गेल्या दोन दशकात विविध कारणांमुळे जगभरात संधिवाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काळात संधिवाताची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येत आहे. भारतातील ६० वर्षांवरील तीनपैकी एका महिला संधिवाताने त्रस्त असून वेळेत उपचार न केल्यास त्यांचा संधिवात वाढू शकतो. सांधेदुखीमुळे चालणे आणि पायऱ्या चढणे कठीण होऊ शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की सध्या ७० वर्षांवरील १० पैकी ७ महिलांना सांधेदुखीच्या समस्येमुळे गुडघा प्रत्यारोपणाची गरज पडते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अस्थीविशेषज्ञ डॉक्टरांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. संधिवात असलेल्या सर्व लोकांपैकी अंदाजे ६० टक्के महिला आहेत. याचा अर्थ असा की स्त्रियांना संधिवात होण्याचा धोका जास्त दिसतो. परंतु त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे भारतात संधिवात स्त्रियांना लहान वयात, अगदी २० आणि ३० मध्ये सुद्धा होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात साठीपुढील १९ टक्के महिलांमध्ये संधीवाताचा त्रास आढळून येतो तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९.३ टक्के एवढे आहे. भारतामध्ये जवळपास पंधरा टक्के लोकांना संधीवाताचा त्रास असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सामान्यपणे चाळीशीच्या पुढे पायाला वाक येणे तसेच संधीवाताचे वेगवेगळे त्रास उद्भवताना दिसतात मात्र बहुतेक प्रकरणात वेळीच रुग्ण उपचार घेत नसल्यामुळे वाक असलेल्या रुग्णांना पुढील काळात गुडघा प्रत्यारोपण करावे लागते, असे ठाण जिल्हा रुग्णालयातील अस्थिविशेषज्ञ डॉ विलास साळवे यांनी सांगितले. पायाला वाक आसल्यास वेळीच उपचार केल्यास गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज राहत नाही, असेही डॉ.साळवे यांनी सांगितले. तथापि बहुतेक प्रकरणात या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे साठी ते सत्तरीच्या काळात गुडघा प्रत्यारोपणाची वेळ येते. संधिवाताचा त्रास जाणवू लागताच तज्ज्ञांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवकर निदान व वेळीच उपचार करणे शक्य होते. वेळेवर उपचार झाल्यास तीव्र वेदना टाळता येऊ शकतात. स्त्रियांना सांधेदुखी, सूज, जडपणा आणि हालचाल करण्यात अडचण अशी लक्षणे जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ साळवे म्हणाले.

आणखी वाचा: आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्याचे एकत्रिकरण हाच पर्याय!

ऑर्थोपेडिक आणि गुडघा प्रत्यारोपण सर्जन डॉ. धनंजय परब म्हणाले की, ‘‘तरुण महिलांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढताना पाहायला मिळत आहे. हा सामान्यतः वृद्ध व्यक्तीचा आजार मानला जात असला तरी, संधिवात सर्व वयोगटातील पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रभावित करते. तरुण पिढीमध्ये संधिवाताचा त्रास आता सामान्य होताना दिसत आहे. रूग्णालयात उपचारासाठी येणारे ६० टक्क्यांहून अधिक रूग्ण संधिवाताने पीडित असतात. १० पैकी ७ महिला गुडघा प्रत्यारोपण सर्जरीसाठी येतात. यावरून महिलांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढत असल्याचे दिसून येते.

केईएम रूग्णालयातील ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. मोहन देसाई म्हणाले की, “लठ्ठपणा आणि शरीरातील गुणसूत्र यामुळे संधिवाताचे समस्या उद्भवण्याचा धोका असतो. पूर्वी ही समस्या साठीनंतरच्या महिलांमध्ये दिसून येत होती. परंतु, आता ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलांमध्ये संधिवाताचा समस्या वाढताना दिसत आहे. दररोज बाहयरूग्ण विभागात ४ ते ५ महिला रूग्ण सांधेदुखीच्या उपचारासाठी येतात. या सांधेदुखीचं वेळीच निदान व उपचार झाल्यास त्यावर औषधोपचार करता येतात. जेणेकरून गुडघा प्रत्यारोपणाची गरज भासत नाही. परंतु, वेळेवर आजाराच निदान होत असल्याने गुडघ्याची झीज होऊन अनेक महिलांना शेवटचा पर्याय म्हणून गुडघा प्रत्यारोपण करून घ्यावे लागते”.

आणखी वाचा: तिशीतील तरूणांमध्ये हृदयविकाराचा वाढता धोका!

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जीत सावला म्हणाले की, ‘‘संधिवात असलेल्या तरुण महिलांना अनेकदा मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांना त्यांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि कडकपणा जाणवतो. ज्यामुळे चालणे, उभे राहणे किंवा पेन धरणे यांसारखी दैनंदिन कामे करणे कठीण होते. ही वेदना इतकी तीव्र असू शकते की दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते. स्त्रियांमध्ये संधिवात जास्त प्रमाणात होण्यामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेली नाहीत. परंतु, सर्वेक्षणानुसार अनुवांशिकता, हार्मोनल बदल आणि पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये संधिवाताची समस्या वाढत असल्याचं दिसून येत आहे”.

महिलांमध्ये जास्त प्रमाणात असलेले इस्ट्रोजेन सांधे जळजळ होणं यामुळे संधिवात होण्याचा धोका वाढवू शकतो. याशिवाय अनुवांशिक घटकही याला कारणीभूत ठरतायेत. काही विशिष्ट जीन्स स्त्रियांमध्ये अधिक प्रचलित असतात. शिवाय, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैलीमुळेही संधिवाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कमी वयातच स्त्रियांमध्ये ही समस्या सुरू होते. त्यामुळे तरूण स्त्रियांनी संधिवाताकडे दुर्लक्ष करू नयेत. शारीरिक स्वास्थ्यासह हा संधिवात मानसिक आरोग्यावरही दीर्घकालीन परिणाम करू शकतो. यासाठी नियमित योगासने, संतुलित आहार आणि तणावापासून दूर राहणं गरजचं आहे, असेही डॉ. धनंजय परब म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World arthritis day young women facing arthritis joint pain issue hldc psp
Show comments