Eggs Bad In Cholesterol : हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण अनेकांचा असाही समज आहे की, आहारात दररोज अंड्याचा समावेश केल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो. पण, खरेच असे काही होते का याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. चटर्जी यांनी माहिती दिली आहे, ती जाणून घेऊ.

डॉ. चटर्जी सांगतात की, अनेक रुग्ण त्यांना एक प्रश्न विचारतात की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असल्यास अंडी खाणे फायदेशीर आहे का? यात रुग्णांचा काही दोष नाही, कारण अनेकदा डॉक्टरच रुग्णांना जास्त प्रमाणात अंडी खाऊ नका असा सल्ला देताना दिसतात, ज्यामुळे शरीरात एलडीएल (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन), कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, अशाने ह्रदयविकाराचा धोका वाढतो, अशी भीती असते. अलीकडेच झालेल्या एका संशोधनात अंड्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलवर नेमका काय परिणाम होतो ते सांगण्यात आले आहे.

अंडी हा पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे. आहारात अंड्याचा समावेश केल्याने शरीरास प्रथिने, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात. एका अंड्यामध्ये पिवळ्या बलकमध्ये अंदाजे १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. पण, आहारातील कोलेस्ट्रॉलमुळे तो थेट रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो अशी भीती असते.

पण आता अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांमध्ये अंडीसारख्या कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तप्रवाहातील LDL कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर फारसा प्रभाव पडत नाही. यकृत नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल तयार करते आणि जेव्हा आहारात त्याचे प्रमाण वाढते तेव्हा यकृत स्वतःचे उत्पादन कमी करून नियंत्रणात ठेवते.

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, बहुतेक लोकांच्या शरीरात अंड्यांमधील कोलेस्ट्रॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठा बदल दिसून येत नाही. त्याऐवजी अनुवंशिकता, आहारातील फॅट्सचे प्रकार (विशेषतः ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स) आणि एकूण जीवनशैली यांसारखे घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी ठरवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात.

दररोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो का?

अशी शक्यता तर फार कमी असते. अनेक अभ्यासांतून असे सूचित केले जाते की, मध्यम प्रमाणात अंड्याचे सेवन म्हणजे दररोज एका अंड्याचे सेवन करणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात कोणताही मोठा बदल होत नाही, तसेच हृदय व रक्तवाहिन्यांना धोका निर्माण होत नाही. पण, सर्वांच्याच शरीरात असे परिणाम दिसून येतील असेही नाही.

कारण काहींना “हायपर-रिस्पॉन्डर्स” असतात, जे अंड्यांसह आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन करताच त्यांच्या शरीरातील LDL कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. हे मुख्यत्वे अनुवांशिक घटकांमुळे होते, जे शरीर कोलेस्ट्रॉल कसे हाताळते यावर प्रभाव टाकतात. हायपर-रिस्पॉन्डर्स असाल तर LDL कोलेस्ट्रॉलमधील वाढ हृदयविकारासाठी घातक ठरेलच असे नाही. कारण अलीकडील संशोधन असे सूचित करते की, LDL कणांचा आकार, केवळ प्रमाणच नाही तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखमीमध्ये भूमिका बजावते.

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी काय करावे?

हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांनी अंड्याचे सेवन सावधगिरीने करणे आवश्यक आहे.

अंड्यातील पिवळा बलक खाऊ नका किंवा प्रमाणात खा : अंड्यातील बहुतेक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अंड्यातील पिवळा बलकमध्ये असते, त्यामुळे तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खा, ज्यामध्ये प्रथिने भरपूर असतात आणि त्यात कोलेस्ट्रॉल नसते, ज्यामुळे ते हृदयासाठी निरोगी असते.

जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका : मांस, मच्छी, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा, कारण या पदार्थांमुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल, एवोकॅडो आणि नट्स अशा पदार्थांचे सेवन करा, त्यामुळे शरीरात हेल्दी फॅट्स वाढतात, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करून शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते.

मर्यादित सेवन करा: दिवसातून एका अंड्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पण ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून मर्यादित प्रमाणात अंड्याचे सेवन फायदेशीर ठरु शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही आहारात कोलेस्टेरॉलचे इतर स्रोत असलेले पदार्थ खात असाल तर, (उदा. मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा प्रक्रिया पदार्थ).

पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्या : फळे, भाज्या, तृण धान्य आणि शेंगा अशा पौष्टिक पदार्थांसह आहारात अंड्यांचा समावेश करा, ज्यामुळे शरीरात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससह गुड कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.

शेवटी, तुमच्या हृदयाच्या आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात कोणते पदार्थ खावे कोणते नाही याविषयीची माहिती करुन घेण्यासाठी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Story img Loader