकता असते. “लोक रिकाम्या पोटी किंवा कमी फॅट्सयुक्त जेवणासह सप्लिमेंट्स घेण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांची प्रभावीता कमी होऊ शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

डॉ. सरवटे सांगतात, “जर तुम्हाला शंका असेल की, फॅट्सच्या कमतरतेच्या समस्येमुळे तुमच्या ड जीवनसत्त्वाच्या पातळीवर परिणाम होत आहे, तर तुम्ही स्वतःच निदान करून, स्वतःवर उपचार घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

“बरेच लोक अनेकदा चुकीच्या प्रकारचे ड जीवनसत्त्वाचे सप्लिमेंट्स घेतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेण्याचा प्रयत्न केल्यास असे अनेकदा होऊ शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

वृद्ध प्रौढांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. डॉ. सरवटे यांच्या मते, “हे अंशतः कारण म्हणजे त्वचेची ड जीवनसत्त्व संश्लेषित (Vitamin D synthesized – शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन किंवा ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खाऊन ड जीवनसत्त्व तयार करते) करण्याची क्षमता वयानुसार कमी होते आणि त्यांच्या आहारात ड जीवनसत्त्वाचे अपुरे सेवनदेखील होऊ शकते.

टाळा या चुका

“लक्षात ठेवा, सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्व तयार करण्याचा एक नैसर्गिक आणि सर्वांत प्रभावी मार्ग आहे. आठवड्यातून काही वेळा १० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा. तुमच्या आहारात ड जीवनसत्त्व समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा,” असे डॉ. सरवटे म्हणाले.

दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना आहारतज्ज्ञ लव्हलीन कौर सांगतात, “गाजरांसारख्या कच्च्या भाज्या जेवणापूर्वी खाल्यास ड जीवनसत्त्व शोषण्यास मदत मिळते.”

डॉ. अग्रवाल म्हणाले, “नियमित रक्त तपासणी तुमच्या पातळीचे निरीक्षण करण्यास मदत करू शकते. जर कमतरता जास्त काळ राहिली, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

(टीप : वरील माहिती सार्वजिनक डोमेन किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Story img Loader