RNSM for Breast Cancer: कॅन्सर किंवा कर्करोग या रोगाचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. याच कर्करोगाच्या जागृतीसाठी गेल्या २४ वर्षांपासून जागतिक कर्करोग दिन हा ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. अतिशय गंभीर स्वरुपाचा असा हा आजार आहे. हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातल्या कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहेत. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. प्रत्येक वर्षी लोकांना त्याचे निदान, उपचार आणि प्रतिबंध याबद्दल जागरूकता आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक संस्थांमधील लोक कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि उत्तम तपासणी, निदा, प्रगत उपचार पर्यायांची गरज यासाठी एकत्र येतात. यावेळेस स्तनाच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या महिलांसाठी नवीन पर्यायाविषयी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या ब्रेस्ट सर्जरी लीड कन्सल्टन्ट, डॉ. नीता नायर यांनी लोकसत्ताशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. तर जाणून घेऊयात रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी (RNSM) हा महिलांसाठी असणारा नवीन पर्याय काय आहे.
स्तनाचा कर्करोग कसा होतो?
“स्तनाचा कर्करोग स्तनाच्या पेशींमध्ये सुरू होतो. कर्करोगजन्य (घातक) ट्यूमर हा कर्करोगाच्या पेशींचा समूह आहे, जो जवळच्या ऊतींमध्ये वाढू शकतो आणि नष्ट करू शकतो. हे शरीराच्या इतर भागांमध्येदेखील पसरू शकते. स्तनाचा कॅन्सर ही भारतातील महिलांमध्ये आढळून येणारी एक प्रमुख आरोग्य समस्या आहे. या आजाराशी लढा देत असलेल्या युवा महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. कॅन्सरवर उपचार करणे अत्यावश्यक आहेच, पण त्याबरोबरीनेच उपचार पूर्ण झाल्यानंतरच्या काळात रुग्ण महिलेची जीवन गुणवत्तादेखील चांगली राहावी हे सुनिश्चित करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच कॉस्मेसिसवर भर देणाऱ्या नवनवीन पद्धती महत्त्वपूर्ण ठरत आहेत.”
स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये मॅस्टेक्टॉमी शस्त्रक्रिया म्हणजे काय?
स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये स्तन संरक्षण शस्त्रक्रिया हा एक प्रमुख भाग बनला आहे. त्यासाठी ऑन्कोप्लास्टिक हा पर्याय उपलब्ध असतानादेखील काही महिलांवर मॅस्टेक्टोमी (पूर्ण स्तन काढून टाकावा लागणे) शस्त्रक्रिया करावी लागते. ज्या महिलांमध्ये मॅस्टेक्टॉमी करण्याची गरज असते आणि कर्करोगाचा ट्यूमर स्तनाग्रामध्ये किंवा स्तनाग्राच्या खालील उतींमध्ये नसतो त्यांना स्तनाग्र ज्यामध्ये वाचवता येते अशी मॅस्टेक्टॉमी करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये बहुतेकदा भरपूर जोखमीचे अनुवांशिक उत्परिवर्तन असलेल्या, प्रोफिलॅक्टिक शस्त्रक्रियेसाठी नियोजित असलेल्या, स्तनाग्रापासून दूर असलेले लहान ट्यूमर किंवा अनेक ट्यूमर असलेल्या महिलांचा समावेश असतो.
RNSM आधुनिक आणि कमी जोखमीचा पर्याय
पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या एनएसएममध्ये इन्फ्रामॅमरी किंवा लॅटरल मॅमरी क्रिजजवळ किंवा स्तनाग्राजवळ चीर दिली जाते. रोबोटिक पद्धतीने स्तनाग्र काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये सारख्याच तत्त्वांचा वापर केला जातो, पण खूपच लहान चीर द्यावी लागते आणि शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्याच्या नंतर गुंतागूंत निर्माण होण्याचा धोका टळतो. रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी (RNSM) नंतर सिलिकॉन इम्प्लांट (जाळी किंवा मॅट्रिक्ससह) किंवा ऑटोलॉगस टिश्यू (सामान्यतः पोटातील चरबी किंवा पाठीचा स्नायू) वापरून स्तनाची दुरुस्ती केली जाते.
RNSM शास्त्रक्रियेचे फायदे
स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या महिलांना स्तन किंवा स्तनाग्र गमावणे हा एक भावनिक धक्का असू शकतो, ज्यामुळे नैराश्य भेडसावू शकते. अनेकदा शारीरिक प्रतिमा, स्त्रीत्व आणि आत्ममूल्याशी संबंधित भावनिक ताणतणावांचा सामना करावा लागतो. तब्येत बरी होण्याव्यतिरिक्त, स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारांचा मानसिक पैलूदेखील खूप महत्त्वाचा आहे. स्तनाग्र वाचवण्याच्या रोबोटिक मॅस्टेक्टॉमीमध्ये या चिंता कमी होतात आणि महिलेच्या संवेदना जपल्या जातात, त्यामुळे तब्येत बरी होण्याबरोबरीनेच भावनिक आरोग्यदेखील जपले जाते. आरएनएसएम ही एक मिनिमली इन्व्हेसिव प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कॅन्सरग्रस्त उती काढून टाकताना स्तनाग्र आणि आजूबाजूच्या ऊतींचे जतन केले जाते. या तंत्रामध्ये कॉस्मेटिक फायदा मिळतो, स्तनाचे नैसर्गिक स्वरूप कायम राखले जाते, त्यामुळे रुग्ण महिलेचा आत्मसन्मान आणि शारीरिक प्रतिमा यांना धक्का पोहोचत नाही.
रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी एक अचूक शस्त्रक्रिया दृष्टिकोन प्रदान करते, ज्यामुळे सर्जनना कॅन्सरग्रस्त पेशी काढताना निरोगी ऊतींचे नुकसान होणार नाही याची काळजी घेता येते. अचूकता वाढल्यामुळे ऑन्कोलॉजिकल परिणाम सुधारतात, शिवाय वेदना कमी होतात आणि तब्येत जलद गतीने सुधारते. या नाविन्यपूर्ण उपचारांमुळे, महिला स्तनाच्या कॅन्सरशी नवीन ताकद आणि सन्मानपूर्वक लढा देऊ शकतात.