गर्भाशयाचा कर्करोग ही महिलांमधील वाढती समस्या आहे. गर्भाशयाचा कर्करोग होण्यास अनेक कारणे असतात. परंतु, काही व्यवसाय बीजांडकोशाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणानुसार ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या, हेअरड्रेसर, अकाऊंटंट, सौंदर्यप्रसाधने निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या महिला यांना बीजांडकोशाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो. यासाठी काय कारणे आहेत आणि हा धोका कशाप्रकारे टाळता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा : आजचे गुगल डूडल आणि पाणीपुरीचा रंजक इतिहास; पाणीपुरी पदार्थ आला कुठून ?
प्रिव्हेन्शन ऑफ ओव्हेरियन कॅन्सर इन क्यूबेक (PROVAQ) अभ्यासानुसार, २०१० ते २०१६ या वर्षांमध्ये १८ ते ७९ वर्षे वयोगटातील ज्या महिलांना बीजांडकोशाचा कर्करोग झाला आहे, त्यात ब्युटिशियन, अकाऊंटंट महिलांचे प्रमाण अधिक आहे. हेअरड्रेसर, ब्युटिशियन, अकाऊंटंट असणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी असणाऱ्या घटकांमुळे कर्करोग होण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. बीएमजे जर्नल ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्नमेंटल मेडिसिनमध्ये प्रकाशित नवीन संशोधनात व्यवसायांचा गर्भाशयाच्या कर्करोगावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.
टॅल्कम पावडर, केसांमधील धूळ, अमोनिया, हायड्रोजन पेरोक्साईड, सेंद्रिय रंग आणि रंगद्रव्ये आणि ब्लीच यांसारख्या घटकांच्या सततच्या संपर्कामुळे बीजांडकोशाच्या कर्करोगाचा ४० टक्क्यांहून धोका अधिक वाढतो. केशभूषाकार, सौंदर्यप्रसाधन निर्माण करणारे, अकाऊंटंट यांचा या घटकांशी अधिक संपर्क येतो. विशेषत:, या भूमिकांमध्ये १० किंवा त्याहून अधिक वर्षे काम केल्याने बीजांडकोशाचा कर्करोग होण्याचा धोका तिपटीने वाढतो, असे सुमारे १४०० कॅनेडियन महिलांवर केलेल्या संशोधनात आढळून आले.
हेही वाचा : पावसाळ्यातील आहार आणि दिनक्रम कसा असावा ? कोणते पदार्थ आहारात समाविष्ट कराल ?
त्याच कालावधीसाठी अकाऊंटंट म्हणून काम केलेल्या महिलांना बीजांडकोशाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट असतो. बांधकाम व्यवसायात कार्यरत असणाऱ्या महिलांमध्ये बीजांडकोशाचा कर्करोग होण्याची जोखीम तिप्पट असते, असे युनिव्हर्सिटी डी मॉन्ट्रियल, कॅनडा यांनी संशोधनात म्हटले आहे. कपड्यांच्या व्यवसायात असणाऱ्या महिला, भरतकाम आणि विणकाम करणाऱ्या महिलांमध्ये ४५ ते ५९ टक्के बीजांडकोशाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
तसेच महिलांचे पोशाख हे बीजांडकोशाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. घट्ट, सिंथेटिक कपडे, घट्ट पँट्स यामुळे संसर्ग होण्याच्याही शक्यता वाढल्या आहेत. संशोधन करताना ४० टक्क्यांहून अधिक महिला या ८ वर्षांहून अधिक काळ वरील व्यवसायांमध्ये कार्यरत होत्या.
एका संशोधनानुसार महिलांचे अज्ञान बीजांडकोशाच्या कर्करोगास कारणीभूत ठरते. गर्भरोधक गोळ्यांचा अधिक वापर, असुरक्षित लैंगिक संबंध, प्रमाणबाह्य संबंध गर्भाशयाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात.