World Liver Day 2023: भारतासह जगातील असंख्य लोक मधुमेह आजाराने प्रभावित आहेत. हा आजार होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते. वेळीच उपाय न केल्यास मधुमेहाच्या प्रभावामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते. या आजारामुळे यकृत म्हणजे लिव्हरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मधुमेह असल्यास नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) अशी स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे यकृताला इजा होण्याती शक्यता असते.
भारतामध्ये यकृत निकामी होण्यामागे मधुमेह हे प्रमुख कारणांपैकी एक आहे असे म्हटले जाते. टाइप २ मधुमेहामुळे शरीरामध्ये साखरेच्या पचनक्रियेमध्ये नकारात्मक परिणाम होत असतो. अशा वेळी शरीर इन्सुलिन प्रतिरोधक बनते. यामुळे यकृताशी संबंधित आजार बळावू शकतात. या आजारांची लक्षणे यकृतामध्ये बिघाड झाल्यावर दिसायला लागतात. लक्षणे उशीरा समोर आल्याने त्यावर उपचार करणे कठीण असते. अशी स्थिती उद्भवू नये म्हणून यकृताची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देत असतात.
मधुमेह असताना यकृत (लिव्हर) ची काळजी कशी घ्यावी?
- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करावे. बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळावे.
- कोला, सोडा, मिठाई, बेकरीमध्ये तयार केले जाणारे पदार्थ, कँडीज यांचे कमी प्रमाणात सेवन करावे.
- तज्ज्ञांची मदत घ्यावी. त्यांच्या सल्ल्यानुसार, ठराविक कालावधीनंतर विविध खाद्यपदार्थ खावे.
- धान्य, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा.
- दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. पोहणे, सायकल चालवणे, योगासने, जॉगिंग करण्यासाठी दिवसातील थोडा वेळ बाजूला काढावा.
- उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये राहावे यासाठी सोडियम आणि कॅफिनच्या सेवनावर लक्ष ठेवावे. शरीरात त्यांचे प्रमाण कमी राहील यासाठी प्रयत्न करावे. धुम्रपान व मद्यपान करणे टाळावे.
(मधुमेह असल्यास यकृत निरोगी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन स्वतःची तपासणी करवून घ्यावी.)