Widow Maker Heart Attack: मागील काही वर्षात हृदय विकाराचा झटका आल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये सामान्य व्यक्तीच नव्हे तर आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणाऱ्या सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे. हृदयविकाराचा झटका येण्यामागे तुमची जीवनशैली प्रमुख कारण असली तरी काही वेळा अनुवांशिक घटकांमुळे सुद्धा हे संकट ओढवू शकते. डायबिटीज, स्थूलता किंवा अन्य आजारांप्रमाणेच हृदयविकाराचे सुद्धा काही प्रकार असतात. हार्ट अटॅकची तीव्रता व लक्षणे यानुसार सर्वात धोकादायक व गंभीर प्रकार म्हणजे एसटी-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजेच ‘Widow’ हार्ट अटॅक!
इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ प्रदीप हरानाहल्ली यांच्या माहितीनुसार, या हृदयविकाराच्या झटक्याच्या गांभीर्य लोकांच्या लक्षात यावे यासाठी ‘Widow’ असे नाव देण्यात आले आहे. Widow या शब्दाचा मराठी अर्थ विधवा असाही होतो.
पण, Widow Maker हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हा एक प्रकारचा हृदयविकाराचा झटका आहे ज्यामध्ये हृदयाच्या सर्वात मोठ्या धमनीमध्ये, डाव्या अँटीरियर डिसेंडिंग (LAD) धमनीमध्ये पूर्ण ब्लॉकेज होते. डॉ. व्यंकटेश टी के, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स,यांच्या माहितीनुसार, “हृदय हे पिशवीसारखे आहे हृदयाच्या बाजूला दोन कोरोनरी धमन्या असतात. यातील डाव्या कोरोनरी धमनीतुन हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा ५० टक्के पुरवठा होतो. जेव्हा हृदयाच्या मोठ्या धमनी-डाव्या अग्रभागी उतरत्या धमनीमध्ये पूर्ण अडथळा येतो तेव्हा विडो हृदयविकाराचा झटका येतो. हा झटका एवढा तीव्र असतो की त्वरित जीव सुद्धा गमवावा लागू शकतो.
डॉ भरत व्ही पुरोहित, संचालक, कॅथ लॅब, आणि वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल्स सांगतात की कोलेस्ट्रॉल व रक्ताच्या गुठळ्या झाल्याने सहसा हृदयाच्या बाजूच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात. पण लक्षात घ्या फक्त ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा झटका येत नाही. ब्लॉकेजच्या वर रक्त गोठल्यास मग हृदयविकाराचा झटका येतो. ब्लॉकवर रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यास, स्नायूंना होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो, आणि हृदयाच्या स्नायूला इजा होऊन मृत्यू होतो
डॉ. व्यंकटेश यांच्या माहितीनुसार, आतापर्यंतची आकडेवारी पाहिल्यास, विडो हार्ट अटॅक येताच तात्काळ मृत्यू होऊ शकतो आणि उर्वरित ज्यांचा जीव वाचतो त्यापैकी १० टक्के लोक १ वर्षाहून अधिक जगू शकत नाहीत.
Widow Maker हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे काय आहेत?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लक्षणे इतर कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराच्या झटक्यांसारखीच असतात, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- छातीत दुखणे किंवा अस्वस्थता
- धाप लागणे
- भरपूर घाम येणे
- चक्कर येणे
- हात, खांदे, मान, जबडा किंवा पाठदुखी
- अत्यंत अशक्तपणा किंवा थकवा
- पोट बिघडणे
Widow Maker Heart Attack टाळण्यासाठी कसे असावे डाएट?
डॉ. व्यंकटेश म्हणाले की, विडो हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी साखरेचे सेवन मर्यादित करणे महत्त्वाचे आहे. हायपरटेन्शन (DASH) थांबविण्यासाठी आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, मासे, कोंबडी, शेंगा आणि कमी फॅट्स असणारे दुग्धजन्य पदार्थ आवर्जुन समाविष्ट करा.
आपल्या आहारात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने यांसारख्या मुख्य पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच मीठ आणि साखर कमी असेल तसेच कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ नसतील याची खबरदारी घ्यावी.
हे ही वाचा << किडनी कमकुवत होऊ लागताच शरीर देतं स्पष्ट संकेत; सकाळी उठल्यापासून दिसतात ‘ही’ लक्षणे
तुमच्या आहारावर लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त, जीवनशैलीतील इतर बदलांमध्ये आठवड्यातून किमान ५ दिवस आणि ३० मिनिटे व्यायाम करणे, धूम्रपान न करणे आणि नियंत्रित वजन राखणे गरजेचे आहे.