खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वाढते वजन अशा अनेक कारणांमुळे महिलांमध्ये विविध आजारांचा धोका वाढतोय. यात कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळताना महिलांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत अनेक महिला मानसिक तणावाखाली जगतात आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. दुसरीकडे बदलत्या लाइफस्टाइलमध्ये शरीरास घातक मादक पदार्थ्यांच्या सेवन करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळे महिलांमध्येही आता कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यात मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक डिसेबिलिटी आणि मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका दुप्पट वाढतोय, असा धक्कादायक दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
बहुतेक महिला वेळोवेळी स्मीअर टेस्ट करून घेत नसल्याने त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा सर्वाधिक धोका वाढत आहे. फार कमी महिला आहेत ज्या त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असतात आणि स्मीअर टेस्ट करून घेतात. स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.
द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, १९४० ते १९९५ दरम्यान जन्मलेल्या ४० लाखांहून अधिक महिलांचा या रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता. संशोधकांनी मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक डिसेबिलिटी आणि मादक पदार्थांचा सेवन करणाऱ्या आणि चाचणी न केलेल्या महिलांची नियमितपणे चाचणी करणाऱ्या स्त्रियांशी तुलना केली. यानंतर त्यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंग प्रोग्राम्समध्ये या आजाराच्या जोखमीची गणना केली.
नशा करणाऱ्या महिलांना सर्वाधिक धोका
कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट ऑफ एनवायरलमेंटल मेडिसिन संस्थेच्या केजिया हू म्हणाल्या की, आमच्या निकालात असे दिसले की, या समस्या असलेल्या महिला खूप कमी वेळा स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये क्वचितच केव्हातरी भाग घेत असतील, अशा महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो, हा धोका नंतर दुपटीने वाढतोय. याशिवाय ड्रग्स किंवा इतर मादक पदार्थ सेवन करणाऱ्या महिलांमध्येही या आजाराचा धोका मोठ्याप्रमाणात वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
महिलांनी नियमित चाचणी करावी
कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ लॅबोरेटरी मेडिसिन विभागातील सीनियर रिसर्चर्स आणि या संशोधनच्या लेखकांपैकी एक, कॅरिन संदरस्ट्रॉम यांनी सांगितले की, मानसिक आजार असलेल्या महिलांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करत राहावी. कारण यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होईल. या अभ्यासात एक कमतरता अशी राहिली की, संशोधकांकडे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी इतर जोखीम घटक जसे की धूम्रपान, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव आणि सॅक्शुअली ट्रान्समिटेड इंफेक्शनबाबत संपूर्ण डेटा नव्हता.