Winter Skincare Routine: ऋतुबदलाप्रमाणेच आपण जसा आहार बदलतो, त्याचप्रमाणे आपलं स्किनकेअर रुटीनही बदलणं तितकंच आवश्यक आहे. या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्याची पद्धतदेखील बदलली पाहिजे. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्वचेवरचं तेज निघून जातं. म्हणूनच वेळोवेळी हवामान आणि आपल्या त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट्स वापरणे आवश्यक असते.
डॉ. मिकी सिंग, संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर, बॉडीक्राफ्ट क्लिनिक्स, बेंगळुरू आणि गुडगाव, यांनी सांगितले की हिवाळ्यात आपल्याला या तीन गोष्टी टाळल्याच पाहिजेत :
मॉइश्चरायजर वगळणे टाळा (Avoiding Moisturizer in Winters)
थंड हवा त्वचेसाठी खूप नुकसानकारक ठरू शकतो. ज्यांची तेलकट त्वचा आहे, ते मॉइश्चरायझर न वापरण्याचा विचार करू शकतात. पण, त्यामुळे त्वचा अजून जास्त तेलकट होऊ शकते. कारण- हिवाळ्यात त्वचा तिचा ओलावा गमावल्यामुळे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असते.
“मॉइश्चरायझर लावताना फक्त चेहऱ्यावरच नाही, तर गळा, हात, कोपरे, गुडघे आणि संपूर्ण शरीराला लावणं आवश्यक असतं,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी हेही सांगितलं की, शॉवर घेऊन बाहेर आल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावल्यानं ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
हार्श क्लिन्सर वापरणे टाळा
अल्कोहोल, सल्फेट्स व सुगंध असलेले क्लिन्सर्स त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात. हे त्वचेचा ओलावा कमी करू शकते आणि खाज, इरिटेशन निर्माण करू शकते. “बहुतांशी व्यक्तींच्या त्वचेची pH लेव्हल आम्लीय असते आणि हार्श क्लिन्सर्स अधिक अल्कलाइन असतात. हे त्वचेमधील नैसर्गिक संरक्षण कमी करू शकते आणि त्यामुळे मुरमे येऊ शकतात. जर तुम्ही मेकअप वापरत असाल, तर पहिल्या टप्प्यात ऑईल क्लिन्सर वापरा, नंतर जेंटल वॉटर बेस क्लिन्सर वापरा,” असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा… तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? मग ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक, तज्ज्ञ सांगतात…
किरण भट्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि जुनोएस्कचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणाले की अशा हवामानात एक्सफोलिएशन (घर्षण) चांगले नाही. कारण- त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. “फिजिकल एक्सफोलिएशनऐवजी जेंटल केमिकल एक्सफोलिएंट्स जसे की लॅक्टिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिड वापरणं चांगलं. हे मृत त्वचा पेशी काढून टाकण्यास मदत करतात. शक्यतो आठवड्यात एक किंवा दोन वेळा एक्सफोलिएट करा,” असं ते म्हणाले.
सनस्क्रीन वगळणे टाळा (Don’t Skip your Sunscreen)
“हिवाळ्यात तुम्हाला सूर्य खूप तीव्र नसल्यासारखं वाटू शकतं; पण लक्षात ठेवा की अल्ट्राव्हायोलेट A (UVA) आणि अल्ट्राव्हायोलेट B (UVB) किरणं संपूर्ण वर्षभर उपस्थित असतात. “UVA किरणं ढगांद्वारे आणि खिडक्यांमधूनदेखील त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. या किरणांमुळे सुरकुत्या येऊ शकतात आणि टॅनिंग होऊ शकतं. हिवाळ्यात सनस्क्रीन, क्रीम किंवा लोशन निवडताना, अशा फॉर्म्युलेशन्सचा वापर करा; जी कोरड्या हिवाळ्यात अतिरिक्त ओलावा पुरवू शकतात,” असं डॉ. सिंग म्हणाले.
संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना, झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड असलेल्या मिनरल आधारित सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. हे सनस्क्रीन संवेदनशील त्वचेवर सौम्य असतात. सनस्क्रीन त्वचेच्या संरक्षण कार्याला मदत करते. कारण- ते UV किरणांच्या संपर्कामुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव करते.
हेही वाचा… डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका
भट्ट यांनी नमूद केले की, दुग्धजन्य पदार्थांमध्ये हार्मोन्स असतात, जे कोरड्या आणि थंड हवामानाच्या अतिरिक्त प्रभावासह त्वचेवर मुरमं आणू शकतात. साखरदेखील सुरकुत्या आणि सॅगिंग स्किनसाठी कारणीभूत आहे. साखर त्वचेतील नैसर्गिक प्रोटीन––कोलेजन आणि इलास्टिन––नष्ट करते; ज्यामुळे स्किन ग्लिकेशन होतं. डॉ. सिंग म्हणाल्या की, दुग्धजन्य पदार्थांऐवजी ओट मिल्क, बदाम मिल्क अशा अन्य पर्यायांचा वापर करा. कारण- ते गाई किंवा म्हशीच्या दुधापेक्षा अधिक सौम्य असते.
डॉ. सिंग यांनी लक्षात ठेवण्यासाठी काही प्रमुख टिप्स आणि ट्रिक्सदेखील शेअर केल्या :
- आपले हात धुतल्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावा.
- शरीरातील हायड्रेशनसाठी भरपूर पाणी पिणे.
- दीर्घकाळ टिकणाऱ्या हायड्रेशनसाठी स्किनव्हिव्हसारख्या इंजेक्टेबल मॉइश्चरायझरची निवड करा.
- लक्षात ठेवा की, बेंझॉयल पॅरॉक्साइड व रेटिनॉइड्ससारखे काही विशिष्ट घटक हिवाळ्यात आपल्या त्वचेसाठी अतिरिक्त कोरडे ठरू शकतात.
- गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते आणि कोरडेपणा येऊ शकतो