Surya Namaskar benefits: जिमला जाण्याऐवजी बरेच लोक सूर्यनमस्कार करून दिवसाची सुरुवात करतात. तुम्ही दररोज किमान तीन, पाच, १२ किंवा २१ वेळा सूर्यनमस्कार करू शकता. परंतु, दररोज न चुकता सूर्यनमस्कार १०८ वेळा करण्याच्या फायद्यांबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?

जर्नल ऑफ योगा अँड फिजिकल थेरपीनुसार, सूर्यनमस्काराच्या १०-१२ फेऱ्यांमुळे सुमारे १३९ कॅलरीज बर्न होतात.

प्रणामासन, हस्त उत्तानासन, हस्त पदासन, अश्व संचलनासन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख स्वानासन, अश्व संचलनासन, हस्त पदासन, हस्त उत्तानासन, ताडासन ही सूर्यनमस्कारातील १२ आसने आहेत.

१०८ वेळा सूर्यनमस्कार करण्याचा खरंच विचार करायला हवा?

दररोज १०८ सूर्यनमस्कार करणे ही एक चांगली शारीरिक आणि मानसिक सवय आहे, असे फेस योगा ट्रेनर मानसी गुलाटी म्हणाल्या. “हे ऐकायला जरी कठीण वाटत असले तरी चिकाटीने आणि सातत्यपूर्णतेने सराव केल्यास ते आश्चर्यकारकपणे परिवर्तनशील ठरू शकते,” असे गुलाटी यांनी निक्षून सांगितले.

गुलाटी यांच्या मते, १०८ या संख्येचे ‘आध्यात्मिक महत्त्व’ आहे. “ते ध्यानपूर्ण असू शकते आणि स्वतःबरोबर खोलवरचे नाते निर्माण करू शकते. जर अगदी कमी गतीनेही ते दररोज केले तर, ते तुमचे शरीर, मन व आत्म्यासाठी कल्याणकारी आहे”, असे गुलाटी यांनी सांगितले.

गुलाटी यांनी स्पष्ट केल्यानुसार जर तुम्ही सलग ३० दिवस १०८ सूर्यनमस्कार केल्यास होणारे फायदे

पूर्ण शरीराचा व्यायाम : हा व्यायाम स्नायू व सांध्यांना मजबूत करतो आणि सहनशक्ती वाढवतो. तो सर्व मुख्य स्नायुगटांना सक्रिय करते, ज्यामध्ये हात, पाय व पाठ यांचा समावेश आहे.

हृदय आणि श्वसनाच्या आरोग्यात सुधारणा : हा व्यायाम हृदयाची गती आणि रक्ताभिसरण वाढवतो. तसेच श्वास घेण्याद्वारे फुप्फुसांची क्षमता सुधारते.

लवचिकता आणि आसन : पाठीच्या कण्यातील लवचिकता वाढवते आणि आसन सुधारते.

वजन व्यवस्थापन : सूर्यनमस्कार जलद गतीने केल्यास त्याचा कॅलरी बर्नर म्हणून उत्तम परिणाम साधतो. त्यामुळे चयापचय गतिमान होते.

मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन : दीर्घ श्वास घेतल्याने मज्जासंस्था शांत होते. त्यामुळे लक्ष केंद्रित होते, शिस्त लागते व चिंता कमी होते.

डिटॉक्सिफिकेशन : हा व्यायाम रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनेशन वाढवतो. तसेच घाम आणि श्वासाद्वारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास प्रोत्साहन मिळते.

हार्मोनल संतुलन : ही गोष्ट अंतःस्रावी प्रणालीला विशेषतः अधिवृक्क ग्रंथी, थायरॉईड व पिट्युटरी ग्रंथींना उत्तेजित करते. त्यामुळे मूड आणि उर्जेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.

आंतरिक शक्ती आणि इच्छाशक्ती : १०८ फेऱ्या पूर्ण करण्यासाठी वचनबद्धता आणि मानसिक शक्ती आवश्यक असते. त्यामुळे आंतरिक लवचिकता आणि आत्मशिस्त निर्माण होते.

काय लक्षात घ्यावे?

इतर कोणत्याही शारीरिक हालचालींप्रमाणे तुमचे वय आणि वैद्यकीय स्थिती विचारात घ्या आणि केवळ तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मान्यतेनुसारच व्यायाम करा. तुमच्या शरीरावर जास्त दबाव येऊ देऊ नका, असे गुलाटी यांनी बजावले.