‘दिवसाला एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा’ असे अनेकदा म्हटले जाते. कारण बघायला गेलं तर हे योग्यसुद्धा आहे. सफरचंद हे निसर्गाने आपल्याला दिलेले सर्वात खास फळ आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? सफरचंद अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य समस्यांवर एक चांगला उपाय ठरते. तसेच सफरचंद आतड्यांतील अनुकूल बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहनसुद्धा देतात. पण हे सर्व तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे या फळाचे सेवन कराल. तर आज आपण या लेखातून याचबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.
पोषणतज्ज्ञ आणि कन्टेन्ट क्रिएटर दीपशिखा जैन यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दीपशिखा जैन अतिसार आणि बद्धकोष्ठता या समस्यांची लक्षणे कमी करण्यासाठी सफरचंद खाण्याच्या विविध पद्धतींबद्दल सांगताना दिसत आहेत. दीपशिखा जैन व्हिडीओत सांगतात की, जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही सफरचंद न सोलता खावे. तसेच अतिसारासाठी तुम्ही सफरचंदाचे साल काढून मग त्याचे सेवन करावे. तर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सफरचंद खाण्यापूर्वी त्याला शिजवून घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
हेही वाचा…दिवसातून फक्त दोनदा ‘या’ ड्रायफ्रूटचे करा सेवन; थायरॉईड राहील नियंत्रणात? डॉक्टरांनी सांगितला फंडा
व्हिडीओ नक्की बघा :
द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांच्याबरोबर पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी सांगितलेल्या सफरचंदाच्या सेवनाच्या प्रकारांबद्दल चर्चा केली आहे.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सफरचंदांच्या सालीचे महत्व –
सफरचंदाची साल इनसोल्यूबल (Insoluble) फायबरचा समृद्ध स्रोत आहे. या प्रकारचे फायबर आतड्यात बलकिंग एजंटसारखे कार्य करतात, पाणी शोषून घेतात आणि मऊपणा वाढवतात. यामुळे आतड्यांसंबंधीच्या समस्या आकुंचन पावतात आणि पचनसंस्थेद्वारे घाण काढून अधिक कार्यक्षमतेने पुढे ढकलतात, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते ; असे डॉक्टर कनिका मल्होत्रा म्हणाल्या आहेत.
अतिसाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी साल काढून सफरचंद खाण्याची शिफारस का केली जाते?
विद्राव्य चोथा म्हणजे शरीराला न पचणारे इतर घटक. पण, तरीही विद्राव्य चोथा पाण्यात विरघळतो; तर सफरचंदाची साल फायबर, विशेषतः पेक्टिनने समृद्ध असते. या पेक्टिनचं वैशिष्ट्य असं की, खूप पाणी शोषून तो जेलीसारखा होतो. सिमेंटप्रमाणे पेशी जोडण्याचं कार्य पेक्टिनच करते. सफरचंद सालापासून पेक्टिन वेगळं करून इतर खाद्यपदार्थात घालतात, त्यामुळे मोठ्या आतड्यात जास्त मल बनतो. त्यामुळे अतिसार असणाऱ्या व्यक्तींना साल काढून सफरचंद खाण्याची शिफारस केली जाते ; असे डॉक्टर कनिका मल्होत्रा म्हणाल्या आहेत.
शिजवलेल्या सफरचंदाचे सेवन करणे आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस कसे समर्थन देतात?
सफरचंद शिजवल्याने त्यातील पेशी मऊ करतात आणि पेक्टिन भरपूर प्रमाणात देतात, त्यामुळे हे सहज उपलब्ध होणारे पेक्टिन प्रीबायोटिक म्हणून काम करते. प्रीबायोटिक्स हे खास करून तुमच्या आतड्यात राहणाऱ्या चांगल्या जीवाणूंसाठी अन्न आहे. आतड्यात साचलेली विषारी घाण काढून टाकण्यास, पचन तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात ; असे डॉक्टर कनिका मल्होत्रा म्हणाल्या आहेत.
हेही वाचा…१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
डॉक्टर कनिका मल्होत्रा यांनी वेगवेगळ्या स्वरूपात सफरचंद खाण्याने अतिरिक्त पौष्टिक फायदे सांगितले आहेत.
जीवनसत्त्वे आणि खनिजे – सफरचंद व्हिटॅमिन सी (C) चा चांगला स्रोत आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा मऊ आणि कोमल बनविण्यास मदत करते. याव्यतिरिक्त त्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक प्रमुख उपाय ठरते.
अँटिऑक्सिडंट गुणधर्म – सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स म्हणून ओळखल्या जाणार्या अनेक हानिकारक रेणूंपासून शरीराचे रक्षण करतात आणि जुनाट आजारांचा धोका कमी करतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत – सफरचंदातील फायबर सामग्री कार्बोहायड्रेट शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
तुम्ही सफरचंदाचे सेवन सालीसकट करा किंवा साल काढून, हे फळ निरोगी आहारासाठी विलक्षण जोड आहे. कारण हे फळ बद्धकोष्ठता,अतिसार कमी करू शकतात, निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला आधार देऊ शकतात आणि इतर अनेक पौष्टिक फायदे देऊ शकतात. पण, ही बाब लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे की, सफरचंदाचे सेवन करताना संतुलित दृष्टिकोन ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या स्वरूपात सफरचंदांचे सेवन करून त्याचा आनंद घ्या; असे डॉक्टर कनिका मल्होत्रा म्हणाल्या आहेत. तर आज आपण या लेखातून सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे पाहिले.