ओपीडीमध्ये सावित्री खाली मान घालून बसली होती. आम्ही तिला उदासीनतेच्या आजारावर ज्या गोळ्या द्यायचो त्याच ५०-६० गोळ्या खाऊन आत्महत्येचा तिने प्रयत्न केला होता. ती हळू हळू सांगू लागली. नवरा दारू पिऊन रोज मारत होताच. तो कामावर जातच नसे. कामावर सावित्री जाई. पण तिची नोकरी गेली. मुलाची फी भरू शकली नाही, त्याचे शिक्षण थांबले आणि ती प्रचंड निराश झाली. दुसरा काहीच मार्ग ना सुचल्याने तिने गोळ्या खाल्ल्या.
१९ वर्षांच्या रितूला खरेतर खूप शिकायचे होते. नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, पण एक स्थळ सांगून आले आणि घरच्यांनी लग्न करून दिले. तिची इच्छा तशीच मनात राहिली. नवरा जेमतेम दहावी झालेला होता. रितूला सारखी चक्कर येऊ लागली. ती अचानक बेशुद्ध पडायची. तिची दातखीळ बसायची. दोन तीन तासांनी तिला जाग यायची. अशी आजारी मुलगी नको म्हणून सासरच्यांनी तिला माहेरी आणून टाकली. आमच्याकडे आणल्यावर तिच्या मनातली निराशा, बेचैनी व्यक्त झाली. मन मोकळे करायला ठिकाण उपलब्ध नाही, त्यामुळे तिची घुसमट व्हायची आणि तिला चक्कर यायची.
मंजिरी उच्चविद्याविभूषित. उत्तम नोकरी करणारी. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या धकाधकीच्या आयुष्याला यशस्वीपणे सामोरी जाणारी. तिच्यासमोर संधी चालून आली. तीन महिने परदेशात प्रकल्प होता. पण ही संधी स्वीकारायला तिचे मन धजावेना. मुलगा, नवरा ह्यांना एकटे सोडून जायचे कसे अशा चिंतेने तिला गिळून टाकले. झोप येईना, भूक लागेना, कामावरचे लक्ष उडाले. छोट्या छोट्या गोष्टींची चिंता वाटू लागली. छातीत धडधडू लागे, घाम फुटे, हातपाय थरथरू लागत, श्वास कोंडे आणि तिला वाटे आपला प्राण जातोय की काय?
आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …
अशा अनेक जणी. उदासीनता (depression), अतिचिंता(Anxiety) असे त्यांचे मानसिक विकार होण्यामागे त्यांचे स्त्री असणेच कारणीभूत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या वरील उदाहरणांमध्ये स्त्रीचा मानसिक संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेले मानसिक रोग दिसतात. स्त्रीच्या मानसिक समस्यांचा विचार करताना सामजिक घटक खूप प्रभावी ठरतात. तसेच तिची एक विशिष्ट मानसिकता सुद्धा स्त्रीमध्ये मानसिक विकार निर्माण करते.
स्त्री आणि पुरुष यांच्या मानसिक विकारांमध्ये खरेच फरक असतो का?
उदासीनतेसारखा आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट प्रमाणात आढळतो. पुरुषांपेक्षा अधिक संख्येने स्त्रिया आत्महत्येचा प्रयत्न करतात. अनेक अतिचिंतेचे आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतात. आपत्तीनंतर होणारा दूरगामी मानसिक परिणाम (Post traumatic stress disorder) महिलांमध्ये जास्त प्रमाणात होतो. आपली मनःस्थिती व्यक्त करताना स्त्रीच्या शरीरावर बराच परिणाम झालेला आढळतो. एखादी महिला आज हे दुखते, उद्या ते दुखते, पचन नीट होत नही, हातापायाला मुंग्या येतात इ. शारीरिक तक्रारी वारंवार करू लागली आणि शारीरिक आजार काही नसेल तर त्या तक्रारींमागे कही मानसिक कारण तर नाही ना हे तपासून पाहावे लागते.
आणखी वाचा: Health Special: पचनसंस्था आणि मन यांचं कनेक्शन
स्त्रियांच्या मानसिक आजारांमागे तिच्यात होणारे शारीरिक बदल महत्त्वाचे ठरतात. स्त्रीच्या जीवनचक्रामध्ये पाळी येणे, गरोदर राहणे, कधी गर्भपात, कधी बाळंतपण आणि शेवटी पाळी जाणे असा महत्वाचा घटनाक्रम असतो. यातल्या प्रत्येक टप्प्यावर अंतरस्रावांमध्ये(Hormones) बदल होत असतात आणि स्त्रीच्या मनःस्थितीतही बदल होत असतात. त्यामुळे आयुष्यातल्या या प्रत्येक टप्प्यावर स्त्री मानसिक ताणतणावाला सामोरी जाते. पाळी येणे, बाळंतपण, पाळी जाणे या शारीरिक बदलांशी निगडीत मानसिक विकार होऊ शकतात.
स्त्रीच्या आयुष्यातील अशा अनेक बदलांबरोबरच खरे तर स्त्रीची सामाजिक स्थिती तिच्या मानसिक समस्यांना जबाबदार असते.
दुय्यम स्थान
कितीही शिकली, कमवू लागली, तरी स्त्रीकडे नेहमीच घरात, कुटुंबात, समाजात कनिष्ठ स्थान असते. घरातले वडील, नवरा, भाऊ, मुलगा कोणीही असो, ‘तुला जमणार नाही, मी करतो’, बांगड्या भरल्या नाहीत नाहीत अजून मी!’ असे सहजपणे म्हणतात. स्त्रीलाही असे वाटू लागते की आपण खरेच दुर्बल. आपल्याला घरातले जड सामान हलवण्यापासून करिअरच्या निर्णयापर्यंत बाबा, भाऊ किंवा नवरा यांचे ऐकले पाहिजे. पिढ्यानपिढ्या शिकवलेल्या या गोष्टीमुळे स्त्रीच्या मनात न्यूनगंड तयार होतो.
स्त्रीच्या समाजमान्य भूमिका
वर्षानुवर्षे समाजात पुरुष आणि स्त्री यांच्या विशिष्ट भूमिका ठरलेल्या आहेत. अर्थार्जन केले तरी त्या पैशाविषयी स्त्रीला स्वातंत्र्य राहत नाही. आजच्या आधुनिक युगात या बरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यांच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास करताना तिची चांगलीच तारांबळ उडते.
प्रतिकूल परिस्थिती : लहानपणी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तर मोठे झाल्यावर मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते. बऱ्याचवेळा स्त्री अर्थार्जनासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते. तसेच बहुतांश ठिकाणी स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. त्यामुळे बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण मोठे असते.
स्त्रीवरील अत्याचार आणि हिंसा
आज जगात १४-२०% स्त्रियांवर कधी ना कधी लैंगिक अत्याचार झालेला असतो. लहानपणी लैंगिक अत्याचार सहन करावा लागला तर त्याचे मनावर दूरगामी परिणाम होतात. तिच्या मनात असुरक्षिततेची भावना कायम मनात घर करून राहते. आपल्या नातेसंबंधांविषयीसुद्धा ती कायम साशंक असते. अशा प्रकारे अनेक मनोसामाजिक घटक आणि शारीरिक, जैविक घटक यांचा परिणाम होऊन स्त्रियांमध्ये मानसिक विकार दिसून येतात. त्यांचा पुढील लेखांमध्ये सविस्तर विचार करू.